वाराणसी 10 एप्रिल : देशात कोरोनाची (Corona in India) दुसरी लाट आली असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आवश्यक त्या निर्बंधांसह लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन (Covid-19 Rules Violation) करताना आढळतात. लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करणाऱ्या मोहिमा राबवल्या जात आहेत. तसेच कोरोनाचे नियम पाळण्याचेही आवाहन केलं जातं आहे. कलाकार, खेळाडू आणि सजग नागरिकांना जनजागृती करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येतं आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh)मुरादाबादमधील एक स्थानिक कलाकार कोरोनाबद्दल जनजागृती करत आहे. या कलाकाराने त्यासाठी थोडा हटके आणि मनोरंजन करणारा पर्याय निवडला आहे.
विकी असं या कलाकाराचं नाव आहे. तो मोरादाबादच्या एका एनजीओसोबत काम करतो. त्याने यमराजची वेशभूषा केली असून तो हातात जनजागृती करणारे फलक घेऊन परिसरात फिरत आहे. विकीच्या हातातील फलकावर लिहिलं आहे, 'पृथ्वीवासियांनो आमचा वर्कलोड (Work load) वाढवू नका, मास्क लावा आणि सुरक्षित अंतर ठेवा'. विकीने टीव्हीवरील पौराणिक कार्यक्रमांप्रमाणे काळा आणि सोनेरी रंगाचा पोशाख घातला आहे. धोतर, उपरणं अशी वेशभूषा आहे. तसेच यमराजप्रमाणे दागिनेही घातले आहेत. डोक्यावर यमराजासारखे (Yamraj) मुकूट घालून एका हातात गदा आणि एका हातात फलक घेऊन विकी परिसरात फिरून जनजागृती करत आहे. त्याची लोकांना जागृत करणारी अनोखी पद्धत लक्ष वेधून घेणारी आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने मुंबईत रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
एएनआयने विकीचे फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंमध्ये विकी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवर उभा राहून मास्क घालण्यासाठी (Wearing Masks)आणि सुरक्षित अंतर पाळण्याची (Social Distancing) विनंती करत आहे. एका फोटोत तो यमराजाचे वाहन असलेल्या म्हशीजवळ उभा असलेला दिसत आहे.
Moradabad: A local artist, dressed as Yamraj, creats awareness among people about #COVID19 pandemic, urging them to wear a mask and observe social distancing. pic.twitter.com/xeZd4fbbhE
— ANI UP (@ANINewsUP) April 9, 2021
“कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे म्हणून आम्ही लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर राखणे खूप महत्त्वाचे आहे, ” असं विकीने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
देशात सर्वाधिक रुग्णांची नोंद -
एएनआय या वृत्तसंस्थेनी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात 9 एप्रिलला आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी देशात तब्बल 1 लाख 45 हजार 384 कोरोनाबाधित आढळले असून 794 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 1कोटी 32 लाख 5 हजार 926 झालीअसून आतापर्यंत 1 लाख 68 हजार 631जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नोएडा, अलाहाबाद, मेरठ आणि गाझियाबाद शहरांमध्ये प्रशासनाने नाईट कर्फ्यू लागू केला आहे. 8एप्रिलपासून लागू झालेल्या या नाईट कर्फ्यूत अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. लखनऊमध्ये सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच काम सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus, Rules violation