नवी दिल्ली, 26 एप्रिल: मागील काही दिवसांपासून देशांत दिवसाला तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण (Corona cases in India) आढळत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा कोलमडल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी कोरोनाची नवीन रुग्णसंख्या समोर आल्यानंतर देशात संक्रमित लोकांची एकूण संख्या 1 कोटी 73 लाख 13 हजार 163 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासांत, 3 लाख 52 हजार 991 जणांना नव्याने कोरोना विषाणूची (Corona Virus) लागण झाली आहे. तर दरम्यान 2 हजार 812 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना, भारतीय लोकांच्या चिंतेत भर घालणारा अहवाल (Corona cases report) समोर आला आहे. संबंधित अहवालानुसार, पुढील किमान 2 ते 3 आठवड्यांपर्यंत कोरोना रुग्णांमध्ये घट होण्याची काहीही चिन्हे नाहीत. आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी गणिती मॉडेलचा वापर करून देशात कोरोना साथीच्या रुग्णवाढीचा आणि वेळेचा अंदाज वर्तवला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 14 ते 18 मे दरम्यान देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 38 ते 48 लाखांवर पोहचू शकते. तर पुढील दहा दिवसांत नव्याने कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांचा आकडा 4.4 लाखांवर जाऊ शकतो. या अहवालाबाबत ट्विट करताना आयआयटी-कानपूरच्या मणींद्र अग्रवाल यांनी म्हटलं की, 'मी कोरोना रुग्णांच्या उच्चांकाबाबत गणितीय सूत्रांच्या अधारे मोजमाप केलं आहे. त्यानुसार शेवटच्या टप्प्यापर्यंत कोरोना संक्रमण याच श्रेणीच्या आसपास राहू शकतं. पण चिंता वाढवणारी बाब म्हणजे यामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे.
हे ही वाचा-तुमच्या फक्त 30 मिनिटांनी कोरोनाचा धोका 30 टक्के होईल कमी
देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण कशी असणार
अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की, देशात 14 ते 18 मे दरम्यान सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असू शकतात. शिवाय 4 ते 8 मे दरम्यान देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ होऊ शकते. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात प्रतिदिन 3.4 ते 4.4 लाख नवीन रुग्णांची नोंद होऊ शकतो. परिणामी मे महिन्याच्या सुरुवातीला देशात 38 ते 48 लाख अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india