मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

ना इंजेक्शनची भीती, ना कडू गोळ्यांचं टेन्शन; फक्त हुंगून घेता येईल असं कोरोनावरील औषध

ना इंजेक्शनची भीती, ना कडू गोळ्यांचं टेन्शन; फक्त हुंगून घेता येईल असं कोरोनावरील औषध

म्युकॉर्मायकॉसिस नावाच्या एका बुरशीजन्य संसर्गाने भीती पसरवली आहे.

म्युकॉर्मायकॉसिस नावाच्या एका बुरशीजन्य संसर्गाने भीती पसरवली आहे.

हे औषध कोविडविरुद्ध लढाईतलं गुप्त हत्यार ठरू शकेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

वॉशिंग्टन, 29 मे : कोरोना संसर्गाला (Corona Infection) प्रतिबंध व्हावा म्हणून लशी विकसित केल्या जात आहेत. तसंच वेगवेगळ्या औषधांच्या निर्मितीसाठीही (Corona medicine) संशोधन केलं जात आहे. भारतात डीआरडीओने (DRDO) विकसित केलेलं टू-डीजी (2-DG) हे औषध नुकतंच उपलब्ध करण्यात आलं आहे. तसंच हैदराबादची भारत बायोटेक नावाची कंपनी कोरोफ्लू नावाचा नेझल स्प्रे अर्थात नाकात घालायचं औषध विकसित केलं असून, त्यावर संशोधन सुरू आहे. कॅनडातल्या सॅनोटाइझ कंपनीनेही 99.9 टक्के कोरोना विषाणूंचा खात्मा करणारा नेझल स्प्रे विकसित केला आहे. दरम्यान आता अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी असं औषध तयार केलं आहे, जे तुम्हाला हुंगून (Inhaling corona medicine) घेता येईल.

'युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसीन'च्या (University of Pittsburgh School of Medicine) शास्त्रज्ञांनी कोविडवर उपचारांसाठी एक नवी पद्धत विकसित केली आहे. ही पद्धत नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. शास्त्रज्ञांनी श्वास घेता येण्यासारख्या अँटी-कोविड नॅनोबॉडीज (Anti covid Nanobodies) विकसित केल्या आहेत. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे इनहेलरने औषध श्वासाबरोबर नाकात ओढता येतं, त्याप्रमाणे अँटी-कोविड नॅनोबॉडीज श्वासाद्वारे कोविडबाधित व्यक्तीच्या शरीरात सोडता येऊ शकतात. कोविडविरुद्ध लढाईतलं हे गुप्त हत्यार ठरू शकेल असं दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

या औषधात कोरोना विषाणूची स्पाइक प्रोटीन्स नष्ट करण्याची क्षमता आहे. उंदराच्या प्रजातीतल्या  हॅम्स्टर (Hamster) नावाच्या प्राण्यावर प्राण्यांमध्ये याची चाचणी यशस्वी झाली असून, त्याबद्दलचा अहवाल सायन्स अॅडव्हान्सेस (Science Advances) या जर्नलमध्ये 26 मे 2021 रोजी प्रसिद्ध झाला आहे.

हे वाचा - लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा; पहिल्या कोरोना लशीला हिरवा कंदील

या शास्त्रज्ञांनी 8000 नॅनोबॉडीज (Nanobodies) शोधून काढल्या. त्यांचा संयोग घडवून आणण्यात आला. त्यातून Nb21 या उच्च क्षमता असलेल्या नॅनोबॉडीची निर्मिती झाली. ही नॅनोबॉडी नाकाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग झालेल्या हॅम्स्टर प्राण्याच्या शरीरात सोडण्यात आली. त्याच्या नाकापासून गळा आणि फुप्फुसांपर्यंतच्या कोरोना विषाणूंना या नॅनोबॉडीने संपवून टाकलं. त्याची अचूकता आणि गती सध्याच्या उपचारांच्या वेगाच्या तुलनेत लाखो पटींनी अधिक होती.

ज्या हॅम्स्टर्सच्या नाकात हे औषध सोडलं होतं, त्यांचं वजन कोरोना संसर्गाच्या कालावधीत कमी झालं नाही, असं आढळून आलं. ज्यांना हे औषध दिलं नव्हतं, त्या समूहातल्या हॅम्स्टर्सचं वजन कोरोना संसर्गानंतर 16 टक्क्यांनी घटल्याचं नोंदवलं गेलं. तसंच, हे औषध हुंगणाऱ्या हॅम्स्टर्सच्या फुप्फुसांत (Lungs) काही सकारात्मक बदलही दिसून आले. कोरोना संसर्गामुळे होणारा दाह (Inflammation) कमी प्रमाणात असल्याचंही दिसून आलं.

हे वाचा - कोरोनाविरोधातील लढ्यात गेम चेंजर ठरणार Nasal Spray? 99.99 टक्के प्रभावी असल्याचा दावा

कॅन्सरवरील उपचारांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा (Monoclonal Antibodies) वापर केला जातो. त्याप्रमाणेच या नॅनोबॉडीज काम करतात. त्यांचा आकार अत्यंत सूक्ष्म असतो आणि निर्मितीचा खर्चही कमी असतो.

या संशोधनातील प्रमुख शास्त्रज्ञ यी शी यांनी सांगितलं की, आम्ही या औषधाचे परिणाम पाहून प्रभावित झालो आहोत. Nb21 या नॅनोबॉडीला पिट्सबर्ग नॅनोबॉडी 21 (PiN-21) असं नाव देण्यात आलं आहे. हे औषध कोविडवर उपचारांसाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास वाटतो. तसंच माणसामाणसांमध्ये होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण घटवण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो, असं शास्त्रज्ञ म्हणतात.

लस आणि हे औषध यांत फरक आहे. कारण लस विषाणूचा संसर्ग होण्यास प्रतिबंध करतं. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींना तंदुरुस्त करण्याचं काम करतं. काही लोकांना वैद्यकीय कारणांमुळे लस देणं शक्य नसेल, तर त्यांना हे औषध देणं शक्य होऊ शकेल. अर्थात, अद्याप हे संशोधन प्राथमिक स्थितीत असून त्याचे निष्कर्ष केवळ हॅम्स्टर प्राण्यांवरच्या चाचण्यांमधून काढण्यात आलेले आहेत. त्याच्या मानवी चाचण्या अद्याप झालेल्या नाहीत. मात्र यापासून एक स्वस्त आणि प्रभावी औषध नजीकच्या भविष्यकाळात निर्माण होऊ शकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid19, Medicine