जिनिव्हा, 01 जून : जगभरात गेल्या वर्षापासून कोरोना विषाणूच्या साथीचा (Coronavirus Pandemic) प्रादुर्भाव झाल्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाचे नवनवे व्हेरियंट (Corona variants ) आढळून येत आहेत. त्या व्हेरियंटला तो ज्या देशात आढळला त्याच देशाच्या नावानं ओळखलं जातं. चीन किंवा वुहान, यूके, ब्राझील, इंडियन व्हायरस असा उल्लेख होत असल्यानं भारतासह चीननंदेखील आक्षेप घेतला होता. हा विषय वादग्रस्त आणि संवेदनशील होऊ लागल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना व्हेरियंटचे नामकरण (Corona Variants get New Names) करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आता ग्रीक अल्फाबेटच्या आधारावर कोरोना व्हेरियंटसना नावं देण्यात आली आहेत. अल्फा, डेल्टा, ब्राव्हो ...अशी ही नवीन नावं आहेत.
जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपिअरनं म्हटलं होतं, नावात काय आहे? जसं गुलाबाला फरक पडत नाही त्याला काय म्हटलं जातं तसंच या कोरोना विषाणूलाही त्याला काय नाव देण्यात आलं आहे यानं काहीही फरक पाडत नाही. मात्र आजार आणि विषाणूची देशावरून पडणारी नावं संवेदनशील विषय असतात. चीनमध्ये सापडलेल्या या विषाणूच्या व्हेरिएंटचा उल्लेख वुहान व्हायरस (Wuhan Virus) असा केला जातो तेव्हा लोकांमध्ये नकळत द्वेष, तिरस्काराची भावना निर्माण होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमध्ये नवीन स्ट्रेन सापडल्याचा उल्लेख केल्यांनतर सिंगापूरनं हा भारतीय स्ट्रेनच असल्याचं म्हटलं होतं. या वादानंतर भारत सरकारनं सोशल मीडियावर भारतीय व्हेरीयंट असा उल्लेख करू नये, असल्यास तो काढून टाकावा अशी सूचना दिली होती आणि या नावाबाबत आक्षेप नोंदवला होता.
हे वाचा - कसं, कुणी आणि कधी घ्यावं 2DG? कोरोना औषधाबाबत जरूर वाचा DRDO च्या सूचना
शास्त्रीय नावं (Scientific Names) लोकांना सहज उच्चारता येत नाहीत आणि देशांच्या नावांवरून नाव देणं हे पूर्वग्रहदूषित आणि अयोग्य असतं. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना व्हायरस व्हेरिएंट्सना (Corona Variants) उच्चार करण्यास आणि आठवणीत ठेवण्यास सोपी अशी नावं देण्याचा निर्णय घेतला. ज्यात कोणत्याही देशाच्या नावाचा संबंध नसेल. जागतिक आरोग्य संघटनेनं जगातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या गटाची नेमणूक केली होती. त्यात नॉमनक्लेचर, व्हायरस टॉक्सोनॉमिक तज्ज्ञ, संशोधक आणि राष्ट्रीय नियामक सहभागी होते. प्रदीर्घ चर्चा आणि विचारविनिमय करून अखेर ग्रीक अल्फाबेटसवरून नामकरण करण्यात आलं आहे.
काय आहेत कोरोना व्हेरिएंट्सची नवी नावं?
आता भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या (B.1.617.2) व्हेरियंटला डेल्टा (Delta) असं नाव देण्यात आलं आहे. तर, दुसऱ्या (B.1.617.1) स्ट्रेनचे नामकरण कप्पा (Kappa) असं करण्यात आलं आहे. ब्रिटनमध्ये 2020 मध्ये आढळलेल्या (B.1.1.7) व्हेरियंटला ‘अल्फा’ तर दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या व्हेरियंटला (B.1.351) ‘बीटा’ म्हटलं आहे. ब्राझीलमध्ये आढळलेल्या व्हेरियंटला (P.1) गॅमा (Gamma) असं नाव देण्यात आलं आहे. ग्रीक अल्फाबेटसमध्ये 24 अक्षरं आहेत. ही संपल्यानंतर नवीन नावांची मालिका जाहीर करण्यात येईल, असं आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. शास्त्रीय विश्वात अल्फाबेट आणि नंबर्स यांच्या मिश्रणातून तयार केलेली शास्त्रीय नावं वापरली जातील; पण इतरत्र ही नवीन नावं प्रचलित केली जातील, असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आता कोणत्याही देशात नवीन व्हेरियंट सापडला तर त्यांच्या नावावरून तो ओळखला जाणार नसल्यानं त्या देशाला लाजिरवाणं वाटणार नाही, त्यांनी हे लपवण्याची गरज नाही, असंही आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
आजार किंवा विषाणूला नावं कशी दिली जातात ?
जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतंच ट्विटरवर म्हटलं होतं की, जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही व्हेरियंटला देशाच्या नावावरून नाव देत नाही. संघटना व्हायरसच्या स्वरुपाला त्याच्या शास्त्रीय नावानंच संबोधित करते आणि इतरांनीही तसंच करणं अपेक्षित आहे.
जेव्हा एखादा नवीन आजार किंवा विषाणू प्रथमच जगासमोर येतो तेव्हा प्राथमिक टप्प्यात तो कुठे उद्भवला त्या ठिकाणावरून ओळखला जातो. कारण काहीतरी नाव असल्याशिवाय त्याच्याबाबत संवाद शक्य होत नाही आणि शास्त्रीय नावं सर्वसामान्य जनतेला समजणं आणि उच्चारणंही कठीण असते. त्यामुळे सुरुवातीला त्या ठिकाणाच्या नावावरूनच तो ओळखला जातो. उदाहरणार्थ, झिका हा आजार युगांडामधील झिका जंगलात प्रथम आला, तर इबोला कांगोतील इबोला नदीत आढळला. तेच 1918 मध्ये आलेला इन्फ्लूएन्झा स्पेनमध्ये पहिल्यांदा उद्भवला नाही याची शास्त्रज्ञांना खात्री आहे; पण तिथं सर्वाधिक रुग्ण आढळल्यानं साथ पसरल्याचं त्या देशानं जाहीर केलं आणि ही साथ स्पॅनिश फ्ल्यू म्हणूनच ओळखली जाऊ लागली.
हे वाचा - प्रेग्नन्सीत आईने दिला कोरोनाशी लढा; जन्मानंतर काही तासांत बाळाला MIS-C चा विळखा
पण आजच्या काळात अशी नावं आर्थिक, सांस्कृतिक संबंधांवरदेखील वाईट परिणाम करू शकतील. विषमता, पक्षपाताची बीजं रोवू शकतील त्यामुळं प्रथम आढळणारे आजार, विषाणू यांना नावं देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं 2015 मध्येच मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
त्यानुसार नवीन आजारांना नावं देताना कोणताही भौगोलिक संदर्भ, लोकांची, प्राण्यांची किंवा खाद्यपदार्थांची नावं दिली जाऊ नयेत, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. सार्स कोव्ह 2 या विषाणूमुळे निर्माण झालेल्या आजाराला कोविड-19 नाव देताना या तत्वांचं पालन करण्यात आलं आहे. चीनमध्ये हा डिसेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा या आजाराचा रुग्ण सापडला, पण याच्या नावावरून कुठेही चीनचा संदर्भ लागत नाही. शास्त्रीय पातळीवर या विषाणूच्या व्हेरिएंटसला नावं देताना गिसाईड, पॅंगो आणि नेक्स्टट्रेन या प्लॅटफॉर्मवरून दिली जातात.
आता कोरोना विषाणूच्या व्हेरियंटसची ही नवीन नावं माध्यमे आणि सर्वसामान्य जनतेत रुजतील अशी जागतिक आरोग्य संघटनेची अपेक्षा आहे. ही नावं प्रचलित नाही झाली तर मात्र गोंधळ वाढेल आणि लोक पुन्हा भौगोलिक ठिकाणांवरून ओळखल्या जाणाऱ्या नावांनीच या विषाणूचा उल्लेख करतील अशी भीती साथरोग तज्ज्ञ एम्मा होडक्रोफ़्ट यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus