SSC HSC Exam Result : दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यी आणि पालकांना निकालाचे वेध लागतात. मात्र यंदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यामुळे दहावी आणि बारीवी परीक्षांचा निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.बारावी बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो. तर दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो.
सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संप पुकारला होता. याच कारणामुळे दहावी-बारावीचे निकाल वेळेवर लागणार नाही की नाही याविषयी साशंकता होती. मात्र बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी अगदी वेगाने सुरु करण्यात आली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपानंतर जलद गतीने पेपर तपासण्यास सुरुवात केलीये. बोर्डाने ही माहिती दिलेली आहे. दहावी बोर्डाचे पेपर तपासण्याची डेडलाईन ही 15 एप्रिल ठरवण्यात आली आहे. तर यापूर्वीच बारावे पेपर तपासण्याचं कामं पूर्ण केलं जाईल. यानंतर निकालाचं नियोजन करण्यात येईल. कारण जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातच बोर्डाला निकाल द्यायचा आहे.
यावेळी म्हणजेच मार्च 2023 मध्ये झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये राज्यभरातील 15 लाख, 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2 ते 25 मार्च या कालावधीमध्ये ही परीक्षा पार पडली. राज्यामधील तब्बल 533 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे 2022 च्या तुलनेत यावेळी दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये जवळपास 61 हजारांची घट पाहायला मिळाली.
2023 च्या बारावीच्या परिक्षेला राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले होते. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेली ही बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यातील 195 केंद्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, HSC Result, SSC Result