नवी दिल्ली, 8 मार्च : राज्य सरकारच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (National Thermal Power Corporation NTPC Ltd.) या कंपनीने जागतिक महिलादिनाच्या (International women's Day) पूर्वसंध्येला एका पत्रकाद्वारे महिलांना खूशखबर दिली. भारतातली सर्वांत मोठी एकीकृत वीज कंपनी असलेल्या एनटीपीसीच्या (NTPC) संचालनासाठी विशेष नोकरभरती अभियान सुरू केलं असून, या अधिकाऱ्यांच्या पदांसाठी केवळ महिलांनाच नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं एनटीपीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
काय आहे कंपनीचं म्हणणं?
एनटीपीसी ही देशातील सर्वांत मोठी वीज उत्पादक कंपनी असून, महिला सबलीकरणासाठी जिथं शक्य आहे तिथं महिलांना नोकरी देण्याचा कंपनी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कंपनीतील स्त्री-पुरूष असमतोल कमी होईल. त्यासाठी कंपनीतर्फे अशी अभियानं राबवली जाणार आहेत.
अधिकाधिक महिलांनी या नोकरीच्या पदांसाठी अर्ज करावेत म्हणून महिलांना अर्जासाठीचं शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे. महिलांना व्यवस्थित नोकरी करता यावी यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुलांच्या संगोपनासाठी पगारी सुट्टी, मातृत्व रजा, विश्रांतीसाठी सुट्टी त्याचबरोबर मूल दत्तक घेतल्यास विशेष संगोपन रजा, सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म देणार असल्यास त्यासाठीची रजा या सर्व सुविधा महिलांसाठी कंपनी उपलब्ध करून देते.
एनटीपीसीने नुकतंच असिस्टंट इंजिनीअर आणि असिस्टंट केमिस्ट पदांच्या भरतीसाठी निवेदन दिलं होतं. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी केवळ 3 दिवसच बाकी आहेत. या पदांसाठी पात्र असलेल्या आणि आतापर्यंत ज्यांनी अर्ज केलेला नाही अशा उमेदवारांना NTPC ची अधिकृत वेबसाइट ntpc.co.in वर लॉगइन करून ntpccareers.net विभागात (NTPC Recruitment 2021) अर्ज करता येईल. NTPC Recruitment 2021 या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च, 2021 पर्यंत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, India, International women's day