नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : देशात जास्तीत जास्त कोरोना लसीकरण (Corona vaccination) करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता कोरोना लसीकरणात (Corona vaccine) मोठा बदल होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने एक निर्णय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय म्हणजे कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत आहे (Gap between corona vaccine doses).
सध्या देशात दिल्या जाणाऱ्या इतर लशींच्या तुलनेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमध्ये सर्वात जास्त गॅप आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या 12 ते 16 आठवडे आहे. पण ते आता पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आता पुन्हा कमी करण्याचा सल्ला केंद्र सरकारला देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात काम इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन (IAPSM) या संस्थेने केंद्र सरकारला कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली आहे. यावर केंद्र सरकार विचार करत असल्याचं IAPSM ने सांगितलं आहे. तसंच संस्थेने एकदा कोरोना संसर्ग झालेल्यांना लस न देण्याचाही सल्ला दिला आहे.
IAPSM च्या अध्यक्ष डॉ. सुनीला गर्ग यांनी सांगितलं की, आम्ही लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण ही आमची प्राथमिकता आहे. ज्यांना कोरोना संसर्ग झाला आहे, त्यांना कोरोना लस देऊ नका, असाही सल्ला आम्ही दिला आहे.
कोविशिल्डच्या डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस का?
जेव्हा कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून जास्तीत जास्त 16 आठवडे करण्यात आलं, तेव्हा देशात लशीचा तुटवडा होता. आता देशात सहा कंपन्यांच्या लशींना परवानगी मिळाली आहे. दोन डोसमधील अंतर कमी झालं तर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होईल आणि कोरोना रुग्णांना गंभीर होण्यापासून किंवा रुग्णालयात दाखल होण्यापासून दूर ठेवता येईल.
हे वाचा - 16 आठवड्यानंतरही लसीच्या दुसऱ्या डोससाठी 1.6 कोटी नागरिक Waiting List मध्ये
ज्या लोकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना एक डोस घेतलेल्यांच्या तुलनेत संसर्गाचा धोका कमी असतो, असं दिसून आलं आहे. त्यामुळे दोन डोसमधील अंतर कमी केल्याने लोकांना कमी कालावधीच दोन्ही डोस मिळतील, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होईल, असं संस्थेने सांगितलं. तज्ज्ञांच्या मते, डेल्टा व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आता दोन डोसमधील अंतराबाबत विचार करण्याची गरज आहे, असं या संस्थेने सांगितलं.
का वाढवण्यात आलं होतं कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर?
कोरोना लसीकरण सुरू झालं तेव्हा कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंंतर 4 ते 6 आठवडे होते. त्यानंतर ते वाढवून 4 ते 8 आठवडे आणि पुन्हा 12 ते 18 आठवडे करण्यात आलं. हे अंतर वाढवण्यावरून वादही झाला होता. लसीकरणाबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. पण आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा तज्ज्ञांनी केला. या लशीच्या दोन डोसमधील अंतर जास्त असल्यास शरीरात जास्त अँटिबॉडीज तयार होतात, असं या संशोधनात दिसून आलं होतं. लशीचे चांगले परिणाम मिळावेत म्हणून भारतातही दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं.
हे वाचा - या शहरात कोरोना लस कंपल्सरी! घरं हुडकून दारात येऊन देणार आता Vaccine
जूनमध्ये जेव्हा भारतात दोन डोसमधील अंतर वाढवलं गेलं तेव्हा पहिल्या डोसमुळे जास्त अँटिबॉडी दिसून आल्या आणि त्यानंतर त्या घटत गेल्याचं दिसून आलं. दोन डोसमधील अंतर घटल्यानंतर असं अनेक देशांमध्ये दिसून आलं. तज्ज्ञांच्या मते, लसीकरणाची स्थिती बदलणार आहे आणि नव्या अभ्यानुसार यामध्ये बदल होत येणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.