मुंबई 14 ऑक्टोबर : कोरोना महामारीची तीव्रता एकदम कमी झाली असली तर अधूनमधून काही ठिकाणी रुग्ण आढळत आहेत. आता काही राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या नवीन सब-व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. एक्सबीबी (XBB) असं नाव असलेल्या या सब-व्हेरियंटची लागण झालेल्या 71 रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. गुरुवारी (13 ऑक्टोबर) महाराष्ट्रामध्ये एक्सबीबीच्या पाच रुग्णांची नोंद झाली. याशिवाय, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तमिळनाडू या राज्यांमध्येही एक्सबीबीचे रुग्ण सापडले आहेत. अहवालानुसार, ओडिशामध्ये एका पंधरवड्यात 33, बंगालमध्ये 17 आणि तमिळनाडूमध्ये 16 एक्सबीबीचे रुग्ण सापडले आहेत. ओमिक्रॉन एक्सबीबी सब-व्हेरियंटला BA.2.10 असंही म्हणतात. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, डेन्मार्क, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक देशांमध्ये विषाणूचा हा प्रकार आढळला आहे. सिंगापूरमध्येही एक्सबीबी रुग्णसंख्येची वाढ होत आहे. मात्र, अद्याप त्याचे गंभीर परिणाम निदर्शनास आलेले नाहीत, असं तेथील आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. दरम्यान, डब्ल्युएचओने ओमिक्रॉनला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे त्याच्या सबव्हेरियंट्सलाही त्याच गटात टाकण्यात आलं आहे. धक्कादायक! सर्जरीनंतर डॉक्टरांकडून महिलेच्या पोटातच राहिली कात्री; 5 वर्षांनंतर घडलं भयंकर भारतात कोरोनाच्या जीनोम सिक्वेन्सिंगबद्दल संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी गुरुवारी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, BA.2.75 (ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट) अंदाजे 88 टक्के नवीन संक्रमणांसाठी जबाबदार आहे. तर, एक्सबीबी हा सब-व्हेरियंट अंदाजे सात टक्के संक्रमणास जबाबदार आहे. तपासणी केलेल्या नमुन्यांमध्ये BA.5 या व्हेरियंटचा प्रसार आता पाच टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. “एक्सबीबी ही ओमिक्रॉनची दुसरी हायब्रीड आवृत्ती आहे. आम्ही महाराष्ट्रातील त्याच्या प्रसारावर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत,” असं जीनोम सिक्वेन्सिंगचे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. सध्या एक्सबीबी हा सिंगापूरमधील इतर सर्व ओमिक्रॉन सब-व्हेरियंट्सवर वरचढ ठरत आहे. डॉ. कार्यकर्ते म्हणाले की, एक्सबीबी जगाच्या अनेक भागांमध्ये आढळला आहे. परंतु, सिंगापूरमध्ये तो वेगाने पसरत आहे. तीन आठवड्यांच्या आत तेथील दैनंदिन रुग्णसंख्येत निम्म्याहून अधिक प्रकरणं एक्सबीबीची आढळली आहेत. काय आहेत एक्सबीबी व्हेरियंटची वैशिष्ट्यं? BA.2.10 या नावानं ओळखला जाणारा एक्सबीबी स्ट्रेन हा ओमिक्रॉनच्या BA.2 या सबव्हेरियंटपासून विकसित झाला आहे. एशिया पॅसिफिक सोसायटी ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शनचे अध्यक्ष डॉ. पॉल टँबिया यांनी टुडे न्यूज पब्लिकेशनला दिलेल्या माहितीनुसार, एक्सबीबी सब-व्हेरियंट हा लसीकरणाचा उच्च दर असलेल्या देशांमध्ये उदयास आलेल्या नवीन प्रकारांपैकी ओमिक्रॉनचा सर्वांत अलीकडील प्रकार आहे. डॉ. पॉल टँबिया पुढे म्हणाले, “विषाणूच्या अंगी तयार झालेली लसीकरणाचा प्रभाव टाळण्याची क्षमता ही त्याच्या उत्क्रांतीचा नैसर्गिक परिणाम आहे. कालांतराने सर्वच विषाणू विकसित आणि अधिक संक्रामक होतात. मात्र, ते कमी घातक बनतात.” “ओमिक्रॉनचा नवीन प्रकार हा विषाणूच्या स्पाइक सरफेस प्रोटिनमधील बदलांच्या संचयनाचा परिणाम आहे,” असं ‘ए स्टार’च्या बायोइन्फॉर्मेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सेबॅस्टियन मोरर-स्ट्रोह यांनी एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एक्सबीबी घातक आहे का? “आमच्याकडे सध्या आढळत असलेल्या रुग्णांच्या लाटेबाबत सर्व जीनोमिक डेटा उपलब्ध नसला तरी, इतर व्हेरियंट्सच्या तुलनेत एक्सबीबी अधिक संसर्गजन्य आहे. कारण, गेल्या काही आठवड्यांपासून त्याचा संसर्ग झालेल्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे,” असं डॉ. पॉल टँबिया म्हणाले. रोफी क्लिनिकचे एक संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. लिओंग हो नाम यांनी निदर्शनास आणून दिलं की, सिंगापूरमध्ये एक्सबीबी सर्वांत प्रभावी विषाणू झाला आहे. त्याच्या संसर्गाच्या वेगावरून असं दिसतं की, ज्याप्रकारे ओमिक्रॉनने डेल्टाची जागा घेतली होती अगदी त्याचप्रकारे एक्सबीबी वरचढ ठरू शकतो. “आतापर्यंत एक्सबीबीचे फार वाईट परिणाम दिसलेले नाहीत. मात्र, रुग्णसंख्या वाढल्यानंतर हॉस्पिटलायझेशनची संख्याही हळूहळू वाढेल अशी शक्यता आहे. मात्र, आढळणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत गंभीर स्थितीतील रुग्णांचं प्रमाण नक्कीच कमी आहे,” असं सॉ स्वी हॉक स्कूल या सार्वजनिक आरोग्य संस्थेतील असोसिएट प्रोफेसर आणि व्हाईस डीन अॅलेक्स कूक यांनी नमूद केलं आहे. न्यूयॉर्क इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी जोन्सबोरो, आर्क. येथील प्रोफेसर राज राजनारायणन यांनी फॉर्च्युन मासिकाला दिलेल्या माहितीनुसार, इतर स्ट्रेनमधील म्युटेशनच्या संयोगामुळे नवीन स्ट्रेन हा कदाचित आतापर्यंतचा सर्वांत जास्त इम्युन स्ट्रेन आहे. याशिवाय, 4 ऑक्टोबर रोजी पेकिंग युनिव्हर्सिटी आणि चांगपिंग लॅबोरेटरीच्या प्रीप्रिंट स्टडीमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार, नवीन व्हेरियंट्सपैकी एक्सबीबीमध्ये अँटिबॉडी संरक्षण टाळण्याची सर्वांत जास्त क्षमता आहे. तज्ज्ञांच्या मते, एक्सबीबी आणि BA.2.75.2 सारख्या नवीन व्हेरियंट्सविरूद्ध मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचारदेखील कमी प्रभावी ठरू शकतात. “आम्ही रोगप्रतिकारक शक्तीवर मात करण्याची अशी क्षमता या पूर्वी कधीही पाहिली नव्हती,” अशी माहिती मिनेसोटा युनिव्हर्सिटीतील संसर्गजन्य रोग संशोधन आणि धोरण (सीआयडीआरएपी) केंद्राचे संचालक मायकेल ऑस्टरहोम यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.