नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : गेल्या वर्षभरापासून जगातील अनेक देश कोरोना महामासाथीचा (Corona Pandemic) सामना करत आहेत. अनेक देशात लाॅकडाऊनसारख्या पर्यायाचा सातत्याने अवलंब करावा लागत आहे. भारतासह बहुतेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे पण तरी धोका कायम आहे. कारण काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही दुसरी लाट (Second Wave) अधिकच भयंकर असल्याचं स्पष्ट होत आहे.
द इकाॅनाॅमिस्टने जगातील 46 देशांमधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अभ्यास केला. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची आकडेवारी पाहिली. ज्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली त्या देशांमध्ये भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. या 46 देशांमध्ये मार्च ते मे 2020 दरम्यान आलेल्या पहिल्या लाटेत 2.20 लाख जणांचा मृत्यू झाला. आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान याच 46 देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 6.20 लाख लोक मृत्यूमुखी पडले. म्हणजे जवळपास मृतांच्या आकडेवारीत 4 लाखांनी वाढ झाली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम युरोपीय देशांमध्ये (European Countires) दिसून आला. ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलॅंड, स्पेन आणि स्वीडनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. तसंच ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेतील (America) लाखो लोक मृत्यूमुखी पडले.
हे वाचा - यूकेनंतर आता द. आफ्रिकेतील कोरोनाचा स्ट्रेनही भारतात; किती घातक आहे हा नवा अवतार?<
अमेरिकेत मार्च ते ऑक्टोबरदरम्यान कोरोनाचे एकूण 1 कोटी रुग्ण सापडले. पण त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत ही संख्या वाढून 2 कोटींवर पोहोचली. फ्रान्स, इटली आणि स्पेनमध्ये दुसऱ्या लाटेमुळे मोठे नुकसान झाले.
या सगळ्यात अत्यंत भीतीदायक गोष्ट म्हणजे ब्रिटन आणि आफ्रिकी देशांमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा नवा आणि अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट (Variant) आढळून आला. सध्या ब्रिटन आणि आफ्रिकेतील कोरोनाचा हा नवा स्ट्रेन सर्वाधिक नुकसानकारक ठरत आहे. तसंच तो अन्य देशांमध्ये वेगानं फैलावत आहे.
इस्त्राईलमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. जगभरात प्रतिमहिना मृत्यूदर पाहिला तर तो आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान प्रति एक लाखांमध्ये 12 असा होता. तर मार्च ते मे दरम्यान प्रति एक लाखांत 8 होता.
हे वाचा - पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू
1918 ते 1920 दरम्यान आलेल्या स्पॅनिश फ्लूचा संसर्ग जगातील 50 कोटी नागरिकांना झाला होता. त्यापैकी 5 कोटी रुग्णांचा मृत्यू झाला होता. या महामासाथीच्या दुसऱ्या लाटेने अनागोंदी निर्माण झाली होती. अशाच पद्धतीने कोरोनाची दुसरी लाट आता दृष्टीक्षेपात येत आहे. या दोन्ही महामासाथींमुळे 100 वर्षांत जगभरातील कोटयवधी लोकांनी आपला जीव गमावला आहे. स्पॅनिश फ्लू आणि कोरोना संसर्गाची सदयस्थिती पाहता कोणत्याही महामासाथीची दुसरी लाट किती भयंकर असते, याचा धडा संपूर्ण जग घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Covid19, International, Lifestyle, South africa, United States of America