मुंबई, 17 मार्च : जगभरातल्या काही देशांमध्ये कोरोना (Corona) कमी होतोय, असं वाटत असतानाच कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. काही देशांमध्ये कोरोनाचा कहर पुन्हा दिसू लागला आहे. चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे 11 शहरांमध्ये लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. चीनमधल्या या स्थितीमुळे शेजारच्या राष्ट्रांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व परिस्थितीस ओमिक्रॉनचा (Omicron) नवा व्हॅरिएंट (Variant) कारणीभूत मानला जात आहे. त्याला स्टील्थ व्हॅरिएंट (Stealth Variant) किंवा BA.2 व्हॅरिएंट असंही म्हटलं जातं. सध्या हा व्हॅरिएंट वेगानं फैलावत असल्याचं दिसत आहे. बीए.2 हे ओमिक्रॉनचं आतापर्यंतचं पाचवं स्वरूप आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत हा व्हॅरिएंट सर्वप्रथम आढळून आला होता. एकीकडे हा व्हॅरिएंट केवळ चीनमध्येच नाही, तर अन्य देशांमध्येही पसरेल असं `डब्ल्यूएचओ`नं म्हटलं आहे. दुसरीकडे स्टील्थ व्हॅरिएंट भारतासाठी डोकेदुखी ठरणार नाही, असा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे. चीनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यामुळे 11 शहरांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला असून, सुमारे 3 कोटी नागरिक घरातच आहेत. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्च रोजी तेथे 5200 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 1.70 कोटी लोकसंख्या असलेल्या शेंजेन शहरातही कोरोनामुळे लॉकडाउन लावण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या लाटेला स्टील्थ ओमिक्रॉन (Stealth Omicron) हा नवा व्हॅरिएंट कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हॅरिएंट फिलिपिन्स, नेपाळ, कतार आणि डेन्मार्कमध्येही आढळून आला आहे. `एचटी`ने दिलेल्या वृत्तानुसार, स्टील्थ व्हॅरिएंट हा कोरोनाचा BA.2 व्हॅरिएंट म्हणूनही ओळखला जातो. विषाणूचा हा प्रकार शोधणं अवघड असल्याने तज्ज्ञही चिंतेत आहेत. अर्थात यामागे याचा स्पाइक प्रोटीनही (Spike Protein) कारणीभूत आहे. तपासणीत हा व्हॅरिएंट ओळखणं कठीण आहे. कारण या स्ट्रेनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये असं म्युटेशन झालं आहे, की ज्यामुळे पीसीआर टेस्टमध्ये त्याची उपस्थिती शोधणं कठीण होतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं. याचाच अर्थ तपासणीदरम्यान तो सहजासहजी ओळखता येत नाही. हे वाचा - कोरोनाचं भयावह चित्र! मृतदेहांचा खच; अंत्यसंस्कारासाठी एप्रिलपर्यंत वेटिंग जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, BA.2 व्हॅरिएंट ज्या मुख्य विषाणूपासून विकसित झाला आहे, त्याच्याइतकाच तोही जीवघेणा आहे. या विषाणूपासून सावध राहण्याचा सल्ला विशेषज्ञांनी यापू्र्वीच दिला आहे. हा व्हॅरिएंट ओमिक्रॉनपासून विकसित झाला आहे. त्यामुळे हा कोरोनाचा नवा व्हॅरिएंट नाही. या BA.2 व्हॅरिएंटमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) आली होती. ओमिक्रॉनच्या या व्हॅरिएंटमध्ये काही आनुवंशिक बदल झाल्याने त्या आधारे तज्ज्ञांनी त्याला स्टील्थ व्हॅरिएंट असंही नाव दिलं आहे. ओमिक्रॉनचा BA.2 हा व्हॅरिएंट शरीरातल्या रोगांशी लढणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीला (Immunity) चकवा देण्यात माहीर आहे. स्टील्थ व्हॅरिएंट अर्थात स्टील्थ ओमिक्रॉनची ही आहेत लक्षणं स्टील्थ ओमिक्रॉन सर्वप्रथम श्वासनलिकेवर परिणाम करतो. या व्हॅरिएंटचा संसर्ग झाला असता, सुरुवातीच्या टप्प्यात चक्कर येणं, थकवा जाणवणं अशी लक्षणं दिसून येतात. संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ही लक्षणं रुग्णांमध्ये दिसू लागतात. याशिवाय ताप, खोकला, घश्यात खवखवणं, स्नायूंमध्ये थकवा जाणवणं, सर्दी होणं, हार्ट रेट वाढणं आदी लक्षणं या व्हॅरिएंटच्या संसर्गामुळे दिसू लागतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं. `भारतात तिसऱ्या लाटेत BA.2मुळे 75 टक्के नागरिक प्रभावित` कोविड -19 टास्क ग्रुपचे प्रमुख डॉ. नरेंद्र कुमार अरोरा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं, `भारतात BA.2 व्हॅरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. भारतात तिसऱ्या लाटेदरम्यान कोरोनामुळे BA.2ने संक्रमित होणाऱ्यांची संख्या 75 टक्क्यांहून अधिक होती. यामुळे आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) अभ्यासातून भारतात 22 जूनपर्यंत चौथी लाट येण्याची व्यक्त करण्यात आलेली शक्यता योग्य वाटत नाही.` `झाडाच्या फांद्यासारखा आहे हा नवा व्हॅरिएंट` कोची येथील `आयएमए`च्या रिसर्च सेलचे प्रमुख डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितलं, `झाडाला जशा फांद्या फुटतात अगदी तसाच हा व्हॅरिएंट आहे. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला फांद्या फुटतात, त्याप्रमाणे कोरोनाचे नवे व्हॅरिएंट येत राहणार. चीनमध्ये वृद्ध व्यक्तींमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी असल्यानं हा व्हॅरिएंट तिथे वेगानं पसरत आहे. व्यापक चुकीच्या माहितीमुळे चीनमधल्या वृद्धांनी लसीकरणाकडे (Vaccination) पाठ फिरवल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.’ हे वाचा - चीनमधील कोरोनाचा वाढता प्रसार भारतासाठी चिंताजनक? शास्त्रज्ञाने दिली माहिती एकूणच कोरोनाचा शेवट अजून झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.