मुंबई, 10 मार्च : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न युनिव्हर्सिटीनं भारतातील मद्रास युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि हैदराबाद येथील गांधी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या तीन प्रमुख युनिव्हर्सिटींसह 'बॅचलर ऑफ सायन्स' हा दुहेरी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. ऑस्ट्रेलियातील सिनेट सदस्य डॅन फॅरेल यांनी 9 मार्च 2023 रोजी ही ड्युअल डिग्री लाँच केला आहे.
मेलबर्न युनिव्हर्सिटी अनेक वर्षांपासून निवडक भारतीय युनिव्हर्सिटींसोबत मिळून, बॅचलर ऑफ सायन्समध्ये ब्लेंडेड डिग्री अभ्यासक्रम देऊ करत आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अॅल्बेनिस म्हणाले, "मेलबर्न युनिव्हर्सिटीनं आता भारतातील तीन आघाडीच्या युनिव्हर्सिटींसह ड्युएल डिग्री सुरू करून शैक्षणिक सहकार्याचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे." बुधवारी (8 मार्च) त्यांनी असंही जाहीर केलं की, त्यांचा देश आणि भारत सरकारनं 'ऑस्ट्रेलिया-भारत शैक्षणिक पात्रता ओळख यंत्रणा' नावाच्या उपक्रमाला मान्यता दिली आहे.
पंतप्रधान अॅल्बेनिस म्हणाले की, ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि क्वॉलिफिकेशन मेकॅनिझमसारख्या घडामोडी दोन्ही देशांमधील सतत वाढत असलेल्या शैक्षणिक भागीदारीमध्ये नवीन भर घालणाऱ्या आहेत. ते म्हणाले, "मैत्री स्कॉलरशीप नावाच्या शिष्यवृत्ती योजनेची घोषणा करताना मला आनंद होत आहे. भारतीय विद्यार्थ्यांना चार वर्षांपर्यंत ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्यासाठी या योजनेची मदत होईल."
वाचा - 'ही' आहेत देशातील सर्वात स्वस्त Engineering Colleges! कमी फी मध्ये मिळेल प्रवेश
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामुदायिक संबंधांना चालना देणार्या विस्तृत मैत्री कार्यक्रमाचा ही शिष्यवृत्ती एक भाग आहे.
मेलबर्न युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, प्रोफेसर डंकन मास्केल आणि ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटींच्या सीईओ कॅट्रिओना जॅक्सन यांच्यासह डेकिनचे अध्यक्ष आणि कुलगुरू प्रोफेसर इयान मार्टिन यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
ऑस्ट्रेलिया आणि भारताचं शिक्षणाबाबत सहकार्य प्रदर्शित करणाऱ्या एका कार्यक्रमात बोलताना पीएम अल्बेनिस म्हणाले की, भारतात येऊन त्यांना खूप आनंद झाला. ते असंही म्हणाले की, प्रत्येकाकडे आपला उदरनिर्वाह करून दुसर्या देशात शिक्षण घेण्याची साधनं किंवा क्षमता नसते. आर्थिक अडचणी, कौटुंबिक बांधिलकी किंवा इतर अनेक कारणं या मागे असू शकतात.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अॅल्बेनिस सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या टेस्ट सीरिजमधील चौथ्या मॅचच्या पहिल्या दिवशी (9 मार्च) स्टेडियमवरदेखील उपस्थिती लावली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.