नवी दिल्ली, 23 एप्रिल : कोरोनाव्हायरस (coronavirus) जास्त पसरू नये, कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे लोकं घरात कैद झालेत आणि घरी बसल्या बसल्या अनेकांना मानसिक आजारांनी (mental illness) ग्रासलं आहे.
इंडियन सायकेट्री सोसायटीने (Indian Psychiatry society) याबाबत सर्वेक्षण केलं. या दिवसांमध्ये डिप्रेशनच्या (depression) प्रकरणांमध्ये 20% वाढ झाली आहे. जवळपास 200 दशलक्षपेक्षा जास्त भारतीय मानसिक आजारांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरं जात आहेत.
भीतीने करत आहेत आत्महत्या
लोकं वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशी एकटेपणामुळे एका तरुणाने आत्महत्या केली. तर कोरोनाच्या भीतीने पंजाबमध्ये पती-पत्नीने स्वतःला संपवलं. तसंच दिल्लीतील सरकारी रुग्णालयात कोरोना संशयिताने घाबरून सातव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोकांना सर्दी-खोकला झाला तरी भीती वाटू लागली आहे.
हे वाचा - कोरोनाव्हायरसपासून बचाव करता करता तुम्हाला केबिन फिव्हर तर झाला नाही ना?
जगभरात अशीच परिस्थिती
University of Sheffield आणि Ulster university ने 2000 व्यक्तींचा अभ्यास केला. लॉकडाऊननंतर लोकांची मानसिक अवस्था कशी बदलते, हे पाहण्यात आलं. अभ्यासात सहभागी असलेल्या 96% व्यक्तींनी सांगितलं की, रात्री झोपेतून जागे झाल्यानंतरही ते साबणाने हात धुतात. 76% लोकांनी सांगितलं की, त्यांनी तात्काळ खरेदी केली. अगदी टॉयलेट पेपरही महिभरासाठी खरेदी केले.
दीर्घकाळ राहणार परिणाम
द लँसेटने केलेल्या अभ्यासानुसार, क्वारंटाइनमध्ये राहिल्याने मानसिक आरोग्यावर जो परिणाम होतो आहे, तो भरपूर कालावधीसाठी राहिल. डिप्रेशनशिवाय पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसॉर्डर (post traumatic stress disorder - PTSD) देखील होऊ शकतं.
हे वाचा - लॉकडाऊनमुळे मुलांमध्ये वाढतोय स्ट्रेस, पालकांनो अशी घ्या मुलांची काळजी
अमेरिकन सायकेट्रीक असोसिएशन (American psychiatric associtaion) च्या डायरेक्टर डर्सी ग्रुटाडारो यांच्या मते, कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर एंझायटी, पोस्ट ट्रॉमेटीक डिसॉर्डर, डिप्रेशन आणि आत्महत्येचा आलेख झपाट्याने वाढेल.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.