अमृतसर, 08 एप्रिल: कोरोनाची रुग्णसंख्या (Increasing Corona Cases in India) वेगाने वाढणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासोबतच पंजाबचाही (Punjab) समावेश आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढत आहे, की अनेकांना हॉस्पिटल मिळणं अवघड जात आहे. पंजाबमध्येही रुग्णवाढीचा वेग (Corona) तसाच आहे; मात्र अमृतसर (Amritsar) जिल्ह्यात अनेक हॉस्पिटल्समध्ये बेड्स रिकामे आहेत. याचं कारण दुसरं-तिसरं काहीही नसून, रुग्णावर अगदी शेवटच्या घटका मोजायची वेळ आल्याशिवाय त्याला नातेवाईकांकडून हॉस्पिटलमध्ये दाखलच केलं जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे.
अमृतसरमध्ये बुधवारी (सात एप्रिल) 325 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर सात जणांचा मृत्यू झाला. अमृतसर शहरात एप्रिल महिन्यात आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 731 झाली आहे. सध्या अमृतसरमध्ये 3218 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
'नागरिक कोरोनाबाधितांवर घरच्या घरी उपचार करण्यावरच भर देत असून, रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यानंतरच त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं जात आहे. त्यामुळे मृतांचं प्रमाण जास्त आहे,' असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अमृतसर हा कोरोनाचा सर्वांत जास्त फटका बसलेल्या जिल्ह्यांपैकी एक असून, पहिल्यापेक्षाही दुसरी लाट (Second Wave) अधिक घातक ठरत आहे.
(हे वाचा-Dharmesh कोरोना पॉझिटिव्ह, Dance Deewane 3 च्या सेटवर 18 जणांना झाली होती लागण
अमृतसरच्या गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये 115 व्हेंटिलेटर्स (Ventilators) असून, त्यापैकी 87 कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. शहरात असलेल्या लष्करी रुग्णालयांमधल्या सातपैकी तीन व्हेंटिलेटर्स कोविड रुग्णांसाठी असून, 25 खासगी हॉस्पिटल्समधल्या 279पैकी 176 व्हेंटिलेटर्स कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत. सगळ्या हॉस्पिटल्सचा विचार केला, तर ताज्या स्थितीनुसार 623 बेड्स रिकामे आहेत.
'बहुतांश रुग्ण गंभीर स्थिती झाल्यावर रुग्णालयात येतात. नागरिक आजही प्राथमिक लक्षणं लपवत आहेत आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णालयात येत आहेत. अनेक रुग्ण कोविड-19मधून बरं होण्यासाठी यू-ट्यूबवर दिलेल्या सगळ्या टिप्स वापरूनही काही उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर मग आमच्याकडे येतात. त्यामुळे आमच्याकडे हॉस्पिटल्समध्ये अद्याप जागा शिल्लक आहेत. रुग्णवाढ वेगाने होत राहिली, तर हॉस्पिटलमध्ये जागा मिळणार नाही. लसीकरण (Vaccination) हा एकमेव आशेचा किरण आहे,' असं गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यानी सांगितलं आहे.
(हे वाचा-'कोरोनामुळे कमी, लॉकडाऊनमुळे मरू...', पुणेकर व्यापाऱ्यांकडून निर्बंधांचा निषेध)
अमृतसर जिल्ह्यात लसीकरणाचं प्रमाणही कमीच आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या 86 हजार जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी केवळ 2.09 टक्के जणांचं लसीकरण पूर्ण झालं.
पंजाबात बुधवारी 63 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांची संख्या 7278 झाली. बुधवारी 2997 नव्या बाधितांची राज्यात नोंद झाली आणि एकूण रुग्णांचा आकडा 2.6 लाखांपर्यंत पोहोचला, असं आरोग्य विभागाने सांगितलं. सक्रिय रुग्णांची संख्या एका दिवसापूर्वी 25 हजार 913 होती, ती आता 25 हजार 855वर आली आहे. बुधवारी 2959 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख 26 हजार 887 झाली असल्याची माहिती राज्याच्या अधिकृत बुलेटिनमध्ये दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Punjab