Home /News /coronavirus-latest-news /

Work From Home राहणार! घरूनच काम करणं सुरू ठेवायचा 87 टक्के भारतीय उद्योगांचा विचार

Work From Home राहणार! घरूनच काम करणं सुरू ठेवायचा 87 टक्के भारतीय उद्योगांचा विचार

अनेक कंपन्यांमध्ये कोरोनामुळे (Coronavirus Pandemic) सुरू झालेली work from home पद्धत सुरुवातीला काही दिवस असेल असं वाटत असताना अखेर वर्ष उलटून गेलं आहे. हीच पद्धत कायमसाठी सुरू ठेवण्यासाठी 87 टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत आहेत

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 30मार्च: अनेक कंपन्यांमध्ये कोरोनामुळे सुरू झालेली 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) पद्धत सुरुवातीला काही दिवस असेल असं वाटत असताना अखेर वर्ष उलटून गेलं आहे. कोरोना (Corona) कमी झाला असं वाटत असताना त्याने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दरम्यान, 'वर्क फ्रॉम होम' ही पद्धत कायमसाठीच सुरू ठेवण्यासाठी 87 टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत आहेत, असं बीसीजी आणि झूम (ZOOM) या कंपन्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे. तसंच, सर्वेक्षण केलेल्या उद्योगांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' किंवा ऑफिसबाहेरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत तब्बल तिपटीने वाढ झाली असल्याचं निरीक्षणही या सर्वेक्षणावर आधारित अहवालात नोंदवण्यात आलं आहे. कोविड महामारीच्या काळात ऑफिसबाहेरून काम करण्याचा आणि त्यावर शोधण्यात आलेल्या व्हिडिओ संवादरूपी उपायाचा परिणाम किती आणि कसा झाला, हे तपासण्यासाठी झूम या कंपनीने बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपकडे (BCG) सर्वेक्षण आणि आर्थिक विश्लेषणाचं काम सोपवलं. मोठ्या आर्थिक मंदीच्या (Economic Turmoil) काळात उद्योग-व्यवसाय कायम सुरू राखण्यासाठी किंवा काही उदाहरणांत त्यात वाढ करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा (Video Conferencing) उद्योग-व्यवसायांना कसा उपयोग झाला, यावर लक्ष केंद्रित करून हे सर्वेक्षण करण्यात आलं. 'बीसीजी'ने सर्वेक्षणातून गोळा केलेली माहिती आणि नोंदवलेली निरीक्षणं यांच्या आधारावर झूम कंपनीने अहवाल तयार केला. हा अहवाल भारत, अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स आणि जर्मनी या सहा देशांतल्या महत्त्वाच्या उद्योग व्यवसायांबद्दलच्या निरीक्षणांवर आधारित आहे. सर्वेक्षण केलेल्या उद्योग-व्यवसायांच्या बाबतीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये व्यतीत केलेल्या कालावधीत तीन ते पाच पटींनी वाढ झाली. बीसीजीने कोविड-19 काळात कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेणारं एक सर्वेक्षणही केलं होतं. सर्वेक्षण केलेल्यापैकी 70 टक्के मॅनेजर्स महामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत आता ऑफिसबाहेरून काम करण्याच्या लवचिक मॉडेलचा अधिक खुलेपणाने विचार करत आहेत. तसंच, महामारीपूर्वीच्या तुलनेत एक तृतीयांशहून अधिक कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये न येता काम करावं, असं उद्योग-व्यवसायांना वाटत असल्याचंही या सर्वेक्षणातून दिसून आलं. (हे वाचा: '...तर मुंबईत दिवसाला 10 हजार रुग्ण आढळतील', कोरोना स्थितीबाबत आयुक्तांचा इशारा  ) कोरोना महासाथीच्या (Pandemic) थैमानामुळे जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आलं. त्यामुळे लोकांना ऑफिसमध्ये न जाता घरूनच काम करण्याची पद्धत, तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपाय आदींची वेगाने अंमलबजावणी केली. 'वर्क फ्रॉम होम'ची प्रभावीपणे आणि सुरळीतपणे अंमलबजावणी झाल्यामुळे या देशांतले उद्योग-व्यवसाय पैशांची बचत करू शकले. महामारीमुळे झालेल्या लॉकडाउनमुळे कित्येक जण बेरोजगार झाले, ही गोष्ट खरीच; पण वर्क फ्रॉम होम आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय यांच्या अंमलबजावणीमुळे अनेकांच्या नोकऱ्या वाचूही शकल्या. उदाहरणार्थ, एकट्या अमेरिकेत या पद्धतीमुळे 2.28 दशलक्ष नोकऱ्या वाचल्या. थोडक्यात सांगायचं तर, यामुळे बेरोजगारीच्या समस्येची तीव्रता कमी होण्यास हातभार लागला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या पर्यायामुळे लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आणि पुढेही होणार आहे. किती कर्मचाऱ्यांनी 2019, 2020मध्ये हे तंत्र वापरलं आणि 2022मध्ये किती कर्मचारी ते वापरतील, याबद्दलही उद्योग-व्यवसायांना विचारण्यात आलं. या सर्वेक्षणात एंटरप्रायजेस आणि लघू ते मध्यम आकाराच्या उद्योग-व्यवसायांचा समावेश करण्यात आला होता.
    First published:

    Tags: Business News, Corona updates, Coronavirus

    पुढील बातम्या