मुंबई, 29 मार्च: संरक्षण दलांत भरती होऊन देशाची सेवा करावी, असं अनेक तरुणांना वाटतं. त्या दृष्टीने अनेक तरुण शारीरिक मेहनत घेतात आणि शैक्षणिक तयारी करतात. मात्र संरक्षण दलांत निकषांवर आधारित भरती होत असल्याने सर्वच तरुणांना यात यश मिळते असं नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे सध्या भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलात मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. या तिन्ही दलांमध्ये दीड लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. या पदांसाठी भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार हे अद्याप अस्पष्ट असलं तर त्या दृष्टीने पावलं उचलली जात असल्याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.
देशातील तरुणांचे भारतीय सशस्त्र दलात भरती होण्याचे स्वप्न असते. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती प्रक्रियेकडे तरुणांचं विशेष लक्ष असतं. देशभरातील तरुण या भरती प्रक्रियेत सहभागी होतात. तिन्ही दलांमध्ये सध्या 1.55 पदं रिक्त आहेत. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलात सध्या पदं रिक्त असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पैकी सर्वाधिक पदं म्हणजे सुमारे 1.36 लाख पदं लष्करात रिक्त आहेत. या संदर्भातील माहिती नुकतीच राज्यसभेत देण्यात आली.
सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी; पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये 'या' पदांसाठी बंपर ओपनिंग्स
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लेखी उत्तरात सांगितलं की, ``सशस्त्र दलांतील पदं रिक्त आहेत हे वास्तव मान्य आहे. ही समस्या दूर करण्यासाठी काम सुरू आहे. रिक्त पदं भरण्यासाठी आणि तरुणांनी सैन्यात भरती व्हावं या करिता प्रोत्साहन दिलं जात आहे. यासंबंधी महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत.``
मात्र, ही पदं नेमकी कधी भरली जाणार या संदर्भात सरकारकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. या पदांच्या भरतीसाठी सरकारकडून सातत्याने पावलं उचलली जात आहेत. तरुणांची तातडीने भरती व्हावी, यासाठी भरती प्रक्रिया सोपी केली जात आहेत. येत्या एक वर्षाच्या आत 10 लाख पदं भरण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. लवकरच या पदांसाठी नोटिफिकेशन जारी केलं जाण्याची शक्यता आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
लष्करात अधिकाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत. आर्मी मेडिकल कॉर्प्स आणि आर्मील डेंटल कॉर्प्ससह लष्करात 8129 अधिकाऱ्यांची कमतरता आहे. मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसमध्ये 509 तसेच जेसीओ आणि अन्य रिक्त पदांची संख्या 1,27,673 आहे. ग्रुप ए मध्ये 252,ग्रुप बीमध्ये 2549 आणि ग्रुप सीमध्ये 35,368 पदं रिक्त आहेत.
भारतीय नौदलात एकूण 12,428 पदं रिक्त आहेत. नौदलाला 1653 अधिकारी, 29 वैद्यकीय आणि दंत अधिकाऱ्यांची तर 10,746 खलाशांची गरज आहे. नौदलात ग्रुप एमध्ये 165, ग्रुप बीमध्ये 4207 आणि ग्रुप सीमध्ये 6156 पदं रिक्त आहेत.'
हवाई दलाविषयी बोलायचं झालं तर, या दलात 7031 पदं रिक्त आहेत. त्यात 721 अधिकारी, 16 वैद्यकीय अधिकारी, 4734 एअरमन आणि 113 वैद्यकीय सहायक एअरमन या पदांचा समावेश आहे. हवाई दलात ग्रुप एमध्ये 22, ग्रुप बीमध्ये 1303 आणि ग्रुप सीमध्ये 5531 पदं रिक्त आहेत. तिन्ही दलांतील रिक्त पदांचा आकडा बघता, भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Indian navy