मुंबई, 7 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन (Corona New Strain) आता भारतातही दिसून आला आहे. आतापर्यंत देशात ओमिक्रॉनचे (Omicron cases in India) एकूण 23 रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 10 तर गुजरातमध्ये 9 रुग्ण आहेत. देशात आणखी कुठे ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी जीनोम सीक्वेन्सिंग (Genome Sequencing) प्रक्रियेचा वेग वाढवण्यात आला आहे. या जीनोम सिक्वेन्सिंगमुळेच राजस्थानमधील नऊ रुग्णांची पुष्टी करण्यात आली होती. जीनोम सीक्वेन्सिंग म्हणजे काय आणि कोरोना व्हेरियंट (Corona Variant) शोधण्यासाठी त्याचा कसा फायदा होतो याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
जीनोम सीक्वेन्सिंगबाबत माहिती करून घेण्यापूर्वी आपल्याला जीन्स (Genes) आणि जीनोम (Genome) हे काय आहे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. जगातील कोणत्याही सजीवाची रचना कशी असेल, हे त्या सजीवाच्या जीन्सवर अवलंबून असते. एखाद्या जीवामध्ये डीएनए, आरएनए असे कित्येक घटक असतात. हे घटक सारखे असले, तरी त्यांची रचना सर्वांपेक्षा वेगळी आणि गुंतागुंतीची असते. त्यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक या घटकांच्या माहितीला जेनेटिक कोडमध्ये (Genetic Code) रुपांतरीत करतात. एखाद्या सजीवाचा पूर्ण जेनेटिक कोड म्हणजे जीनोम. सर्वांची बनावट वेगळी असल्यामुळे, प्रत्येक सजीवाचा जेनेटिक कोडही वेगवेगळा असतो.
Omicron आटोक्यात आणण्यासाठी भारतात लॉकडाऊन गरजेचं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
हीच गोष्ट विषाणूलाही लागू होते. कोणत्याही विषाणूचा जीनोम कोड हा एकसारखा नसतो. अगदी एकाच विषाणूचे दोन व्हेरियंट असतील, तर त्यांचाही जीनोम कोड वेगवेगळा असतो. या जीनोम कोड्सची तपासणी करत राहण्याच्या प्रक्रियेला जीनोम सीक्वेन्सिंग (What is Genome Sequencing) म्हणतात. कोरोनाचे उदाहरण द्यायचे झाल्यास, कोरोनाच्या पहिल्या विषाणूचा जीनोम कोड हा डेटा वैज्ञानिकांकडे सेव्ह आहे. जेव्हा कोरोनाचा पहिला व्हेरियंट समोर आला, तेव्हा जीनोम सीक्वेन्सिंगमुळे वैज्ञानिकांना समजले, की आपल्याकडे सेव्ह असलेला विषाणूचा कोड आणि नव्या नमुन्यामधील विषाणूचा कोड मॅच होत नाही. यामुळेच हा एक नवा व्हेरियंट (Corona new Variant) असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं. अशाच प्रकारे कोरोनाचे किंवा इतर कोणत्याही विषाणूचे व्हेरियंट ओळखले जातात.
पुण्यातील Omicron पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
दरम्यान, ओमिक्रॉनबाबत जगभरात मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. याला कारण म्हणजे, ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टा या व्हेरियंटशी संबंधित (Omicron not related to Delta) नाही. या व्हेरियंटचं प्रोफाईल कोरोनाच्या आधीच्या व्हेरियंटच्या स्ट्रेन्सपासून एकदम वेगळं असल्याचं जीनोम सीक्वेन्सिंगमध्ये दिसून आलं आहे.
भारतातील कोरोना विषाणूच्या व्हेरियंट्सबाबत माहिती गोळा करण्यासाठी 25 डिसेंबर 2020 ला जीनोम सीक्वेन्सिंग फोरम (Genome Sequencing in India) तयार करण्यात आले होते. इंडियन सार्स कोव्ह-2 कन्सोर्शियम ऑन जीनोमिक्स (INSACOG) असं या फोरमचं नाव आहे. याच्या अंतर्गत देशातील दहा प्रयोगशाळांमध्ये जीनोम सीक्वेन्सिंग करण्यात येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Corona updates