मुंबई, 29 जुलै: दहावीचा निकाल (SSC Result 2020) जाहीर झाला. यंदाचा निकाल मागच्या 15 वर्षातला सर्वात उत्तम निकाल असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं. राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला असून कोकण विभाग अव्वल आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा 3 टक्के जास्त विद्यार्थिनींचा निकाल लागला आहे. विद्यार्थी आणि पालकांना हा निकाल बोर्डाच्या maharesult.nic.in या वेबसाईटवर आणि न्यूज 18 लोकमतवरही पाहता येणार आहे.
या वर्षीचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे 15 लाख विद्यार्थ्यांमधून 242 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. राज्यातील 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्यात 60 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती बोर्डानं दिली आहे.
हे वाचा-निकाल ते गुणपडताळणीपर्यंत सर्व प्रक्रिया Online, 4 पद्धतीनं भरता येणार शुल्कआता सर्वोत्तम 5 (Best of 5)विषयांच्या मार्कांच्या यादीत भूगोलाचा समावेश विद्यार्थी करू शकतात का हा प्रश्न होता. त्यावर बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी खुलासा केला आहे. शकुंतला काळे म्हणाल्या, "निकाल लावताना इतर विषयांच्या मार्कांची सरासरी काढून भूगोलचे गुण दिले आहे. कारण यंदा कोविड लॉकडाऊनमुळे भूगोलचा रद्द झाला होता. या विषयाचे गुण बेस्ट ऑफ 5 मध्ये गृहित धरता येतील." त्यामुळे विद्यार्थ्यांना भूगोलाच्या गुणांचा सर्वोत्तम 5 विषयांमध्ये फायदा होऊ शकतो.
यंदा एकूण 15 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात मुलींचा निकाल 96.91% लागला असून मुलांचा निकाल 93.99% लागला आहे. तर, विभागवारीनुसार कोकण विभागाचा 98.77 टक्क्यांसह सर्वात जास्त लागला आहे. तर, त्यानंतर कोल्हापूरचा 97.64 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा निकाल लागला आहे. तर, पुण्याचा 97.34 आणि मुंबईचा 96.72 % लागला आहे.