मुंबई 7 जुलै: कोरोना विषाणूच्या संसर्गाने (Corona Pandemic) गेल्या दीड वर्षापासून जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाने मोठा हाहाकार माजवला. लसीकरण (Vaccination) हाच यावरचा चांगला उपाय आहे, यावर जगभरातल्या शास्त्रज्ञांचं एकमत आहे. लसीकरण किती प्रभावी आहे, याबद्दलचा अभ्यास जगभर अनेक ठिकाणी सुरू आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR या संस्थेनेही अलीकडे याबद्दलचा अभ्यास केला. त्यातून दिलासादायक निष्कर्ष हाती आले आहेत. कोरोनाप्रतिबंधक लशीचा एक डोस (Single Does) घेतला असेल, तर मृत्यूचा धोका 82 टक्क्यांनी घटतो; तसंच लशीचे दोन्ही डोसेस (Double Doses) घेतलेले असतील, तर मृत्यूचा धोका (Death) 95 टक्क्यांनी घटतो, असं या अभ्यासातून (ICMR Study) समोर आलं आहे.
या अभ्यासाबद्दलची माहिती देणारं एक ट्विट ICMRने केलं होतं. ICMRने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या पोलिस खात्यातल्या (Tamilnadu Police) 1,17,524 जणांवर एक फेब्रुवारी 2021 ते 14 मे 2021 या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला होता. लसीकरण केलेल्या आणि न केलेल्या पोलिसांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले.
Fish Biscuits: बिस्किट खाऊन करा कोरोनापासून बचाव, माशांपासून बनलेलं खास प्रोडक्ट
अभ्यासात सहभागी झालेल्या पोलिसांपैकी 32,792 पोलिसांनी लशीचा एकच डोस घेतला होता. 67,673 पोलिसांनी लशीचे दोन्ही डोसेस घेतले होते. तसंच, 17,059 पोलिसांनी लशीचा एकही डोस घेतला नव्हता.
ICMR study reveals that COVID-19 vaccine is effective in preventing deaths among front line workers. Research article can be access at IJMR portal https://t.co/McnaVa1S9V pic.twitter.com/teJFOXU8PB
— ICMR (@ICMRDELHI) July 6, 2021
या पोलिसांपैकी 13 एप्रिल 2021 ते 14 मे 2021 या कालावधीत 31 पोलिसांचा दुर्दैवाने कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. या 31 मृतांपैकी चार जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले होते, तरीही त्यांचा मृत्यू झाला. या मृतांपैकी सात जणांनी लशीचा एक डोस घेतलेला होता. उर्वरित 20 मृत पोलिसांनी लशीचा एकही डोस घेतलेला नव्हता.
कोरोना काळात वाढाला ताण; विद्यार्थांसाठी स्ट्रेस कमी करणारे उपाय
यावरून काढण्यात आलेल्या निष्कर्षांत असं दिसून आलं, की लस न घेणाऱ्यांच्या तुलनेत लशीचा एक घेतलेल्या पोलिसांमध्ये मृत्यूची जोखीम 0.18 टक्के होती. तसंच, दोन्ही डोस घेतलेल्या पोलिसांमध्ये मृत्यूची जोखीम 0.05 टक्के होती.
एकंदर अभ्यासात असं स्पष्ट झालं, की दोन्ही डोसेस घेतलेल्या पोलिसांमध्ये मृत्यूचा धोका 95 टक्के घटला, तर एक डोस घेतलेल्या पोलिसांमध्ये मृत्यूचा धोका 82 टक्के घटला होता. ICMRच्या या अभ्यासाचे निष्कर्ष इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (IJMR) या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत, आयसीएमआर संस्थेने ट्विटमध्ये लिहिलं आहे.
भारतात आतापर्यंत 35 कोटीहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. जुलैअखेरपर्यंत 50 कोटी जणांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलं असून, डिसेंबरअखेरपर्यंत 18 वर्षांवरच्या सर्व पात्र नागरिकांचं (सुमारे 93 कोटी) लसीकरण पूर्ण करण्याचं सरकारने ठरवलं आहे. कोरोना संसर्गाची तिसरी संभाव्य लाट फेब्रुवारी-मार्च 2022मध्ये अपेक्षित असल्याचं ICMRच्याच एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्या दृष्टीने डिसेंबरपर्यंतच सर्वांचं लसीकरण पूर्ण केलं, तर त्या लाटेचा धोका कमीत कमी राहील, असं सरकारचं नियोजन आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.