मुंबई, 19 ऑक्टोबर- कोरोना महामारीची तीव्रता एकदम कमी झाली असली तरी अधूनमधून काही ठिकाणी रुग्ण आढळत आहेत. आता काही नवीन सब-व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. 'ओमिक्रॉन स्पॉन' आणि एक्सबीबी असं नाव असलेल्या या सब-व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईचा विचार केला तर गेल्या तीन दिवसांत मुंबईत कोविडच्या 150 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी 10 जणांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. शुक्रवारी राज्यात 477 नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 178 रुग्ण मुंबईत आहेत. महाराष्ट्रात एक्सबीबी या सब-व्हेरियंटचेही रुग्ण आढळले आहेत. या कारणास्तव, तज्ज्ञ नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. दिवाळीच्या आधी आणि नंतर बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि केरळ राज्यात अॅडव्हायझरी जारी केली आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, मुंबईच्या आरोग्य अधिकार्यांचे मत आहे की, हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते मुंबईतील इन्फ्लूएन्झा सारख्या आजारांच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण हा एक संसर्गजन्य रोग आहे. शिंकण्याद्वारे तो पसरू शकतो. काही व्यक्तिंना कोरोनाची लागण झालेली असू शकते. ते सामान्य सर्दी-खोकला समजून कोविड चाचणी करत नाहीत. त्यामुळे इतरांनाही संक्रमित करण्यासाठी विषाणूला वेळ मिळतो. कोविड-19 पासून दूर राहण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
(हे वाचा:चिंता वाढली! Omicron च्या नव्या व्हेरिएंटचा भारतात प्रसार, कितपत घातक आाहे हा विषाणू? )
ओमिक्रॉनचा आणखी एक सब-व्हेरियंट तयार
फरीदाबाद येथील एशियन हॉस्पिटलमधील कन्सल्टंट फिजिशियन आणि संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. चारू दत्त अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ओमिक्रॉन स्पॉन' नावाचा एक नवीन सब-व्हेरियंट तयार झाला आहे. त्याला BA.5.1.7 आणि BF7 असंही म्हटलं जाते. सर्वात अगोदर मंगोलिया आणि चीनमध्ये या सब-व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण सापडले होते. गेल्या दोन आठवड्यांत युनायटेड स्टेट्समध्ये ओमिक्रॉन स्पॉनची रुग्णसंख्या दुप्पट (0.8 ते 1.7 टक्के) झाल्याची नोंद आहे. यूके, जर्मनी आणि फ्रान्स सारख्या युरोपियन देशांमध्येही या सब-व्हेरियंच्या रुग्णसंख्येत 15 ते 25 टक्के वाढ झाली आहे."
नवीन सब-व्हेरियंटची लक्षणं
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप व्हॅक्सिनेशनचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन सब-व्हेरियंटची लक्षणं कोविड-19च्या इतर व्हेरियंटसारखीच आहेत. अंगदुखी हे या प्रकाराचं मुख्य लक्षण आहे. याशिवाय सर्दी, खोकलादेखील याची लक्षणं असू शकतात.
ओमिक्रॉनचा संसर्ग कमी राहील
मुंबईतील कोविड टास्क फोर्सचा भाग असलेले डॉ. राहुल पंडित यांच्या म्हणण्यानुसार, "गेल्या काही काळापासून रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसत आहे. नवीन प्रकार येईपर्यंत ओमिक्रॉनची संसर्गजन्यता कमी असेल. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र, प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क घालण्यास सुरुवात करावी. कुटुंबातील कोणी आजारी असेल किंवा त्याची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल, तर मास्क लावण्याचा सल्ला दिला पाहिजे."मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, बीएमसीच्यावतीने इन्फ्लूएन्झा सदृश आजार आणि गंभीर श्वसन संसर्ग असलेल्या रूग्णांची वेगाने चाचणी केली जात आहे. ज्यामध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटचा समावेश आहे. सर्व रुग्णालयांतून संशयित रुग्णांचे नमुने जमा केले जात आहेत. जर, एखाद्याचा रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला तर त्याची जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे चाचणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Covid cases