पुणे, 19 ऑगस्ट: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात NMMS स्कॉलरशिपची गुणवत्ता यादी (nmms merit list 2021 maharashtra)जाहीर झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती.
पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पाहता येईल. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची यासाठी परीक्षा झाली होती. शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 18 ऑगस्टपासून परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर इथे उपलब्ध आहे. या लिंकवर इथेही क्लिक केलंत तर तुमच्या पाल्याचं नाव आहे का हे दिसेल.
2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा Ministry of Human Resources अर्थात भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित केली जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या गुणवत्तेस अधिक वाव देण्यासाठी त्यांचं 12 वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण व्हावं या योजनेचा गाभा आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव आलं तर अशा प्रज्ञावान विद्यार्थ्याला दरमहा 1000 रुपये (वार्षिक 12हजार रुपये) शिष्यवृत्ती मिळते.
राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण धोक्यात; श्रेणी सुधार परीक्षा नाही
6 एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या केंद्रीय शिष्यवृत्तीमध्ये महाराष्ट्रासाठी 11682 एवढा कोटा आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या 11682 विद्यार्थ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळू शकते.
ZP च्या शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार; अतिदुर्गम भागात देतात शिक्षणाचे धडे
महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण धोरणानुसार संबंधित विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. अपंगांसाठी 4 टक्के आरक्षण यात राज्य सरकारने ठेवलं आहे. प्रत्येक जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे.
या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची यादी www.mscepune.in
www.nmms.mscescolarshipexam.in या दोन अधिकृत संकेस्थळांवर जाहीर करण्यात आली आहे. शाळांनी ही यादी याच संकेतस्थळांवरून डाउनलोड करून संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वितरण करावं अशी सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची सोय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Scholarship