नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : देशात दिवाळीपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. अद्याप देशात लसीकरणाला सुरुवात झाली नाही आहे, त्यामुळे सध्या या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क वापरणं हा एकमेव उपाय आहे. नवी दिल्लीत सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण्यावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीतील सदर बझार भागात मास्क बँक स्थापन करण्यात आली आहे. उत्तर दिल्लीचे महापौर जय प्रकाश यांच्या हस्ते बुधवारी या बँकेचे उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
दिल्ली पोलीस आणि उत्तर दिल्ली महापालिका यांच्या सहकार्याने बारह तुती चौकात ही मास्क बँक स्थापन करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला मास्कची गरज आहे, त्यांना या बँकेतून मोफत मास्क मिळणार आहे. तसेच ज्यांना मास्क दान करायचे आहेत, ते ही इथे आणून देऊ शकतात, असं या निवेदनात म्हटले आहे.
वाचा-कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा सुरुवातीचा निकाल किती महत्त्वाचा आहे?
मोठ्या बाजारपेठांमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यात गरीब कामगार, व्यावसायिक, ग्राहक यांचा समावेश असतो. मास्क नसेल तर दोन हजार रुपये दंड आहे, गरीब कामगारांना इतका दंड भरणे परवडू शकत नाही. त्यामुळे मोफत मास्क पुरवण्याच्या उद्देशाने उत्तर दिल्ली महानगर पालिका आणि दिल्ली पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानं ही मास्क बँक स्थापन करण्यात आल्याचं प्रकाश यांनी म्हटले आहे.
वाचा-रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल काटा
दिल्लीत कोव्हिड-19 रुग्णांची संख्या वाढत असून, मृत्यू दरही अधिक आहे. दिल्लीतील कोरोनाबाधितांचे प्रमाण 8.49 टक्के आहे. या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याबाबतचे नियम अधिक कठोर करण्यात येत असून दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारनं गेल्या आठवड्यात मास्क घातला नसेल तर करण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम 500 रुपयांवरून दोन हजार रुपये केली आहे.
वाचा-कित्येकांना वाचवलं पण स्वत: मात्र हरला; 26 वर्षीय कोरोना योद्धानं जीव गमावला
‘कोव्हिड-19 पासून लोकांना वाचवणं हा आमचा उद्देश आहे. उत्तर दिल्लीतील प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे 104 मास्क बँका स्थापन करण्याची आमची योजना आहे,’ असेही प्रकाश यांनी या निवेदनात म्हटले आहे.