पाटणा, 29 डिसेंबर : एकीकडे देशात सध्या कोरोनाचा (Corona) नवा व्हेरियंट (Variant) असलेल्या ओमिक्रॉननेबाधित (Omicron) रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे कोरोनाबाधितांचा आकडाही वाढत आहे. सध्याची रुग्णसंख्या पाहता देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागल्याचं चित्र आहे. अशात आता एका राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे, हे राज्य म्हणजे बिहार (Bihar corona third wave).
बिहारमध्ये कोरोनाची तिसरी लाट (Third wave) सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांनी दिली आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 47 नवे रुग्ण आढळले असताना त्यांचे हे वक्तव्य आले आहे.
"राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी (Health Workers) देखील तयारी केलेली आहे", अशी माहिती मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना दिली. "कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत डॉक्टरांनी दिलेलं योगदान प्रशंसनीय आहे", असं देखील ते म्हणाले.
हे वाचा - महाराष्ट्रात तिसरी लाट निश्चित?, Covid टास्क फोर्सनं घेतला मोठा निर्णय
यावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, "कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांसमवेत बैठका घेतल्या होत्या. राज्यातील काही डॉक्टरांसमवेत आम्ही देखील बैठका घेतल्या आहेत. कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेलं योगदान प्रशंसनीय आहे. तुम्ही लसीकरणावर संशोधन करून कौतुकास्पद काम केलं आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावर तयारी केली जात आहे".
बुधवारी देशात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 44 टक्क्यांनी विक्रमी वाढ झालेली आहे. एका दिवसात 9195 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 7347 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patients) संख्या 77 हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 781 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली.
हे वाचा - Corona Virus कधी होणार सामान्य?, तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 9195 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 77,022 वर पोहोचली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. दिल्लीत ओमिक्रॉनबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंदली गेली आहे. दिल्लीत ओमिक्रॉनबाधित रुग्ण संख्या 238 वर पोहोचली असून, त्यापैकी 57 रुग्ण बरे झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Coronavirus, Nitish kumar