हाँगकाँग, 16 मार्च : दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठे कोरोना विषाणूच्या साथीचा (Coronavirus Pandemic) प्रभाव ओसरल्यानं जगाने सुटकेचा नि:श्वास टाकायला सुरुवात केली होती, तोच पुन्हा एकदा कोरोनाच्या साथीने चीनमध्ये (China) हातपाय पसरायला सुरुवात केल्याच्या बातम्या धडकत आहेत. चीनमध्ये अनेक ठिकाणी कडक लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आलं आहे. चीनबरोबर हाँगकाँगमध्येही कोरोनानं कहर केला असून, तिथे मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याने अंत्यसंस्कारासाठी (Funeral Place) लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्काराची ठिकाणं एप्रिलच्या मध्यापर्यंत फुल झाली आहेत. हाँगकाँगमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णावर या आधी हॉस्पिटलद्वारेच (Hospital) साध्या पद्धतीनं अंत्यसंस्कार केले जात असत; मात्र आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. तसंच मृत व्यक्तीची कागदपत्रं (Documents) तयार होण्यासही 10 दिवसांपेक्षा अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे हाँगकाँगमध्ये मृतांवर अंत्यसंस्कार होण्यास प्रदीर्घ वेळ लागत असल्याचं वृत्त बँकॉक पोस्ट ने साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्याने दिलं आहे. हे वाचा - CORONA पुन्हा परतला, चीनमध्ये पुन्हा Lockdown, 5 कोटी नागरिक कैद या विदारक स्थितीचं दर्शन घडवणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांच्या आजूबाजूला मोठ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये बंद केलेले अनेक मृतदेह (Deadbodies) ठेवल्याचं दिसत आहे. हा फोटो खरा असल्याची कबुली हॉस्पिटलच्या व्यवस्थापनानं दिली असून, रुग्णांची माफी मागितली आहे. तत्काळ हे मृतदेह हलवल्याचंही हॉस्पिटलनं सांगितलं आहे. याबाबत अंत्यसंस्कार व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष क्वोक होई बोंग यांनी म्हटलं आहे, की अंत्यसंस्कारात अडथळे येऊ नयेत यासाठी सरकारने काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. अंत्यसंस्काराच्या बहुतांश ठिकाणी एप्रिलच्या मध्यापर्यंत किंवा अखेरीपर्यंतची नोंदणी पूर्ण झाली आहे. शहरात 121 फ्युनरल हॉल आहेत आणि रोजच्या मृत्यूचा आकडा 200वर गेला आहे. हे वाचा - इथे कोरोना होताच कंगाल बनतायेत लोक; उपचाराचा खर्च जाणून चक्रावून जाल हाँगकाँगमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. 13 मार्चला तिथे एका दिवसात 32 हजार 430 नवीन रुग्ण आढळले होते, तर 264 रुग्णांचा मृत्यू झाला होता. शहरातले जवळपास 3 लाख नागरिक गृह विलगीकरणात आहेत. या पार्श्वभूमीवर हाँगकाँगमधले निर्बंध कडक करण्यात आले असून, बाहेरून आलेल्या नागरिकांना, तसंच संसर्गग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना 21 दिवस विलगीकरणात राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तीने सरकारी क्वारंटाइन सेंटर अर्थात विलगीकरण केंद्रात राहण्यास नकार दिल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा हाँगकाँगच्या मंत्र्यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.