मुंबई, 13 जानेवारी: सध्या संपूर्ण देशभरात तरुणांसाठी भरती सुरु आहेत. केंद्र सरकार कडून सैन्यात सामील होण्यासाठी अग्निविरांची भरती सुरु आहे तर महाराष्ट्रात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र कोल्हापुरात सुरू असलेल्या अग्निवीर भरतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. भारतीसाठी अंगी जोश येण्यासाठी इथल्या काही तरुणांनी स्टेरॉईड घेतल्याची माहिती समोर आली होती. असाच काही प्रकार आता महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये होऊ लागला आहे. राज्यात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपूर्वी शाररीक चाचणी घेण्यात आली. त्यात यंदा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तब्बल 18 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी तब्बल 1000 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे पोलिसांवरही या सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्याचा ताण होता. त्यात काही उमेदवार हे डोपिंग करताना सापडले आहेत. ज्या महाराष्ट्र पोलिसांना संपूर्ण जग शौर्यासाठी आणि पराक्रमासाठी ओळखतं त्याच पोलीस विभागात आता अंमली पदार्थ घेऊन पास झालेले उमेदवार भरती होणार? राज्यातील नांदेड, रायगड नंतर आता ठाण्यातही बूस्टर डोस घेऊन किंवा डोपिंग करून तरुण चाचणी देत असल्याचं आढळून आलं आहे. लेखी परीक्षेऐवजी शारीरिक परीक्षा आधी घेण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीमध्ये लाखो उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे तब्बल 18 लाख उमेदवारांची शारीरिक परीक्षा. या चाचणी दरम्यान काही डोपिंगची प्रकरणं समोर आलीत मात्र असे लाखो तरुण डोपिंग करून, स्टिरॉइड्स घेऊन भरतीला उतरले असतील आणि पासही झाले असण्याची शक्यता नकार येत नाही. पोलीस यंत्रणेकडे किंवा शासनाकडे या विरोधातील यंत्रणाच मुळात अस्तित्वात नाही. MPSC Recruitment: महिन्याचा तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त पगार आणि थेट अधिकारी होण्याची संधी; करा अप्लाय तरण्याताठ्या जवानांना-तरुणांना हे असे इंजेक्शन्स आणि स्टिरॉइड्स घेण्याची गरज का पडते? हा मूळ मुद्दा आहे. उद्याचे पोलीस जर अंमली पदार्थ सेवन करून पास झालेले असतील तर नागरिक सुरक्षित आहेत ते मानायचं तरी कशावरून? बरं तब्बल 18 लाख उमेदवारांच्या रक्ताची आणि युरिनची चाचणी करणं शक्य नाही हेच दिसून येतं. पण पोलीस विभाग अशा उमेदवांना नक्की कसे शोधून काढतात? तसंच या डोपिंगमुळे उमेदवारांच्या आयुष्यावर काय परीणाम होऊ शकतात? एका चुकीमुळे कसं आयुष्य संपू शकतं? या सर्व गोष्टीही आजकालच्या तरुणांना आणि भावी पिढीला माहिती असणं आवश्यक आहे. जेणेकरून असे गैरव्यवहार पुन्हा होणार नाहीत. हे डोपिंग म्हणजे नक्की असतं तरी काय? सामान्यतः खेळाडू किंवा धावपटू स्वतःची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी किंवा अतिरिक्त एनर्जीसाठी स्टेरॉईड घेतात. या स्टिरॉइड्सचे इंजेक्शन्स असतात. उमेदवार कोणतीही शारीरिक चाचणी देण्यापूर्वी असे इंजेक्शन्स घेतात. ज्यामुळे त्यांची एनर्जी टिकून राहते. तसंच काही रोगांवरही स्टेरॉईड उपयोगी आहे. मात्र खेळांमध्ये डोपिंग किंवा स्टेरॉईड किंवा ड्रग्स घेणं हा दंडनीय गुन्हा आहे. भारत सरकारच्या नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडून खेळाडूंवर या अंतर्गत कारवाई करण्यात येते. आता तुम्ही म्हणाल यात गुन्हा काय? भारत सरकारच्या नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडून याबद्दलचे कठोर नियम सांगण्यात आले आहेत.या नियमांप्रमाणे जर कोणीही असे स्टिरॉइड्स किंवा डोपिंग करून मैदानात आढळल्यास अशा उमेदवारांची त्वरित चाचणी करण्यात येते. य चाचणीमध्ये त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यास अशा उमेदवारांवर कठोर कारवाई केली जाते. डोपिंग करणे म्हणजे फसणूक करण्याइतका साधा सोपा गुन्हा नाही तर गंभीर गुन्हा मानला जातो. राज्यात बेरोजगारीची भीषणता; पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी डॉक्टर्स, इंजिनीअर्सचे अर्ज पोलीस किंवा ऑफिशिअल्स डोपिंग कशी पकडतात? सहसा कोणत्याही शारीरिक स्पर्धेदरम्यान किंवा अलीकडच्या काळात महाराष्ट्र पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान असेल उमेद्वारां आढळून आलेत ज्यांनी डोपिंग केली होती. नांदेड आणि रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील पकडल्या गेलेल्या उमेदवारांकडून पोलिसांनी दोन सिरींज आणि एक लिक्विड बॅाटल जप्त केली. पण यावरून अशा उमेदवारांनी डोपिंग केली आहे हे सिद्ध होत नाही. त्यामुळे यानंतर पोलिसांना अशा संशयित उमेदवारांच्या रक्ताचे आणि युरिनचे नमुने लॅबकडे पाठवावे लागतात. जर अशा उमेदवारांच्या रक्तात काही अंमली पदार्थ आढळून आलेत तर लॅबकडून टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. अशा प्रकारे डोपिंग झाली आहे असं पोलिसांकडून किंवा संबंधित ऑफिशिअल्सकडून सांगण्यात येतं. नेहमीच डोपिंग पकडली जाते का? काह एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, एखाद्याने डोपिंग केली आहे किंवा स्टिरॉइड्स घेतले आहेत असं उमेदवारांच्या चेहऱ्यावरून कधीही लक्षात येत नाही. जर त्या उमेदवारांकडे काही अंमली पदार्थ सापडले किंवा तशी काही संशयास्पद वस्तू सापडल्यास पोलीसांना संशय येतो आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाते. सरसकट सर्व उमेदवारांच्या रक्ताचे आणि युरिनचे सॅम्पल लॅबकडे पाठवणं शक्य होत नाही. त्यामुळे नेहमीच असेल डोपिंगचे प्रकार पकडले जातीलच असं अजिबात नाही. Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? लवकरच सुरु होणार रजिस्ट्रेशन्स; त्याआधी हे डॉक्युमेंट्स ठेवा रेडी डोपिंगमध्ये पकडले गेल्यास आयुष्य होईल खराब समजा स्टेरॉईड घेऊन अति जोश निर्माण करण्यासाठी तुम्ही पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीला गेलात तर तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच भरतीदरम्यान तुम्ही कोणत्याही अमली पदार्थांचं सेवन केलेले आढळून आले तर तुमच्यावर त्याच क्षणी कठोर कारवाई केली जाऊ शकते. कायद्यानुसार तुमच्यावर पाच ते सात वर्षांचं बंदी घालण्यात येऊ शकते. तसंच ड्रग्स किंवा स्टेरॉईडचं सेवन केलं असल्यास तुमच्यावर संपूर्ण आयुष्यभर बंदी घालण्यात येऊ शकते. स्टेरॉईडचे शरीरावर होणारे परिणाम अपचन किंवा छातीत जळजळ वाढलेली भूक, ज्यामुळे वजन वाढू शकते झोपण्यात अडचण मनःस्थिती आणि वर्तनात बदल, जसे की चिडचिड किंवा चिंता वाटणे संसर्गाचा वाढलेला धोका – विशेषत: कांजिण्या, शिंगल्स आणि गोवर उच्च रक्त शर्करा किंवा मधुमेह हाडे कमकुवत होणे (ऑस्टिओपोरोसिस) उच्च रक्तदाब सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्टेरॉईड घेतल्यानंतर हार्ट अटॅकचाही धोका असू शकतो
या सर्व प्रकारावर बोलताना आयएमएचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “कोणत्याही शारीरिक चाचणीसाठी डोपिंगचे किंवा इंजेक्शन्स घेण्याचे प्रकार समोर येत असतात. स्पर्धेच्या युगात आपण कुठेही मागे राहू नये म्हणून तरुण असा गैरमार्ग स्वीकारतात. मत यामुळे तरुणांना दीर्घकाळ परीणाम भोगावे लागतात. या स्टिरॉइड्सची किंवा इंजेक्शन्सची सवय लागू शकते. यामुळे ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढू शकतो. तसंच यामुळे कँसर होण्याची शक्यताही असते. त्यामुळे या सर्व अंमली पदार्थांपासून तरुणांनी दूर राहावं.” एकूणच काय तर अशा मोठ्या भरती परीक्षांमध्ये उमेदवारांकडून अंमली पदार्थांचं सेवन केलं जाण्याची भीती अधिक असते. मात्र पोलिसांकडेही या विरोधात कठोर पावलं उचलण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. तसंच डोपिंग करण्याआधी उमेदवारांनी एकदा स्वतच्या आयुष्याचा आणि करिअरचा विचार करणं आवश्यक आहे. सरकारी नोकरी घेऊन कुटुंबाला खरंच आनंदी ठेवायचं असेल तर अशा कुठल्याही गैरप्रकारपासून दूर राहणंच फायद्याचं आहे.