नवी दिल्ली 07 जून : देशात कोरोना विषाणूपासून (Coronavirus) बचावासाठी लसीकरण मोहीम (Vaccination Drive) राबवण्यात येत आहे. यासाठी प्रामुख्यानं सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) ‘कोव्हिशिल्ड’ (Covishield) आणि भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) ‘कोव्हॅक्सिन’ (Covaxin) या दोन लसींचा वापर केला जात आहे. या दोन्ही लसीसंदर्भात अनेकदा कोणती लस अधिक प्रभावी याबाबत वाद निर्माण झाले आहेत. आता एका नवीन संशोधनानुसार, ‘कोव्हॅक्सिन’च्या तुलनेत ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरीरात अधिक प्रमाणात अँटीबॉडीज (Antibodies) निर्माण होतात, असा निष्कर्ष पुढे आला आहे.
कोरोना व्हॅक्सिन इंडक्टेड अँटीबॉडीज टायटर म्हणजेच कोव्हॅट (COVAT) अंतर्गत करण्यात आलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ यापैकी कोणत्याही एका लसीचे दोन डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. कोरोनाचा संसर्ग न झालेल्या मात्र दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांचीच या संशोधनासाठी निवड करण्यात आली होती.
कोव्हिशिल्डचा डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये सेरोपॉझिटिव्हिटी अँटी-स्पाइक अँटीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण हे कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांपेक्षा अधिक होतं, असं या अभ्यासामध्ये आढळून आलं आहे. मात्र अद्याप हा अभ्यास अहवाल प्रकाशित झालेला नसून त्यावरील काम सुरु असल्यानं सध्या त्याचा वापर क्लिनिकल प्रॅक्टीससाठी करता येणार नाही. सध्या सुरु असणाऱ्या संशोधनानंतर दोन्ही डोसचा रोगप्रतिकारशक्तीवर काय परिणाम होतो हे स्पष्ट होणार आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींमुळे चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचं संशोधकांनी नमूद केलं आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरात मोठ्या संख्येनं अँटीबॉडीज तयार होतात, मात्र सेरोपॉझिटिव्हिटी रेट कोव्हिशिल्ड घेतलेल्यांमध्ये अधिक असल्याचं दिसून आलं आहे. सेरोपॉझिटिव्हिटी म्हणजे अँटीबॉडीज शरीरामध्ये असतानाच विषाणूला प्रतिसाद आणि अँटी-स्पाइक अँटीबॉडीज निर्माण करण्याची क्षमता.
'ब्लू टीक' पेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोदींना टोला
या अभ्यासात 552 आरोग्य कर्मचाऱ्यांचा (Health Workers) समावेश होता. यापैकी 325 पुरुष तर 227 महिला होत्या. 456 जणांनी कोव्हिशिल्डचा तर 96 जणांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. लस देण्यात आल्यानंतर 21 दिवस तसंच दुसऱ्या डोसला सहा महिने पूर्ण होण्याआधी चार वेळा नमूने घेण्यात आले. पहिल्या डोसनंतर 79.03 टक्के सेरोपॉझिटिव्हिटी रेट दिसून आला. कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज टायटर 115 AU/ml तर कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये ते 51 AU/ml होतं, असं या अभ्यासात आढळून आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine