• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोना लसीकरणाचा दुसरा डोज घ्यायचा विसरलात तरी घाबरू नका, हे उपाय करा

कोरोना लसीकरणाचा दुसरा डोज घ्यायचा विसरलात तरी घाबरू नका, हे उपाय करा

देशात काही व्यक्ती अशाही आहेत, की ज्यांना कोरोनाप्रतिबंधक लशीचा दुसरा डोस एक तर वेळेवर मिळालेला नाही किंवा ते दुसरा डोस घ्यायचं विसरून तरी गेले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : देशात कोरोनाप्रतिबंधक लसीकरण (Anti Covid Vaccination) मोहीम आता वेगात चालली आहे. लवकरच भारत हा कोरोनाप्रतिबंधक लशींचे 100 कोटी डोस देणारा देश बनेल. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या मोठी असून, या व्यक्तींना दुसरा डोस (Second Dose of Covid Vaccine) घेण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. देशात काही व्यक्ती अशाही आहेत, की ज्यांना कोरोनाप्रतिबंधक लशीचा दुसरा डोस एक तर वेळेवर मिळालेला नाही किंवा ते दुसरा डोस घ्यायचं विसरून तरी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की कोरोनापासून उत्तम सुरक्षितता हवी असेल, तर लशीचा दुसरा डोस घेणंही अत्यावश्यक आहे. या संदर्भात न्यूज 18ने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेअंतर्गत जोधपूर येथे कार्यरत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इम्प्लिमेंटेशन ऑन नॉन-कम्युनिकेबल डिसीज या संस्थेतले डॉ. अरुण शर्मा यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांनी माहिती दिली. 'कोविड लसीकरणाच्या व्यवस्थेअंतर्गत पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी मेसेजद्वारे सूचना दिली जाते. ज्या व्यक्तींनी दुसरा डोस घेतला नसेल, त्यांना हा मेसेज वारंवार पाठवला जातो. जोपर्यंत लशीचा दुसरा डोस घेतला जात नाही, तोपर्यंत संपूर्ण लसीकरणाचं प्रमाणपत्र (Vaccination Certificate) तयार होत नाही. एवढं असूनही एखादी व्यक्ती निर्धारित वेळेत दुसरा डोस घेऊ शकली नाही किंवा विसरून गेली, तर अशा स्थितीत तज्ज्ञांचा सल्ला घेता येऊ शकतो,' असं त्यांनी सांगितलं. हे ही वाचा-Explainer : कोरोना लस एक असली तरी त्याचा परिणाम प्रत्येकावर वेगवेगळा का होतो? डॉ. शर्मा सांगतात, की दुसरा डोस राहून गेलेल्या व्यक्तींकडे दोन पर्याय आहेत. एक तर त्यांनी निर्धारित कालावधी उलटून गेला असला, तरी लशीचा दुसरा डोस घ्यावा. दुसरा पर्याय म्हणजे त्यांनी अँटीबॉडी टेस्ट (Antibody Test) करून घ्यावी. त्यांच्या शरीरात कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या नसतील किंवा खूप कमी प्रमाणात असतील, तर त्या व्यक्ती पहिलाच डोस पुन्हा नव्याने घेऊ शकतात, असं डॉ. शर्मा सांगतात. अर्थात, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असल्याचंही ते नमूद करतात. री-व्हॅक्सिनेशन (Re-Vaccination) अर्थात लसीकरण पुन्हा करण्याच्या या मुद्द्यावर अद्याप कोणतंही संशोधन किंवा अभ्यास झालेला नाही किंवा त्याबद्दल कोणत्या मार्गदर्शक सूचनाही नाहीत. उपलब्ध लशींच्या आधारे देशातल्या सर्व नागरिकांना किमान एक डोस तरी दिला जावा आणि उपलब्ध लशी वाया जाऊ नयेत, असा प्रयत्न असू शकतो. अशा स्थितीत मध्ये काही कालावधी गेला तर पुन्हा लसीकरण करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो, असं डॉ. शर्मा म्हणतात. वैयक्तिक पातळीवर असं लसीकरण केलं गेलं, तरी त्यात काहीही नुकसान नाही, असंही ते म्हणतात. हे ही वाचा-Coronavirus : धोका वाढला! वैज्ञानिकांना आढळला कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट डॉ. शर्मा सांगतात, की कोरोनाप्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात अंशतः अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडी टायटर टेस्ट केली, तर लस घेतल्यानंतर शरीरात किती अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, हे कळू शकतं. समजा, लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 40 टक्के अँटीबॉडीज तयार झाल्या असतील, तर उर्वरित 60 टक्के अँटीबॉडीज तयार होण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपलं शरीर कोरोना विषाणूशी लढा देऊ शकेल. कोरोना लसीकरणानंतरही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी लसीकरण झाल्यानंतर संसर्ग झाल्यास आजाराचं रूप सौम्य असतं आणि हॉस्पिटलायझेशनची गरज कमीत कमी भासते, असं सांगण्यात येतं.

  First published: