नवी दिल्ली, 17 जानेवारी - जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोना (Corona virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. तसंच कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णाला ताप, अंगदुखी, घसा खवखवणं, घसा दुखणं, कफ, फुफ्फुसांना संसर्ग, श्वास घेण्यास त्रास होणं आदी समस्या (Covid Symptoms) प्रामुख्यानं दिसून येतात. अर्थात कोरोनाच्या काही व्हॅरिएंटचा संसर्ग झाल्यास अजूनही वेगवेगळी लक्षणं दिसून आल्याचं तज्ज्ञ सांगतात.
कोरोना होऊन गेल्यानंतर दीर्घकाळ काही लक्षणं जाणवणं किंवा काही समस्यांचा सामना करावा लागणं, या स्थितीला लॉंग कोविड (Long Covid) असं म्हणतात. आतापर्यंत लॉंग कोविडची अनेक लक्षणं समोर आली आहेत. यात थकवा जाणवणं, सांधेदुखी, स्नायूदुखी, छातीत वेदना होणं आदींचा समावेश आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात लॉंग कोविडची काही विचित्र लक्षणं (Covid Symptoms) समोर आली आहेत. याविषयीची माहिती 'टीव्ही नाइन हिंदी' नं प्रसिद्ध केली आहे.
झोपेत घोरणं
कोरोनावर मात केल्यानंतर लॉंग कोविडचा (Long Covid) सामना करणाऱ्या रुग्णांमध्ये काही चिंताजनक आणि विचित्र समस्या दिसून आल्या आहेत. काही कालावधीनंतर या समस्यांचा परिणाम कमी होत असला, तरी त्या काहीशा विचित्र असल्याचं संशोधकांना दिसून आल्याचं 'द सन'च्या वृत्तात म्हटलं आहे. कोरोनावर मात केलेल्या 7.1 टक्के रुग्णांमध्ये झोपेत घोरण्याची (Snoring) समस्या वाढल्याचं दिसून आलं आहे. रात्री घोरल्यामुळे हृदयरोग आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो, असं लंडन (London) इथल्या किंग्ज कॉलेजनं केलेल्या संशोधनाच्या अहवालात म्हटलं आहे.
ढेकर देणं
लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, चीनमधल्या रुग्णालयांमधून 3 महिन्यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर 44 टक्के रुग्णांमध्ये ढेकर (Burping) देण्याची समस्या दिसून आली. कोरोनाचा सामना करणाऱ्या 117 रुग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनातून असं दिसून आलं, की प्रति 10 रुग्णांपैकी एका रुग्णामध्ये ढेकर देण्याची समस्या वाढली आहे.
सेक्शुअल डिसफंंक्शन
लंडनमधल्या किंग्ज कॉलेजनं 3400 रुग्णांवर संशोधन केलं असता, अनेक रुग्णांमध्ये सेक्शुअल डिसफंक्शनची (Sexual Dysfunction) समस्या दिसून आली. 3400 पैकी 14.6 टक्के पुरुष आणि 8 टक्के महिलांमध्ये ही समस्या निर्माण झाल्याचं आढळलं. कोरोनावर मात केल्यानंतर काही महिन्यांपर्यंत ही समस्या कायम राहिली.
डोळ्यांना खाज सुटणं
कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये डोळ्यांना खाज सुटणं (Itchy Eyes) ही समस्याही दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील ही बाब मान्य केली आहे. बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 83 कोरोनाबाधित रुग्णांचा अभ्यास केला असता, त्यापैकी 17 टक्के रुग्णांमध्ये डोळे लाल होणं, खाज सुटणं ही लक्षणं आढळून आली आहेत.
लघवीवर नियंत्रण नसणं
काही कोरोना रुग्णांमध्ये लघवीवर नियंत्रण नसल्याची आणि कपड्यांमध्येच लघवी करण्याची समस्या दिसून आली आहे. वैद्यकीय परिभाषेत याला इनकॉन्टिनन्स (Incontinence) असं म्हणतात. किंग्ज कॉलेजच्या संशोधनानुसार, लॉंग कोविडचा सामना करणाऱ्या 14 टक्के रुग्णांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. मिशिगनमधल्या संशोधकांच्या संशोधनानुसार 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांमध्ये हा त्रास दिसून आला. 65 पैकी 45 रुग्ण रात्रीच्या वेळी लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नसल्याचं समोर आलं. ब्लॅडरच्या नियंत्रणावर कोरोनामुळे परिणाम झाल्याचंही दिसून आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus