वॉशिंग्टन, 30 डिसेंबर : सारं जग गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा (Corona) सामना करत आहे. या कालावधीत कोरोनाचे काही नवे व्हेरिएंट (Corona Variant) समोर आले आहेत. त्यात अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा आदी व्हॅरिएंट्सचा समावेश आहे. एक ते दीड महिन्यापूर्वी त्यात ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हॅरिएंटची भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून संशोधक, शास्त्रज्ञ कोरोनाच्या अनुषंगाने विविध बाबींवर संशोधन करत आहेत. कोरोनाव्हायरसचा (Coronavirus effect on different body parts) शरीरातल्या कोणत्या अवयवावर कसा परिणाम होतो, यावरही अभ्यास सुरू आहे; मात्र या संशोधनादरम्यान एक महत्त्वाची बाब स्पष्ट झाली असून, ती सर्वांसाठी चिंतेची आहे. कोरोना श्वसनसंस्थेतून प्रवेश करत फुफ्फुसं आणि मेंदूपर्यंत पोहोचतो, हे यापूर्वीच स्पष्ट झालं आहे. परंतु, हा विषाणू हृदयापर्यंत (Coronavirus in Heart) पोहोचून तिथं दीर्घ काळ राहतो, असं नव्या संशोधनात स्पष्ट झालं आहे.
कोरोना विषाणू केवळ फुफ्फुसं आणि मेंदूपर्यंतच नाही, तर हृदयापर्यंत पोहोचतो आणि तिथे काही महिन्यांपर्यंत त्याचा संसर्ग दिसून येतो. अर्थात ही बाब लॉंग कोविडसाठी (Long covid) कारणीभूत ठरू शकते, असं यूएसमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांना संशोधनातून दिसून आलं आहे. सध्या ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हॅरिएंटचा संसर्ग वाढत असताना हे चिंतेत भर टाकणारं आहे.
टीव्ही 9 हिंदीने ब्लूमबर्गच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, या अभ्यासात शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे, की कोरोनाव्हायरस हा एका अवयवातून दुसऱ्या अवयवात प्रवेश करतो. त्यामुळे संबंधित रुग्णाला लॉंग कोविडचा सामना करावा लागतो. तसंच दीर्घ काळापर्यंत रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं (Symptoms) दिसून येतात. अशा रुग्णांच्या केवळ श्वसनसंस्थेवरच नव्हे, तर अन्य अवयवांवरही या विषाणूमुळे परिणाम झाल्याचं दिसून येतं.
हे वाचा -‘प्रिकॉशन डोस’ म्हणजे काय? त्यासाठी कोणती लस वापरणार? सर्व प्रश्नांची उत्तरं
खरं तर लॉंग कोविड ही कोणतीही अधिकृत व्याख्या नाही. कोरोना संसर्ग झाल्यानंतर तपासणी केली असता काही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतात; मात्र अशा रुग्णांमध्ये काही महिन्यांपर्यंत लक्षणं दिसून येतात. त्यांना लॉंग कोविड असं म्हणतात. कोविडमधून (Covid) बरं झाल्यानंतरदेखील बराच काळ थकवा जाणवणं हे लक्षणदेखील लॉंग कोविडचंच असते. लॉंग कोविडचा सामना करणाऱ्या दोन रुग्णांमधली लक्षणं वेगवेगळी असू शकतात; मात्र थकवा, श्वास घेण्यास त्रास होणं, सांधेदुखी, स्नायू दुखणं, ऐकू येण्याच्या तसंच दिसण्याच्या क्षमतेवर परिणाम होणं, डोकेदुखी, चव आणि वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होणं ही लॉंग कोविडची सर्वसामान्य लक्षणं म्हणता येतील.
संशोधन अहवालानुसार, कोरोनाव्हायरस शरीराच्या विविध अवयवांमध्ये, म्हणजे जसं की हृदय किंवा मेंदूत पोहोचून तिथं जास्तीत जास्त 230 दिवसांपर्यंत राहू शकतो. ही बाब अधिक स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या 44 रुग्णांचा अभ्यास केला. संसर्ग झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच या रुग्णांचा मृत्यू झाला होता. या रुग्णांची अॅप्टॉप्सी करून त्यांचं हृदय, फुफ्फुस, लहान आतडं, अॅड्रिनल ग्लॅंडच्या पेशींमधून नमुने घेण्यात आले आणि त्यांची तपासणी करण्यात आली. यात सर्वाधिक व्हायरल लोड (Viral Load) श्वासनलिका आणि फुफ्फुसात असल्याचं दिसून आलं. संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात विषाणू संपूर्ण शरीरात पसरू लागतो. पेशींना संसर्गग्रस्त करून तो मेंदूपर्यंत पोहोचू शकतो, असं संशोधनातून स्पष्ट झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
हे वाचा - आवाजावरुनही करू शकता Omicron चं निदान; 'हे' आहे पहिलं लक्षण
त्यानंतर शास्त्रज्ञांनी शरीराच्या विविध अवयवांमध्ये व्हायरल लोड किती आहे, हे जाणून घेण्यासाठी टिश्यू प्रिझर्व्हेशनचा प्रयोग केला. लॉंग कोविडचा संपूर्ण शरीरावर कसा परिणाम होतो, हे शोधण्यासाठी खूप दिवस केलेल्या प्रयत्नांनंतर ही बाब जाणून घेण्यात यश आलं, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Health, Heart risk, Lifestyle