नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : जीवनातील छोट्या-मोठ्या अपयशांना काही जण घाबरुन जातात. मात्र, या घाबरणाऱ्या लोकांसाठी केरळमधील रहिवासी असलेल्या मोहम्मद अली शिहाब यांची जीवनकहाणी खूप प्रेरणादायी ठरू शकते. लहानपणापासून त्यांनी खूप संघर्ष केला आहे. तरीही ते कधीही कोणत्याही समस्येला घाबरले नाही आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहिले. मोहम्मद अली शिहाब हे मूळचे केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील एडवन्नापारा गावचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 15 मार्च 1980 रोजी कोरोत अली आणि फातिमा यांच्या घरी झाला. शिहाब यांना एक मोठे भाऊ, एक मोठ्या बहीण आणि दोन लहान बहिणी आहेत. शिहाब यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या पानाचे पत्ते - शिहाब लहानपणी वडील कोरोत अली यांच्यासोबत बांबूच्या टोपल्या आणि पानाचे पत्ते विकायचे. शिहाबच्या वडिलांचे 31 मार्च 1991 रोजी काही आजाराने निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शिहाब यांच्या आईच्या खांद्यावर आली. शिहाब यांच्या आई फारशा शिकलेल्या नव्हत्या आणि त्या त्यांच्या पाच मुलांच्या योग्य काळजी घेऊ शकत नव्हत्या. आई असून अनाथ - पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर, फातिमा यांनी 11 वर्षीय शिहाब, 8 वर्षांची मुलगी सौहराबी आणि 5 वर्षांची मुलगी नसीबा यांना कोझिकोडमधील कुट्टीकत्तूर मुस्लिम अनाथाश्रमात पाठवले. तिन्ही भावंडे लहान वयातच घरापासून दूर गेली होती. शिहाब यांनी अनाथाश्रमात राहून बारावी आणि पूर्व पदवी संपादन केली आहे. हेही वाचा - Success Story : IAS होण्यासाठी सोडली लाखोंची नोकरी, गड्यानं पहिल्याच प्रयत्नात मारलं मैदान! 10 वर्षांनी घरी परतले - यानंतर एक दशक म्हणजेच 10 वर्षे अनाथाश्रमात राहिल्यानंतर ते घरी परतले. यानंतर त्यांनी दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेतले. शिहाब यांनी आतापर्यंत सरकारी नोकरीसाठी 21 परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. 2004 मध्ये त्यांनी शिपाई, त्यानंतर रेल्वे तिकीट परीक्षक आणि जेल वॉर्डन म्हणूनही काम केले आहे. तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण - मोहम्मद अली शिहाब यांना यूपीएससी परीक्षेची तयारी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या 2 प्रयत्नात ते अपयशी ठरले होते. पण त्यांनी हार न मानता तयारी सुरू ठेवली. 2011 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात मोहम्मद अली शिहाबने यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी अखिल भारतीय स्तरावर 226 वा क्रमांक मिळवत त्यांनी आएएस पदाला गवसणी घातली. यूपीएससीच्या मुलाखतीत त्यांच्यासाठी ट्रांसलेटर ठेवण्यात आला होता. त्यांचा हा प्रवास तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.