नवी दिल्ली, 11 जुलै : कोविड-19चा प्रसार आता गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आटोक्यात आला असला, तरी संपलेला नाही. शिवाय नवनवे व्हॅरिएंट्सही (New Corona Variants) सापडत आहेतच. मास्क आणि लसीकरण यामुळे प्रसार आणि मृत्यूचं प्रमाण कमी झालं असलं, तरी लाँग कोविड कित्येकांना सतावतो आहे. ओमिक्रॉनमुळे (Omicron) लाँग कोविडचा धोका किती आहे याचं अद्याप पूर्ण विश्लेषण झालं नसलं, तरी एकंदरीत त्याचा धोका कमी वाटतो आहे. तरीही लाँग कोविडचा त्रास कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या जवळपास निम्म्या व्यक्तींना जाणवत असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालंय. तसंच, लाँग कोविडमुळे शरीरातल्या वेगवेगळ्या इंद्रियांवर आणि प्रामुख्याने हृदयावर मोठा परिणाम होत असल्याचं आढळून आलं आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 'पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष आणि कार्डिओलॉजिस्ट व एपिडेमिऑलॉजिस्ट असलेल्या प्रा. डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला याबद्दल लेख लिहिला आहे.
डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात जाणून घेऊ या. लाँग कोविड (Long Covid) म्हणजे काय, तर कोविड संसर्गातून बरं झाल्यानंतरही दीर्घ काळ वेगवेगळी लक्षणं जाणवत राहणं. जागतिक आरोग्य संघटना (WHO), अमेरिकेतली CDC, ब्रिटनमधली NHS आदी विविध संस्थांनी लाँग कोविड म्हणजे किती कालावधी याची वेगवेगळी व्याख्या केली आहे. साधारणतः 12 आठवड्यांपर्यंत ही लक्षणं राहिल्यास त्याला लाँग कोविड असं म्हटलं जातं. जगभरातल्या वेगवेगळ्या अभ्यासांचं विश्लेषण करून मार्च 2022मध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार, कोविड होऊन गेलेल्या व्यक्तींपैकी सुमारे 50 टक्के व्यक्तींना लाँग कोविडचा त्रास होतो. ही फार गंभीर गोष्ट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कशामुळे होऊ शकतो लाँग कोविड?
- कोरोना विषाणूने थेट इंद्रियाला (Organ Damage) हानी पोहोचवली असेल तर...
- विषाणूशी लढताना शरीराने दिलेल्या मोठ्या शक्तिशाली प्रतिसादामुळे (Immunological Response) झालेल्या जखमांचा परिणाम
- डायबेटीस किंवा अन्य सहव्याधी कोविडमुळे (Co-Morbidities) बळावणं
- केवळ कोविडवरच लक्ष दिल्यामुळे अन्य तक्रारींकडे दुर्लक्ष
- कोविडवर उपचारांसाठी वापरलेल्या औषधांचा साइड-इफेक्ट
- अतिकाळजीच्या उपचारांमुळे आलेला मानसिक ताण
अनेक डॉक्टर्सनी सुरुवातीच्या काळात पेशंट्सच्या अशा तक्रारींकडे दुर्लक्ष केलं आणि ते मानसिक कारणामुळे होत असेल असं म्हटलं; मात्र ते निदान चुकीचं होतं, असं डॉ. रेड्डी यांनी म्हटलं आहे.
खूप दिवसांपासून येतोय खोकला? हा दमा तर नाही ना? ही आहेत इतर लक्षणे
लाँग कोविडमुळे कोणत्या इंद्रियांना त्रास?
लाँग कोविडमध्ये मेंदू, हृदय, स्वादुपिंड, पचनसंस्था आदींना दुखापत होते आणि त्रास होतो, असं नोंदवण्यात आलं आहे. मेंदूतून 12 क्रॅनियल नर्व्ह्ज निघतात आणि त्या संपूर्ण शरीरात वेगवेगळ्या कार्यांचं नियंत्रण करतात. त्यातल्या 10व्या क्रमांकाच्या व्हेगस (Vagus) या नावाच्या क्रॅनियल नर्व्हला लाँग कोविडमुळे दुखापत होऊ शकते, असं आढळलं आहे. ती सर्वांत लांब क्रॅनियल नर्व्ह असते आणि मेंदूतून छातीपर्यंत येऊन महत्त्वाच्या इंद्रियांचं नियंत्रण करते. ही नर्व्ह हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवते. लाँग कोविडमुळे या नर्व्हवर परिणाम झाल्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित झाल्याचे प्रकारही घडल्याच्या नोंदी आहेत.
शरीराच्या अनेक अवयवांवर कोविडचा परिणाम होत असला, तरी हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होणारा त्याचा परिणाम खूप दखलपात्र आहे. हृदयाच्या स्नायूंना सूज येऊन मायोकार्डायटिस (Myocarditis) होऊ शकतो, असं आढळलं आहे. कोविडमुळे मरण पावलेल्या अनेक व्यक्तींच्या हृदयाच्या स्नायूला दुखापत झाली होती असं आढळलं आहे. काही वेळा हृदयावरच्या पेरिकार्डियम (Pericardium) या पातळ पडद्यालाही सूज येते. त्याला पेरिकार्डायटिस म्हणतात. हृदयाच्या कार्यावर परिणाम झाल्यामुळे थकवा येतो, थोडेही श्रम सहन होत नाहीत आणि छातीत खूप दुखतं.
कोविड होऊन गेलेल्या सर्वच व्यक्ती बारीकसारीक तपासण्या करत नाहीत. त्यामुळे त्याचं प्रमाण नेमकं सांगता येत नाही; मात्र ओमिक्रॉन येण्यापूर्वीच्या काळात फ्रँकफर्टमधल्या व्हॅलेन्टिना पंटमन संस्थेने 100 पेशंट्सची 10 आठवड्यांनंतर कार्डिअॅक एमआरआय तपासणी केली होती. तेव्हा 4 पैकी 3 पेशंट्समध्ये हृदयाच्या कार्यात काही ना काही समस्या आढळल्या. हृदयाची रक्त पंपिंग करण्याची क्षमता मंदावलेली होती, हृदयाच्या स्नायूला सूज आली होती किंवा फायब्रॉसिस झाला होता किंवा पेरिकार्डायटिस झाला होता. अनेक पेशंट्स सहा महिन्यांत बरे झाले; मात्र लक्षणं वर्षभर टिकली.
डियोड्रन्टच्या जास्त वापराने होऊ शकतो कॅन्सर! काय आहे यामागचे सत्य?
फुप्फुसांमध्ये कोरोना संसर्ग झाल्यामुळेदेखील हृदयावर ताण आल्याचं लक्षात आलं. दुखापत झालेली फुप्फुसं रक्तात ऑक्सिजन मिसळण्याचं काम नीटपणे करू शकत नाहीत, असंही दिसून आलं. कोविडमुळे रक्तात तयार झालेल्या गुठळ्या फुप्फुसापर्यंत पोहोचल्या तर सगळी रक्ताभिसरण यंत्रणा कोसळू शकते. त्यामुळे कोविडनंतर वर्षभरानेही हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रक्तवाहिन्यांच्या आतल्या थराला एंडोथेलियम (Endothelium) असं म्हणतात. रक्तवाहिनी आवश्यकतेनुसार प्रसरण पावणं किंवा आकुंचन पावणं एंडोथेलियममुळे शक्य होतं. कोविडमुळे एंडोथेलियमवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे हाय बीपीचा त्रास होऊ शकतो. अनेक पुरुषांना Erectile Dysfunction चाही त्रास होतो.
याचा अर्थ असा नव्हे, की सर्वांनाच हे त्रास होतील. प्रत्येक व्यक्तीला असलेल्या सहव्याधी, त्याची प्रतिकारशक्ती, लसीकरणाची स्थिती आदी अनेक गोष्टींवर ते अवलंबून आहे; मात्र योग्य ती काळजी घेणं, लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लाँग कोविडचा अभ्यास अद्याप पूर्ण झालेला नाही; मात्र लसीकरण आणि मास्कचा वापर महत्त्वाचा आहे, असं डॉ. रेड्डी यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Covid cases