मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनाच्या नवनवीन स्ट्रेनपुढे लशीचा प्रभावही होतोय कमी; तिसरा डोस ठरणार फायद्याचा?

कोरोनाच्या नवनवीन स्ट्रेनपुढे लशीचा प्रभावही होतोय कमी; तिसरा डोस ठरणार फायद्याचा?

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार कोविड-19 प्रतिबंधक लशीचा (Covid-19 Vaccine) प्रभाव कमी होत आहे. विशेषत: अमेरिका आणि इस्रायलमध्ये लशीच्या प्रभावामध्ये लक्षणीय घट झाली आहे.

  नवी दिल्ली 27 सप्टेंबर : सध्या जगभरात कोविड प्रतिबंधक लसीकरणाची (COVID-19 Vaccination) मोहीम जोरात सुरू आहे. मात्र अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार कोविड-19 प्रतिबंधक लशीचा (Covid-19 Vaccine) प्रभाव कमी होत आहे. विशेषत: अमेरिका आणि इस्रायलमध्ये लशीच्या प्रभावामध्ये लक्षणीय घट झाली आहे. असं असलं, तरी रुग्ण गंभीररित्या आजारी पडण्याचं प्रमाण लशीमुळे कमी होत आहे. 2021च्या सुरुवातीला ज्यांनी लस घेतली, त्यांना आता कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. ज्यांनी नंतर लस घेतली त्यांच्यामध्ये हा धोका कमी असल्याचं इस्रायलमध्ये झालेल्या एका अभ्यासात निदर्शनास आलं. ही परिस्थिती पाहता, चिंता करण्याची गरज आहे का, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. मात्र लसीकरण झालेल्या नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही.

  लस घेऊनही कोविडची लागण होत असली, तरी शरीरावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी आहे. परिणामी, रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तातही तसं म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा जानेवारी 2021 एवढीच सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती; मात्र लसीकरण वाढलेलं असल्यामुळे मृत्यूचं प्रमाण 10 टक्केच होतं.

  चिंताजनक..! कोरोनामुळं वजन कमी होणं आणि कुपोषणाचा धोका वाढलाय; डॉक्टरांचा इशारा

  रोगप्रतिकारशक्ती व्यक्तीला आजारी पाडणाऱ्या अनेक घटकांपासून सुरक्षित ठेवण्याचं काम करते; मात्र ही रोगप्रतिकार प्रणाली अतिशय किचकट आहे. एखादा विषाणू आपल्या शरीराला प्रामुख्याने सर्क्युलेशन सिस्टीम आणि कोशिका या दोन ठिकाणी बाधित करतो. सर्क्युलेशन सिस्टीमच्या माध्यमातून तो आपल्या पूर्ण शरीरात पसरतो आणि कोशिकांमध्ये जाऊन तो आपली संख्या वाढवण्याचे काम करतो. गंमत म्हणजे या दोन्ही ठिकाणी रोगप्रतिकारशक्ती वेगळ्या पद्धतीने काम करते. शरीरात अँटीबॉडी असतील तर शरीरातला व्हायरस त्यातल्या प्रथिनांमध्ये लॉक होतो आणि इतर पेशींना संसर्ग करण्याची क्षमता त्याच्यात राहत नाही. कालांतराने अँटीबॉडीमुळे तो नष्ट होतो. या अँटीबॉडीजना फर्स्ट लाइन डिफेन्स असंही म्हणतात; मात्र एखादा विषाणू पेशींना संसर्ग करण्यास सक्षम होतो. अशा परिस्थितीत, रोगप्रतिकारशक्तीतली दुसरी संरक्षण प्रणाली सक्रिय होते.

  इंडियन एक्सप्रेसमध्ये डॉ. तुषार गोरे यांनी लिहिलेल्या लेखानुसार या दुसऱ्या संरक्षण प्रणालीला किलर टी-सेल असंही म्हटलं जातं. शरीरातल्या ज्या पेशींमध्ये विषाणूंचा संसर्ग झाला आहे, त्यांना टार्गेट करण्याचं काम या किलर टी सेल्स करतात. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, जेव्हा विषाणू आपल्या पेशींना पूर्णपणे संक्रमित करतो तेव्हाची स्थिती गंभीर समजली जाते. अशा परिस्थितीत शरीरात एक मजबूत टी-सेल रोगप्रतिकारक प्रणाली असेल तर नक्कीच आपलं संरक्षण होतं.

  चिंताजनक बातमी! पुन्हा एकदा भायखळा तुरुंगात कोरोनाचा हैदोस

  लसीकरणामुळे अँटीबॉडी आणि किलर टी-सेल (T Cell) या दोन्ही प्रणाली मजबूत होण्यास मदत होते. लस घेतल्यानंतर जसे दिवस वाढत जातात, तसतसा अँटीबॉडी स्तर कमी होत जातो. हे आपण टाळू शकत नाही. मात्र, रोगप्रतिकारक प्रणालीला स्वत:ची एक मेमरी असते. त्यामुळे जेव्हा गरज भासते, तेव्हा ऑन-डिमांड अँटीबॉडी तयार होऊ शकतात. ही प्रक्रिया काहीशी वेळखाऊ आहे. परिणामी या काळात लस घेतलेली एखादी व्यक्ती संक्रमित होऊ शकते; मात्र संक्रमणाची तीव्रता नक्कीच कमी असते. लस निर्मितीच्या वेळी जो स्ट्रेन अस्तित्वात असतो तो लक्षात घेऊन लस तयार केली गेली जाते. कोविडच्या लशीबाबतही हेच झालं आहे. नंतर मात्र विविध स्ट्रेन अस्तित्वात आले. त्यांच्याशी सामना करणं रोगप्रतिकारक प्रणालीसाठी काहीसं कठीण ठरलं. म्हणूनदेखील अनेकांना लस घेऊनही कोविडची लागण झाली.

  लशीचा तिसरा डोस प्रभावी ठरेल का?

  आता तिसरा बूस्टर डोस (Booster Dose) देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. तो प्रभावी ठरेल का असा प्रश्न पडला आहे. लशीचे दोन डोस हॉस्पिटलायझेशन टाळण्यासाठी मदत करतात, हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. तिसरा डोस घेतला तर तो प्रामुख्याने विषाणू संसर्गाविरुद्ध शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकतो. नुकत्याच उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या डोसनंतर व्यक्तीच्या अँटीबॉडीच्या (Antibody Level) पातळीत वाढ दिसून आली आहे. त्यामुळे आता देशातील हाय रिस्क पॉप्युलेशनला तिसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडप्रतिबंधक सध्या उपलब्ध असलेल्या सर्व लशी कोरोना विषाणूच्या वुहान स्ट्रेननुसार आहेत. नंतर विविध स्ट्रेन्स विकसित झाले आहेत. लशीचे दोन डोस घेऊनही संसर्ग होत असेल तर त्याला तिसरा डोस तरी किती दिवस रोखू शकतो, हादेखील मोठा प्रश्न आहे. याशिवाय अनेकांनी अद्याप लशीचा पहिलाच डोस घेतलेला नाही तर त्यांना बूस्टर डोस देण्यात काही अर्थच राहत नाही.

  Maharashtra Unlock : प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम?

  भारताचा विचार केला तर, अद्याप मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण बाकी आहे. लशीच्या दोन डोसचा प्रभाव किती आणि तिसरा डोस देणं गरजेचं आहे का, या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल असा कोणताही संशोधनविषयक डेटा भारतात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करणं, हाच चांगला पर्याय आहे. याशिवाय विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, मास्कचा वापर, सामाजिक अंतर, स्वच्छता आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं या उपाययोजना करणं आवश्यक आहे.

  First published:

  Tags: Corona vaccination, Corona vaccine