नवी दिल्ली, 31 मार्च : जर तुमच्याकडे बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असेल आणि तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील आर्थिक क्षेत्रातील सर्वांत मोठी संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयमध्ये डेप्युटी गव्हर्नर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
इच्छुक उमेदवार 10 एप्रिल 2023 पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी आरबीआयने काही निकष निश्चित केले आहेत, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. `स्टडी कॅफे डॉट कॉम`ने याबाबतची माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी गव्हर्नर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या पदावर उमेदवाराची नियुक्ती तीन वर्ष कालावधीसाठी केली जाईल. तसेच पात्र उमेदवारांची पुन्हा नियुक्तीदेखील होऊ शकते. या पदभरती प्रक्रियेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटिफिकेशन जारी केलं आहे. डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22.06.2023 रोजी 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरबीआयच्या नोटिफिकेशननुसार, निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल 17 पे स्केल नुसार 2,25,000 रुपये वेतन दिले जाईल.
डेप्युटी गव्हर्नर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे विशेष पात्रता असावी. त्यानुसार, उमेदवाराकडे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कामकाजाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असावा. पूर्णवेळ संचालक/ बोर्ड सदस्य म्हणून काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य असेल. अतिवरिष्ठ अधिकारी म्हणून आर्थिक क्षेत्रातील पर्यवेक्षण आणि अनुपालनाबाबत संपूर्ण माहिती असावी. आर्थिक क्षेत्रातील इंटरप्रिटिशनसह परफॉर्मन्स डाटावर काम करणे, सारांश काढणे आणि उच्च स्तरीय सुसंवाद साधण्याची मजबूत क्षमता उमेदवाराकडे असावी. उमेदवाराकडे सार्वजनिक धोरणाच्या बाबींवर मजबूत आणि स्पष्ट संवाद साधण्याचे कौशल्य हवे.
आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये तब्बल 1.5 लाख पदं रिक्त; कधी होणार भरती? इथे वाचा अपडेट
डेप्युटी गव्हर्नर या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचा सीव्ही, नाव, पत्ता, एक पासपोर्ट आकाराचा फोटो, संदर्भासाठी तीन नावं, संपर्क, तसेच अन्य तपशीलांसह अर्ज 10 एप्रिल 2023 पूर्वी श्री. संजय कुमार मिश्रा, अवर सचिव (बीओआय), डिपार्टमेंट ऑफ फायनॅन्शियल सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, दुसरा मजला, जीवनदीप बिल्डिंग, पार्लमेंट मार्ग, नवी दिल्ली - 110001. टेलिफोन क्रमांक - 011-23747189, इ-मेल - boi@nic.in या पत्त्यावर सबमिट करावा. या भरती प्रक्रियेच्या अधिक तपशीलासाठी उमेदवार आरबीआयची अधिकृत नोटिफिकेशन वाचू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Job Alert, Rbi, Rbi latest news