मुंबई, 10 मार्च: महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसचा संसर्ग तीव्रतेने वाढत आहे. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही जिल्ह्यात लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाची (Covid 19) वाढ रोखण्यासाठी राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या पथकासह 7 कलमी रणनीती तयार केली आहे. यामध्ये यूनिवर्सल टेस्टिंगचा समावेश देखील करण्यात आला आहे. यानुसार कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या भागात कोरोना संक्रमित ओळखण्यासाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) किंवा रॅपिड अँटीजन किट्ससह कोरोना चाचणी देखील समाविष्ट आहे. यामध्ये, 48 तासांच्या आत कोरोनाचे संसर्ग ओळखले जातात. ज्या तज्ज्ञांनी ही रणनीती तयार केली आहे, त्यांनी नागपूर, पुणे, मुंबई, अमरावती, यवतमाळ आणि ठाणे येथील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पातळीचा आढावा घेतला आहे. यानंतर सर्वच जिल्ह्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकचं रणनीती अवलंबली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, कोरोना सेंटरमध्ये लोकांना क्वारंटाइन करण, कोरोनामधील मृत्यूंचे ऑडिट आणि सामाजिक कार्यक्रमांवर काही निर्बंध आणले जावेत अशा आणखी काही सूचना सुद्धा त्यांनी केल्या आहेत. (हे वाचा - Corona Vaccine: लसीचे महिलांवर होताहेत सर्वाधिक साइड इफेक्ट्स ) मंगळवारी आरोग्य सचिव डॉ. व्यास म्हणाले की, ‘सर्व जिल्ह्यांना या प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल. तसेच सर्व जिल्हा अधिकारी सविस्तर रिपोर्ट देतील अशी आशा आहे. मागील 12 दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या बरीच वाढली आहे. त्यातील सर्वात संवेदनशील विदर्भ, मराठवाडा, पुणे आणि मुंबई विभाग आहेत.’ केंद्राच्या टीमने सुद्धा या विभागांचा दौरा केला आहे आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. कोरोनाविरूद्ध हे नवीन धोरण सर्व जिल्ह्यात अवलंबलं जाईल, असं राज्य पर्यवेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे, राज्य तांत्रिक तज्ज्ञ डॉ. सुभाष साळुंके म्हणाले की, लोकांनी ‘एसएमएस’ धोरण अवलंबलं पाहिजे. या अंतर्गत, सॅनिटायझर, मुखवटा आणि सामाजिक अंतर समाविष्ट केलं गेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.