पुणे, 26 मे : शहरातील वंचित उपेक्षित नागरिकांना भाजपपक्षातर्फे नगरसेवकांकरवी लस देण्याचं अभियान राबवण्यात येणार आहे. पक्षाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खाजगी रुग्णालयांना मिळणाऱ्या लस साठ्यांपैकी काही लशी भाजपचे आमदार खरेदी करतील आणि गरीब लोकांचं लसीकरण करतील असं सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र याला आक्षेप घेत भाजप मतदारसंघातील स्वतःच्याच विचारांच्या लोकांना लशी देतंय असा आरोप केला आहे. पुणे महापालिकेत जवळ्पास 100 नगरसेवक असलेल्या आणि शहरात 6 आमदार असलेल्या भाजपने लशी करता कंबस कसलीय. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोविशिल्ड उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट आणि केंद्र सरकार यांच्याशी पत्राद्वारे संवाद साधत विशेष बाब म्हणून पुण्यासाठी 25 लाख डोसेस द्यावेत अशी मागणी केली आहे. पक्षाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही भाजपचे आमदार खाजगी हॉस्पिटलला मिळणाऱ्या लशीच्या कोट्यातील काही लशी खरेदी करून विधानसभा मतदारसंघातील वंचित, उपेक्षित, गरीब लोकांना लशी मिळवून देतील असं सांगितलं. हे ही वाचा- पुणेकरांना गरज असल्यास मिळणार Free ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर; या आहेत अटी आणि शर्ती काही दिवसांपूर्वी रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करून गरजू लोकापर्यंत देण्याचा भाजपचा मनसुबा होता. यातून निर्माण झालेला वाद पोलिसांत पोचला होता. भाजपचं मिशन लस हे राजकीय हेतून प्रेरीत आहे. आपल्याच विचारांच्या लोकांना लस मिळवून देत कोविड सेंटर्स उभारत भाजप वेगळा पायंडा पाडत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी करत संपूर्ण शहरातील नागरिकांसाठी लस देण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करेल असं सांगितलं. अशा पद्धतीने खाजगी रुग्णालयांना दिलेला कोटा राजकीय पक्ष विकत घेऊ शकतात का असा सवालही जगताप यांनी विचारला आहे. गेले वर्ष सव्वा वर्षे बहुतांश आमदार नगरसेवक आपापल्या मतदारसंघात, वॉर्डात, प्रभागात मास्क वाटणे, औषध फवारणी, धान्याच्या किट वाटप करत होते. त्यानंतर आपल्या प्रभागात कोविड सेंटर्ससाठी स्पर्धा लागली आणि आता लशीसाठी चढाओढ. एकूणच बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणूकांच्या आधी मोदी, शहा, ममता, नितीश यांनी आम्हाला सत्ता मिळाली तर मोफत लस देऊ या आश्वासनानंतर महापालिका निवडणुकीआधी लशींचा अपुरा पुरवठा बघता सर्वपक्षीय लोक प्रतिनिधीपैकी कुणी ‘तुम मुझे वोट दो मै तुम्हे लस दुंगा’ अशी घोषणा कुणी केली तर आश्चर्य वाटू देऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.