नवी दिल्ली 26 एप्रिल: देशभरात तिसऱ्या टप्प्यातील (Third Phase of Vaccination) लसीकरणाला 1 मेपासून सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात अठरा वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. अशात देशातील चार राज्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांच्याकडे लसीचा साठा शिल्लक नाही. त्यामुळे एक मेपासून ते लसीकरणाला सुरुवात करू शकणार नाहीत. काँग्रेसचं सरकार असणाऱ्या राजस्थानचं असं म्हणणं आहे, की कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटनं असं म्हटलं आहे, की त्यांच्याकडून 15 मेपूर्वी लसीचा पुरवठा केला जाऊ शकणार नाही. राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा म्हणाले, की मला सिरम इन्स्टिट्यूटसोबत बोलण्यासा सांगण्यात आलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला केंद्र सरकारकडून जी ऑर्डर मिळाली आहे, तिच्या पुरवठ्यासाठी पंधरा मेपर्यंतचा वेळ हवा आहे. त्यामुळे तोपर्यंत ते आम्हाला लसीचा पुरवठा करू शकणार नाहीत.
रघु शर्मा म्हणाले, अशात प्रश्न असा आहे, की राज्य सरकारांनी स्वतः लस खरेदी करायची असल्यास याची प्रक्रिया का असेल? याबाबत केंद्रानं निर्णय घ्यायला हवा. राजस्थानमध्ये 3.13 कोटी लोक 18 ते 45 वयोगटातील आहेत. मात्र, या सर्वांचं लसीकरण आम्ही कसं करू? केंद्रानं सिरम आणि भारत बायोटेकला आदेश द्यायला हवेत, की त्यांनी राज्यांना लसींचा पुरवठा करावा. लसीच्या किमतीबाबत बोलताना ते म्हणाले, की लसीचे पैसे द्यायला तयार आहोत, मात्र सर्वांसाठी सारखेच दर पाहिजेत.
मे महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला 4 लाखांहून अधिक रुग्ण आढळणार, तज्ज्ञांचा दावा
राजस्थानशिवाय छत्तीसगड, पंजाब आणि झारखंड या राज्यांचंही असंच म्हणणं आहे, की इथे लसीच्या स्टॉकचा तुटवडा आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तर, झारखंडमध्ये झामुमोसोबत काँग्रेस सत्तेत आहे. छत्तीसगड आणि पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनीही रघु शर्मा यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.
या चारही राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, की आम्ही एक मेपासून लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मात्र, लसीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीच पुरवठा करण्यास नकार दिला आहे. पंजाबचे आरोग्यमंत्री सिद्धू म्हणाले, की लस उपलब्ध न झाल्यास एक तारखेपासून लसीकरणाला सुरुवात होऊच शकत नाही. ते म्हणाले, परिस्थिती सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. केंद्र सरकारचं म्हणणं आहे, की सर्वांनी एक तारखेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करावं, मात्र लसच उपलब्ध नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona virus in india