हैदराबाद, 28 मार्च: देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. काही राज्यांमध्ये तर लॉकडाऊनसारखी स्थिती पुन्हा एकदा उद्भवली आहे. महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत रात्री जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अशात अनेक राज्यांनी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तेलंगाना सरकारने नागरिकांना मास्क घालणं अनिवार्य केले आहे. मात्र तरीही लोकं सरकारचा आदेश पायदळी तुडवताना दिसत आहे. त्यामुळे तेलंगाना सरकारने आता नियम मोडणारे नागरिक, तेलंगानात बिना मास्क फिरताना कोण आढळलं तर त्याला तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे. राज्यात सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमस्थळी आणि वाहतुकीदरम्यान मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. या नियमांचं पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर डिजास्टर मॅनेजमेंट अॅक्ट 2005 आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाईचे आदेश दिले आहे. सरकारने याबाबतची सूचना कलेक्टर, जिल्हा मॅजिस्ट्रेट, आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत. सध्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेलंगाना सरकार लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. ‘राज्यात लॉकडाऊन लावणार नाही. उद्योगधंदे सुरुच राहतील. त्यामुळे लोकांना घाबरण्याची गरज नाही. मात्र काळजी घ्या’ असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी स्पष्ट केलं आहे.
(वाचा - BREAKING: मुख्यमंत्री ठाकरे 2 तारखेनंतर घेतील लॉकडाउनबद्दल निर्णय, राजेश टोपेंनी दिले संकेत )
तेलंगानात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरण मोहीम आणखी वेगाने केली जात आहे. तसंच मोठ्या प्रमाणात चाचण्याही केल्या जात आहेत. तेलंगानामध्ये आतापर्यंत 30 लाख 6 हजार 339 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 30 लाख 156 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे 1 हजार 688 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 4 हजार 495 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.