नवी दिल्ली 27 मार्च : देशात कोरोनाबाधितांचा आकडा आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी कोरोना विषाणूची 1890 नवीन प्रकरणं नोंदवली गेली, जी गेल्या 210 दिवसांतील सर्वाधिक होती. गेल्या सात दिवसांतील प्रकरणांची तुलना त्याआधीच्या सात दिवसांशी केल्यास, कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या काळात मृत्यूची संख्याही 19 वरुन 29 वर पोहोचली आहे. शनिवारी समोर आलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या वर्षी 22 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच सर्वाधिक होता, तेव्हा 1,988 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती.
धोक्याची घंटा! कोरोना संसर्गाने पुन्हा वाढवली चिंता; 10-11 एप्रिलला देशभरात मॉक ड्रिल
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या सात दिवसांत (19-25 मार्च) भारतात कोरोना विषाणूची 8,781 नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत, जी मागील सात दिवसांतील 4,929 पेक्षा 78 टक्के जास्त आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून देशात कोविडचा संसर्ग वाढत आहे. देशातील दैनंदिन प्रकरणं आठ दिवसांत दुप्पट होत आहेत. दैनंदिन प्रकरणांची सात दिवसांची सरासरी शनिवारपर्यंत 1,254 वर पोहोचली होती, जी आठ दिवस आधी (17 मार्च) 626 होती.
महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढले -
सलग दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांत देशात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 19 ते 25 मार्च दरम्यान महाराष्ट्रात 1,956 प्रकरणं समोर आली आहेत. 12 मार्च ते 19 मार्च या कालावधीत 1,165 प्रकरणं समोर आली होती. हा आकडा आता 68 टक्के अधिक आहे. बहुतेक राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये हरियाणा, दिल्ली, यूपी, गुजरात, हिमाचल आणि गोवा यांचा समावेश आहे.
दिल्लीतही रुग्णसंख्येत वाढ -
रविवारी दिल्लीत कोरोना विषाणूची 153 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आणि या काळात संसर्ग दर 9.13 टक्क्यांवर पोहोचला. आरोग्य विभागाने शेअर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिल्लीत 4.98 टक्के संसर्ग दरासह 139 प्रकरणे नोंदवली गेली. शुक्रवारी, 6.66 टक्के संसर्ग दरासह 152 प्रकरणे नोंदवली गेली, तर गुरुवारी 4.95 टक्के संसर्ग दरासह 117 प्रकरणे नोंदवली गेली. राष्ट्रीय राजधानीत गेल्या ऑक्टोबरमध्ये तीन अंकी प्रकरणांची नोंद झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates