केपटाऊन, 30 ऑगस्ट : जगभरातल्या अनेक देशांमध्ये अजूनही कोरोनाचा (Corona) कहर कायम आहे. एकीकडे जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झालं असलं, तरी दुसरीकडे कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिएंट्स (Corona Variant) समोर येत आहेत. यातले बहुतांश व्हेरिएंट्स अधिक संसर्गजन्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या डेल्टा (Delta) आणि डेल्टा प्लसने (Delta plus) चिंतेत टाकलेलं असताना आता आणखी एका व्हेरिएंट्सने टेन्शन वाढवलं आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) आता कोरोनाचा C.1.2 हा अधिक संसर्गजन्य नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरणारा आहे. या व्हेरिएंटपुढे लसदेखील (Vaccine) निष्प्रभ ठरेल, असं सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेतली नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज (NICD) आणि क्वाजुलू नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्म (KRISP) या संस्थांच्या संशोधकांनी सांगितलं, की या वर्षी मे महिन्यात देशात C.1.2 हा व्हेरिएंट प्रथम आढळला होता. हे वाचा - मुंबईत Covid Alert! रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी, C.1 च्या तुलनेत हा नवा C.1.2 व्हॅरिएंट मोठ्या प्रमाणात म्युटेट (Mutate) झालेला आहे. तसंच वुहानमध्ये (Wuhan) आढळून आलेल्या मूळ विषाणूपेक्षाही अधिक म्युटेट झालेला आहे. C.1.2 या विषाणूतलं सुमारे 52 टक्के स्पाइक म्युटेशन (Spike Mutation) यापूर्वी व्हेरिएंट्स ऑफ इंटरेस्ट आणि व्हेरिएंट्स ऑफ कन्सर्न अशा वर्गवारीतल्या व्हेरिएंट्समध्ये आढळून आलं आहे. त्यामध्ये D 614G, तसंच E484K आणि N501Y या म्युटेशन्सचा समावेश असून, ती बीटा आणि गॅमा व्हेरिएंटमध्येही आढळून येतात. यातली E484K हे म्युटेशन बीटा आणि N501Y हे म्युटेशन अल्फा व्हेरिएंटमध्येही दिसून येतं. संशोधनानुसार, C.1.2 हा व्हेरिएंट चीन, कॉन्गो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्विर्झलंडमध्ये 13 ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा आढळून आला. 24 ऑगस्टला MedRxiv वर पोस्ट करण्यात आलेल्या पीअर-रिव्ह्यू स्टडीनुसार C.1.2 हा C.1 च्या तुलनेत अधिक विकसित आहे. हा SARS-COV2 मधल्या सर्वाधिक संसर्गजन्य विषाणूंच्या वंशातील आहे. हा व्हॅरिएंट जगाची चिंता वाढवू शकतो, असं संशोधकांनी सांगितलं आहे. हे वाचा - Corona Update: देशात आठवडाभरात 32 टक्के रुग्णवाढ; गाठला दोन महिन्यातील उच्चांक शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, सुरुवातीच्या तपासणीदरम्यान देशातील बीटा (Beta) आणि डेल्टा (Delta) या व्हेरिएंट्ससह याची संसर्गवाढ सारखीच आहे. C.1.2 चा मूळ म्युटेशन रेट 41.8 प्रतिवर्ष असून, हा जगातल्या सध्याच्या जागतिक म्युटेशन दराच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. हा व्हेरिएंट 2019 मध्ये वुहानमध्ये आढळलेल्या मूळ विषाणूपेक्षा वेगळा असून, हा व्हेरिएंट स्पाइक प्रोटीनमधल्या C.1.2 या ओळीतल्या अनेक म्युटेशनचा परिणाम असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. संशोधकांच्या निरीक्षणानुसार, C.1.2 च्या उपलब्ध सीक्वेंसची संख्या ही दक्षिण आफ्रिका आणि जगभरातला संसर्ग आणि वारंवारितेचं एक प्रतिनिधित्व असू शकते. दक्षिण आफ्रिकेत प्रत्येक महिन्यात C.1.2 च्या जीनोमच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. मे महिन्यात अनुक्रमे 0.2 टक्के असलेले जीनोम जून महिन्यात वाढून 1.6 टक्के, तर जुलैत 2 टक्के झाले आहेत. ही स्थिती पाहता हा नवा व्हॅरिएंट अधिकच धोकादायक ठरू शकतो, असं संशोधकांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.