मुंबई, 26 नोव्हेंबर: ज्याप्रमाणे आपण घर, वाहन घेण्यासाठी कर्ज (Loan) घेतो, त्याप्रमाणे शिक्षणासाठीही (Education) कर्ज घेता येतं. ज्याप्रमाणे आपण इतर कर्जांची परतफेड हप्त्याने करतो, तशीच याचीही परतफेड केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी (Job) मिळेपर्यंत सहा महिने ते वर्षभराचा कालावधी दिला जातो. त्यानंतर हप्ते सुरू होतात. अलीकडच्या काळात उच्च शिक्षणाचा (Higher Education) खर्च अफाट वाढल्याने, तसंच परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढल्याने शैक्षणिक कर्जाची सुविधा मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक स्वप्नं (Education Dream) पूर्ण करण्यास मदत मिळत आहे. अनेकदा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक हुशार मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी शैक्षणिक कर्ज सुविधा अत्यंत मोलाची ठरते.
आई-वडिलांचं स्वप्न असतं, की आपल्या मुला-मुलीने खूप शिकावं आणि नाव कमवावं. त्यासाठी ते मुलांना परवडत नसतानाही चांगल्या शाळा-कॉलेजांत घालतात; पण काही पालकांना आर्थिक अडचणींमुळे मुलांना चांगलं शिक्षण देणं परवडत नाही. विशेषतः उच्च शिक्षण म्हणजे पदव्युत्तर शिक्षण किंवा वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा खर्च मोठा असल्यानं अनेकांना तो परवडत नाही. अशा वेळी अनेक मुलं आपलं स्वप्न बाजूला ठेवून दुसऱ्या अभ्यासक्रमाची निवड करतात. शैक्षणिक कर्ज सुविधेमुळे अशा अनेक मुलांना आपली स्वप्नं पूर्ण करणं शक्य झालं आहे. देशातल्या अनेक आघाडीच्या बँका शैक्षणिक कर्ज देतात. शैक्षणिक कर्ज घेताना त्याची निवड कशी करावी, याबाबत आपण जाणून घेऊ या.
आजकाल अगदी नर्सरी (Nursery) म्हणजे मूल शाळेत पाऊल टाकतं तेव्हापासूनचा शैक्षणिक खर्च अमाप असतो. त्यामुळे अगदी नर्सरीपासून सुरू होणाऱ्या अभ्यासासाठीदेखील शैक्षणिक कर्ज मिळू शकतं. त्याचप्रमाणे देशात किंवा परदेशात उच्च शिक्षणाच्या पूर्ण वेळ, अर्धवेळ अभ्यासक्रमांसाठीही कर्ज मिळतं. नोकरी करून पुढचं शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींनाही हे कर्ज मिळू शकतं. शैक्षणिक कर्जाचे व्याजदर साधारणतः 6.75 टक्क्यांपासून सुरू होतात. फिक्स्ड (Fixed) किंवा फ्लोटिंग (Floating) व्याजदरही मिळू शकतो. फ्लोटिंग रेट रेपो रेटवर (Repo Rate) आधारित असतो. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी (Tenure) 15 वर्षांपर्यंतचा असतो. तुमचा अभ्यासक्रम कर्जासाठी पात्र आहे की नाही, याचा निर्णय बँक किंवा वित्तीय संस्था घेते. देशातल्या सर्व सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या बँका आणि वित्तीय संस्था हे कर्ज देतात. स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी आणि टाटा कॅपिटल याकरिता प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्याजदर, अटी, नियम यांची तुलनात्मक माहिती घेऊन तुम्ही तुमच्यासाठी कोणत्या बँकेचं किंवा वित्तीय संस्थेचं कर्ज अधिक योग्य आहे हे ठरवू शकता.
HBCSE Recruitment: मुंबईत नोकरी आणि 1,31,000 रुपये पगार; इथे आहेत जागा रिक्त
पंजाब नॅशनल बँक (PNB)
कर्जाची कमाल रक्कम : गरजेवर आधारित
कर्जाचा कमाल कालावधी : 15 वर्षं
जामीन : 7.5 लाखांपर्यंत शून्य
मार्जिन : 4 लाखांपर्यंत शून्य
भारतीय रहिवासी आणि परदेशात जन्मलेल्या, परंतु भारतात शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या भारतीय मुलांना कर्ज दिलं जातं.
कर्जरकमेच्या 125 टक्के सिक्युरिटी असेल.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 6 महिने ते 1 वर्षानंतर कर्ज परतफेडीसाठी हप्ता सुरू होईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
स्टेट बॅंकेतर्फे मुलींसाठी सवलतीच्या दराने 20 लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं.
कर्जाचा कमाल कालावधी : 15 वर्षं
जामीन : 7.5 लाखांपर्यंत शून्य
मार्जिन : 4 लाखांपर्यंत शून्य
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 12 महिन्यांचा अधिस्थगन कालावधी.
उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी दुसरं कर्ज मिळू शकतं.
अॅक्सिस बँक (Axis Bank)
कर्जाची कमाल रक्कम : 1 कोटी रुपये
कर्जाचा कमाल कालावधी : 15 वर्षं
मार्जिन : 4 लाखांपर्यंत शून्य
प्रोफाइलच्या आधारे प्रवेशापूर्वी कर्ज निश्चित करू शकता.
बँकेला तुमचा संपूर्ण अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 15 व्यावसायिक दिवसांच्या आत कर्जवाटप होतं.
काम करत शिक्षण घेणाऱ्यांसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज.
बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda)
कर्जाची कमाल रक्कम : रु. 80 लाख
कर्जाचा कमाल कालावधी : 10-15 वर्षं
जामीन : 100% मूर्त सुरक्षा
मार्जिन : 4 लाखांपर्यंत शून्य
नर्सरीपासून शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे.
निवडक शैक्षणिक कर्ज योजनांवर मोफत डेबिट कार्ड
विद्यार्थिनींसाठी सवलतीचे व्याजदर.
एचडीएफसी बँक (HDFC bank)
कर्जाची कमाल रक्कम : भारतातल्या शिक्षणासाठी 20 लाख, तर परदेशासाठी 35 लाख (कोणत्याही जामीनदाराशिवाय) जामीनदार असल्यास कर्जाला मर्यादा नाही.
कर्जाचा कमाल कालावधी : 15 वर्षं
जामीन : 7.5 लाखांपर्यंत शून्य
उच्च श्रेणीतली महाविद्यालयं आणि विद्यापीठांनुसार व्याजदर
परदेशातल्या शैक्षणिक कर्जामध्ये 36 देशांमधल्या 950 पेक्षा जास्त अभ्यासक्रमांसाठी कर्ज दिलं जातं.
वेगळ्या शहरातला सह-कर्जदार चालू शकतो.
खूशखबर! फ्रेशर्स आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Wipro कंपनीत होणार मोठी पदभरती
टाटा कॅपिटल शैक्षणिक कर्ज (TATA capital)
कर्जाची कमाल रक्कम : रु. 30 लाख
कर्जाची कमाल मुदत : 6 वर्षं
जामीन : 4 लाखांपर्यंत शून्य
तुमच्या सोयीनुसार तीन कर्ज हप्त्यांचे पर्याय उपलब्ध
किमान कागदपत्रं आणि कर्जाची जलद मंजुरी.
या बँका आणि वित्तीय संस्थांकडून दिलं जाणारे कर्ज, व्याजदर, अन्य अटी याची माहिती घेऊन तुम्हाला सोयीच्या ठरणाऱ्या ठिकाणाहून तुम्ही आपल्या पाल्यासाठी कर्ज घेऊ शकता आणि त्याचं उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करू शकता. ही माहिती वेळोवेळी अपडेट होत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.