नवी दिल्ली 25 डिसेंबर : कोरोनाच्या नवीन लाटेच्या भीतीमुळे केंद्र सरकारने गेल्या तीन-चार दिवसांत कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला आहे आणि राज्यांना नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारी सूत्रांनी सांगितलं की, आता कोरोना संसर्गाच्या तीव्रतेवर आणि जीनोम सिक्वेन्सिंगच्या परिणामांवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे तात्काळ कडक नियम होण्याची शक्यता नाही. संक्रमणामध्ये गुणात्मक वाढ तर होत नाही ना, हे पाहिलं जाईल. वाढ होत असल्याचं दिसल्यास वेळेनुसार प्रभावी पावलं उचलली जातील.
सरकारची तयारी पाहून लोकही धास्तावले आहेत आणि सावध होत आहेत. परंतु तज्ञ म्हणतात की सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आणि आता घाबरण्याची गरज नाही. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दैनंदिन चाचण्या वाढल्याने संक्रमित लोकांची संख्या वाढेल, परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ गुणात्मक पद्धतीने होत नाही. म्हणजेच दररोज बाधितांची संख्या दुप्पट किंवा त्याहून अधिक वाढत नाही. कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा कोविडच्या तीन लाटा आल्या तेव्हा त्याच वेगाने संसर्ग वाढला आणि दीड महिन्यात ते प्रमाण लाखांवर पोहोचले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सरासरी 1.25 लाख कोरोना चाचण्या केल्या जात आहेत आणि दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्या दोनशेहून कमी आहे. संसर्ग दर 0.15 टक्के किंवा त्याहून कमी आहे. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून हा दर सर्वात कमी आहे. त्यामुळे आता काळजी करण्यासारखे काही नाही.
चीनसह इतर काही देशांमध्ये वाढत्या केसेस पाहता कोरोना व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यासाठी आता काही उपाय केले जात आहेत. कारण गेल्या दोन वर्षांत भारताने महामारीच्या काळात ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे. मॉनिटरिंग, कोरोना तपासणी, जीनोम सिक्वेन्सिंग, हॉस्पिटलमधील लाईफ सपोर्ट सिस्टिम, ऑक्सिजनची उपलब्धता आदी बाबी यात महत्त्वाच्या आहेत.
चीनसह जगभरात कोरोनाचा हाहाकार; दरम्यान भारतासाठी समोर आली अतिशय दिलासादायक बातमी
दुसरा प्रयत्न म्हणजे बहुतेक प्रकरणांसाठी जीनोम सिक्वेन्सिंग करणं आवश्यक आहे. यामुळे कोविडचे कोणताही नवा व्हेरिएंट वेळेतच समजेल. अल्फा, डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकार आणि त्याचे अनेक उप-प्रकार इथे आहेत आणि भारतीयांनी त्यांच्याविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित केली आहे. चीनमध्ये कहर करत असलेल्या Omicron च्या BF.7 सब-व्हेरियंटचाही भारताला धोका नाही. तो जुलैपासून भारतात आहे. पण आणखी संसर्गजन्य नवीन प्रकार जन्माला आल्यास धोका वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Lockdown