पुणे, 23 ऑक्टोबर: गेल्या दीड ते दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीचा (Coronavirus Pandemic) सामना करत आहे. अनेक देशांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक लशींची निर्मिती केली आहे. यामध्ये भारताचाही समावेश असून, पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) या कंपनीत कोविशिल्ड लशीचं उत्पादन करण्यात येत आहे. जगभरातील गरीब राष्ट्रांना कोरोनाच्या लशी उपलब्ध करू देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ (UNICEF), कोअॅलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन (CEPI) आणि गावी (Gavi) यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हॅक्स (COVAX) नावाचा कार्यक्रम राबवला जात आहे. संयुक्त राष्ट्रांचं पाठबळ असलेली ‘Gavi’ ही संस्था जगभरात लसीकरण समन्वयाचं काम करत आहे. यामध्ये भारतातर्फे सीरम योगदान करत आहे. कोव्हॅक्स कार्यक्रमासाठी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सीरममधून कोरोना प्रतिबंधक लशीचे 2 ते 3 कोटी डोस निर्यात केले जाऊ शकतात, अशी माहिती कंपनीचे प्रमुख अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी न्यूज 18 डॉट कॉमला दिली आहे. लशींच्या निर्यातीसाठी कंपनी भारत सरकारच्या सूचनांच्या प्रतीक्षेत पाहत असल्याचंदेखील पूनावाला म्हणाले. लहान मुलांसाठीच्या लशीच्या चाचण्या सुरू असून, त्यांच्या निष्कर्षांची घाई केली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. वाचा- भारताच्या COVAXIN ला का मिळत नाही मंजुरी? WHO नं केला खुलासा सीरम इन्स्टिट्यूट ही भारतातली प्रमुख लस उत्पादन कंपनी आहे. कोरोना लसीकरण मोहिममध्ये कंपनीनं आतापर्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. सध्या कंपनीनं आपली उत्पादनक्षमता वाढवली असून, महिन्याकाठी 22 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे. लस निर्यातीसाठी आम्ही भारत सरकारच्या निर्देशांची वाट पाहत आहोत. सध्याची उत्पादन क्षमता आणि मागणी पाहता नोव्हेंबर व डिसेंबरपर्यंत 2 ते 3 कोटी डोस कोव्हॅक्स कार्यक्रमासाठी देणं शक्य आहे. जानेवारीपर्यंत ही संख्या वाढवण्याचीदेखील गरज आहे, असं कंपनीचे सीईओ पूनावाला यांनी सांगितलं. एप्रिल 2020 मध्ये गावी, डब्ल्यूएचओ, युनिसेफ आणि फ्रान्सद्वारे गरीब राष्ट्रांना लस देण्यासाठी कोव्हॅक्स कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. 25 मार्चपर्यंत भारताने कोव्हॅक्स कार्यक्रमासाठी कोविशिल्ड (covishield) लशीचे 2.8 कोटी डोसेस दिले होते. मार्च अखेरीस आणखी 4 कोटी आणि एप्रिलमध्ये 5 कोटी डोस भारतातून उपलब्ध होतील अशी आशा होती; मात्र भारतातल्या कोविड-19 संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता शासनाने लसनिर्यात थांबवली होती. वाचा- PM Narendra Modi: 100 कोटी लसीचा विक्रम, 130 कोटी देशवासीयांचे यश: पंतप्रधान कोविशिल्डचं उत्पादन आणखी वाढवण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. आमची सध्याची मासिक उत्पादन क्षमता 22 कोटी डोस इतकी आहे. एका महिन्यात 24 कोटी डोसनिर्मिती करण्याचं लक्ष्य असल्याचं पूनावाला म्हणाले. लहान मुलांसाठी फेब्रुवारीपर्यंत ‘कोवोव्हॅक्स’ नावाची कोरोना प्रतिबंधक लस आणण्याचा विचार सिरम करत आहे. या लशीच्या चाचण्यांमध्ये कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नसल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं. लहान मुलांवरच्या लशीच्या चाचण्या सध्या घेतल्या जात आहेत. हे काम अतिशय काळजीपूर्वक सुरू आहे. या चाचण्यांचे निष्कर्ष काढण्याची घाई केली जाणार नाही. कारण तशी घाई करण्याची सध्या गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. 1 अब्ज डोसमध्ये 88 कोटी डोस कोविशिल्डचे 21 ऑक्टोबर रोजी भारतानं कोरोना प्रतिबंध लशीचे 100 कोटी (1 अब्ज) डोस देण्याचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. 100 कोटी डोसपैकी 88 कोटी डोस कोविशिल्ड लशीचे होते. ‘महामारीविरुद्धच्या लढ्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली याचा आम्हाला आनंद आहे. अथक परिश्रम करणारं भारत सरकार, फ्रंट लाइन वर्कर्स आणि प्रत्येक आरोग्य कर्मचार्याला या गोष्टीचं श्रेय जातं,’ अशी प्रतिक्रिया आदर पूनावाला यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.