वॉशिंग्टन, 01 मे : भारतात दिवसेंदिवस कोरोनाची प्रकरणं (Coronavirus in india) वाढतच आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यात भारतावर आरोग्य सुविधांच्या कमरतेचं संकटही ओढावलं आहे. त्यासाठी अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. आता अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फाउची यांनी (Dr Anthony S Fauci) भारताला कोरोना परिस्थिती नियंत्रण आणण्याचा फॉर्म्युला दिला आहे.
'कोणत्याही देशाला लॉकडाऊन आवडत नाही. मात्र भारतातली कोरोना संसर्गाची सध्याची परिस्थिती पाहता तातडीने काही आठवड्यांसाठी लॉकडाऊन केल्यास कोरोना संसर्गाचं दुष्टचक्र थांबू शकेल,' असा सल्ला डॉ. अँथनी फाउची (Dr Anthony S Fauci) यांनी दिला आहे. कोविडबद्दल जागतिक पातळीवर ज्यांच्या मताला मोठी किंमत आहे, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये डॉ. अँथनी यांचा समावेश होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे ते मुख्य वैद्यकीय सल्लागार असून, आतापर्यंत त्यांनी अमेरिकेच्या सात राष्ट्राध्यक्षांसोबत काम केलं आहे. मेरिलँडमधील बेथेस्दा येथील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफहेल्थ'मध्ये असलेल्या डॉ. अँथनी यांची 'दी इंडियन एक्स्प्रेस'ने शुक्रवारी (30एप्रिल) विशेष मुलाखत घेतली. त्या संवादात त्यांनी भारताला हा सल्ला दिला आहे.
सध्याची भारतातली स्थिती खूप अवघड असून, तातडीने काहीतरी करण्याची गरज आहे. काही आठवड्यांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तातडीच्या, नजीकच्या भविष्यातल्या आणि दीर्घकालीन भविष्यातल्या उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळू शकेल, असं मत डॉ. फाउची यांनी व्यक्त केलं.
'भारतातील सध्याची स्थिती पाहता तातडीने पावलं उचण्याची गरज आहे. लसीकरण कार्यक्रम तर अत्यावश्यक आहेच. पण त्यामुळे तातडीने दिलासा मिळणार नाही, भविष्यातली रुग्णवाढ थांबेल. आत्ता ऑक्सिजन, औषधं, बेड्स आदींसाठी सैरावैरा पळणाऱ्या लोकांना दिलासा मिळण्यासाठी एखाद्या आयोगाची किंवा इमर्जन्सी ग्रुपची (Emergency Group) स्थापना करण्याची गरज आहे. त्यातून सगळ्या प्रकारच्या पुरवठ्याचं नियोजन आणि व्यवस्थापन करता येऊ शकेल. गरज पडल्यास अन्य देशांकडून किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत मागता येऊ शकेल,' असं डॉ.फाउची म्हणाले.
हे वाचा - Oxygen Crisis : ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात डॉक्टरसहित 8 रुग्णांचा मृत्यू
'पहिल्या लाटेच्या वेळी भारताने अनेक देशांना मदत केली आहे. त्यामुळे आता बाकीच्या देशांनी भारताला मदत करण्याची गरज आहे. अमेरिकेने आता मदतीला सुरुवात केली आहे, याचा मला अभिमान आहे,'असंही त्यांनी सांगितलं.
'अमेरिकेने लसीकरणासाठी (Vaccination) नॅशनल गार्ड्सची मदत घेतली. त्या प्रकारे भारतानेही लष्कराची तातडीची मदत घेण्याचा विचार केला पाहिजे. लष्कर युद्धाच्या वेळीही हॉस्पिटल्स उभारू शकतं. हेही युद्धच आहे आणि कोरोना हा शत्रू आहे. त्यामुळे आणीबाणीची स्थिती समजूनच त्याकडे पाहायला हवं,' असं डॉ. फाउची म्हणाले.
दीर्घकालीन विचार करता लसीकरण वाढवणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतासारख्या मोठ्या देशात केवळ दोन टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे आणि केवळ 11टक्के जणांनी पहिला डोस घेतला आहे, ही गंभीर परिस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं. ही संख्या लवकरात लवकर वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
विषाणूची क्षमता ओळखून त्या दृष्टीने आपण काम करायला हवं, असं त्यांनी सांगितलं. 'गेल्या लाटेत अमेरिका हा सर्वांत जास्त फटका बसलेला देश होता. आमचा देश सर्वांत श्रीमंत आहे. आम्ही सर्वात जास्त तयारीत असल्याचं मानलं जात होतं आणि आम्हालाच सर्वांत जास्त फटका बसला. विषाणू तुम्ही किती श्रीमंत किंवा किती विकसित किंवा किती आधुनिक आहात, हे पाहत नाही. त्याची त्रास देण्याची क्षमता लक्षात घेतली नाही, तर तो तुम्हाला अडचणीत आणू शकतो,' असं डॉ. फाउची यांनी सांगितलं.
हे वाचा - कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आता दैनंदिन रुग्णसंख्येनं ओलांडला 4 लाखाचा टप्पा
भारतासारख्या मोठ्या देशातल्या 1.4अब्ज नागरिकांना लशींच्या पुरेशा पुरवठ्यासाठी भारताने जगभरातल्या वेगवेगळ्या, अधिकाधिक कंपन्यांकडून लस मिळवण्याचा, त्यासाठी त्यांच्याशी वाटाघाटी करून करार करण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारत हा सर्वांत मोठा लस उत्पादक देश आहेच, तरीही ते उत्पादन आणखी वाढवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
भारताने काही कालावधीपुरता तरी पूर्ण लॉकडाउन (Lockdown) केला, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेतली स्थिती काही महिन्यांपूर्वी वाईट होती. मात्र आता ती चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणली गेल्याचंही त्यांनी नमूद केलं. किमान 40टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असून, 50 टक्के नागरिकांनी लशीचा एक तरी डोस घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा मृत्युदर घटला आहे. बायडेन प्रशासन विज्ञानाच्या आधारावर काम करत असून, पदावरच्या त्यांच्या पहिल्या काही दिवसांत लसीकरण कार्यक्रमाला प्रचंड वेग आला. त्यामुळे हे यश मिळू शकलं, असंही त्यांनी सांगितलं.
या कठीण प्रसंगी जगातले सगळे देश भारतासोबत असून भारतातल्या स्थितीबद्दल वेदना होत आहेत. भारतातल्या लोकांनी एकजुटीने राहावं, एकमेकांना मदत करावी आणि हे सगळं पूर्वपदावर येईल याचा विश्वास बाळगावा, असंही डॉ. फाऊची म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus