• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • Covishield चा फक्त एकच डोस दिला जाणार? लवकर लसीकरण धोरण बदलण्याची शक्यता

Covishield चा फक्त एकच डोस दिला जाणार? लवकर लसीकरण धोरण बदलण्याची शक्यता

कोव्हिशिल्ड (Covishield) या लशीचा एकच डोस पुरेसं संरक्षण देऊ शकेल का, याविषयी देशात अभ्यास करण्यात येणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 31 मे : ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅाझेनेका (Oxford AstraZeneca) यांनी विकसित केलेल्या आणि भारतात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये (Serum Institute) उत्पादित केल्या जात असलेल्या कोव्हिशिल्ड (Covishield) या लशीचा एकच डोस पुरेसं संरक्षण देऊ शकेल का, याविषयी देशात अभ्यास करण्यात येणार आहे. महिनाभरात या अभ्यासाला सुरुवात होण्याची शक्यता असून, नवीन लसीकरण रणनीती ठरवताना याचा विचार केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सीएनएन-न्यूज 18ला दिली. दोन वेगवेगळ्या लशींचे डोस (Mix and Match) देणं आणि कोव्हिशिल्डच्या एकाच डोसची उपयुक्तता या दोन्ही विषयावर अभ्यास सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय समितीकडून (National Ethics Committee) मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करत असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. सरकार पहिल्या आणि दुसर्‍या डोससाठी दोन वेगवेगळ्या लशींचा वापर करण्याबाबत अभ्यास करण्याचा विचार करत असल्याचं सीएनएन-न्यूज 18नं यापूर्वीच सांगितलं होतं. एका नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅाझेनेका आणि फायझरच्या (Pfizer) लशीचा एकत्रित प्रभाव चांगला दिसून आला आहे. हे वाचा - diABZI चा फक्त एकच डोस पुरेसा; कोरोनाला गंभीर रूप धारण करण्यापासून रोखणार हे औषध सध्या भारतात वापरल्या जाणार्‍या कोव्हिशिल्ड (Covishield), कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि रशियाची स्पुतनिक V (Sputnik V) या सर्व सर्व लशी दोन डोसच्या असून, त्यांच्या मिक्स आणि मॅच पद्धतीनं वापराला परवानगी नाही. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याच्या मे महिन्यात घेण्यात आलेल्या निर्णयाच्या परिणामाचा आढावादेखील सरकारचं तज्ज्ञ पॅनेल घेणार आहे. यापूर्वी, चार ते सहा आठवडे असणारं अंतर एप्रिलमध्ये सहा-आठ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं होतं. आता कोव्हिशिल्डच्या एका डोसच्या कार्यक्षमतेबाबत केल्या जाणाऱ्या अभ्यासात बूस्टर डोसबाबतही अभ्यास करण्यात येणार आहे. बूस्टर डोस (Booster Dose) पहिल्या डोसनंतर सहा किंवा 12 महिन्यांनी दिला जाऊ शकतो. याबाबतचा निर्णय अभ्यासातल्या निष्कर्षांवर अवलंबून आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. ‘जॉन्सन आणि जॉन्सनची जान्सेन आणि स्पुतनिक V यांसारख्या इतर लशी एकाच डोसच्या आहेत. कोव्हिशिल्डचाही एक डोस उपयोगी ठरू शकतो. कारण अ‍ॅस्ट्रॅाझेनेकानं एकच डोस असलेली लस तयार करण्यासाठी काम सुरू केलं होतं,’ असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. हे वाचा - Corona Vaccination आता रोज होणार 1 कोटी नागरिकांचं लसीकरण! सरकार करत आहे नियोजन दरम्यान, ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका इथं घेण्यात आलेल्या या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल चाचण्यांनुसार, कोविड-19 साठी (Covid-19) लशीचा एक डोसही सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. तिथं एक डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये 22 दिवसांनंतरही कोणताही त्रास किंवा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नसल्याचं अ‍ॅस्ट्रॅाझेनेकानं स्पष्ट केलं आहे.
Published by:Priya Lad
First published: