मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC Tips: Ukraine आणि Russia युद्धाबद्दल UPSC मध्ये येतील प्रश्न; अशा पद्धतीनं करा या विषयाचा अभ्यास

UPSC Tips: Ukraine आणि Russia युद्धाबद्दल UPSC मध्ये येतील प्रश्न; अशा पद्धतीनं करा या विषयाचा अभ्यास

Zelensky & Putin

Zelensky & Putin

या विषयाचा अभ्यास करताना युद्धातील दररोजच्या घडामोडींऐवजी, यामागचे भौगोलिक हितसंबंध, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संस्था यावर अधिक लक्ष देणं आवश्यक आहे.

मुंबई, 04 मार्च:   सध्या रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेलं युद्ध हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील (International Politics) सर्वांत महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक बनले आहे. जगात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणं हे यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गरजेचं असतं कारण त्यावर आधारित प्रश्न त्या परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे यूपीएससी (UPSC Union Public Service Commission) अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व (Prelims) आणि मुख्य परीक्षेसाठी (Main Exam) याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा अभ्यास करताना महत्त्वाचे मुद्दे अभ्यासावे लागतातच पण सरसकट सगळंच अभ्यासण्यात वेळ खर्च करणंही जिकीरीचं असतं कारण इतर अभ्यासक्रमही पूर्ण करायचा असतो. या परीक्षेसाठी चालू घडामोडीची माहिती घेणं आणि संबधित विषयांशी संबंध जोडणं महत्त्वाचे आहे.

युक्रेन, रशिया युद्ध: पूर्वपरीक्षेसाठी काय तयारी करावी

यूपीएससी प्रिलिम्स अर्थात पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विषयाचा अभ्यास करताना युद्धातील दररोजच्या घडामोडींऐवजी, यामागचे भौगोलिक हितसंबंध, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संस्था यावर अधिक लक्ष देणं आवश्यक आहे.

रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या (USA) नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आलेल्या उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचा अर्थात नाटोचा (NATO) पूर्व युरोपात विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे रशियाला धोका निर्माण होत असल्याचं सांगत रशियानं हे युद्ध छेडलं आहे.

तुम्हालाही Freelancing जॉब्स करायचे आहेत? मग 'या' टॉप वेबसाईट्सवर करा काम

यूएसएसआर म्हणजेच युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक (USSR) म्हणजे अखंड रशियाचे विघटन, वॉर्सा करार (Warsaw Treaty) मोडीत निघाल्यानंतर, नाटोने सोव्हिएत संघातून फुटून निघालेल्या अनेक देशांमध्ये आपला विस्तार करायला सुरुवात केली, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

विद्यार्थ्यांनी या युद्धाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या निगडीत असलेल्या देशांशी संबंधित महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांविषयी सखोलपणे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये युरोपियन युनियन, युरेशियन इकॉनॉमिक युनियन, ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप (OSCE), मिन्स्क I आणि मिन्स्क II करार, यासह फ्रान्स, जर्मनी, युक्रेन आणि रशिया यांचा समावेश असलेल्या नॉर्मंडी संवादाचा अभ्यास करणंही महत्त्वाचं आहे.

अभ्यासासाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रदेशाचं भौगोलिक महत्त्व. पूर्व परीक्षेत भौगोलिक वैशिष्ट्यांवर आधारित प्रश्न आवर्जून विचारले जातात. विद्यार्थ्यांनी काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांच्यामध्ये असलेल्या कॉकेशियसच्या प्रदेशावरही लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. या प्रदेशात समाविष्ट असलेल्या देशांमध्ये रशिया, अर्मेनिया, अझरबैजान आणि जॉर्जिया या पूर्वीच्या सोव्हिएत राज्यांचा समावेश आहे. क्रिमियाचे महत्त्व, बंदराचे धोरणात्मक महत्त्व. सेवस्तोपोल बंदर आणि नौदलाचं धोरणात्मक महत्त्व, हवामानशास्त्र आणि सागरी वैशिष्ट्ये याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे.

2008 मध्ये रशियन हस्तक्षेपाचा फटका बसलेले जॉर्जियाचे दक्षिण ओसेशिया आणि अबखाझिया हे दक्षिणेकडील प्रदेश, युक्रेनमधील लुहान्स्क आणि डोनेस्तक हे पूर्वेकडील जिल्हे जे सध्याच्या संकटाचे मुख्य कारण आहेत, त्यांच्याही अभ्यास करणं अनिवार्य आहे. यांच्या स्थानमहात्म्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात.

आता डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही? आनंद महिंद्रा करणार हे काम!

युद्धखोर रशियावर दबाव आणण्यासाठी पाश्चिमात्त्य देशांनी (Eastern Countries) रशियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. विद्यार्थ्यांनी याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. जागतिक अर्थकारण, त्याची रचना, वैशिष्ट्ये आणि महत्त्व याची सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे. बेल्जियमस्थित सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन (SWIFT) आणि G-10 मध्यवर्ती बँका यांचं महत्त्व जाणून घेणं आवश्यक आहे. या महत्त्वाच्या आर्थिक संस्थानी रशियावर निर्बंध लादले आहेत. तसंच SWIFT ची जागा घेण्यासाठी रशियाने विकसित केलेल्या सिस्टम फॉर ट्रान्सफर ऑफ फायनान्शियल मेसेजेस (SPFS) या आंतरराष्ट्रीय आर्थिक संदेश प्रणालीपासूनही रशियाला दूर करण्यात आलं आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2. ही युरोपमधील ऑफशोअर नैसर्गिक वायू पुरवठा करणारी पाइपलाइन असून ती रशियातून जर्मनीपर्यंत जाते. सध्या जर्मनीनं याचे काम रोखलं आहे. रशियासाठी ही पाईपलाईन अत्यंत महत्त्वाची असून, यात त्यांची मोठी आर्थिक गुंतवणूक आहे. यावरील निर्बंध रशियासाठी अडचणीचे ठरू शकतात.

तसंच पूर्व परीक्षेसाठी भारत-रशिया संबंधांचे (India-Russia Relationship) काही महत्त्वाचे धोरणात्मक मुद्देही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी S-400 करार आणि ऑपरेशन गंगा आदींचा समावेश आहे.

मुख्य परीक्षेची तयारी करताना युक्रेन, रशिया युद्ध याचा कसा अभ्यास करावा?

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी जनरल स्टडीज-2 म्हणजे सामान्य ज्ञान (General Studies) विषयाचा दुसरा पेपर हा आंतरराष्ट्रीय राजकारणावर आधारीत असतो.

विद्यार्थ्यांनी या संकटाचा कालावधी आणि त्याचा जागतिक राजकारणावर होणारा परिणाम, विशेषत: मानवी हक्क आणि सुरक्षितता तसंच भारताच्या हितावर (India's Interest) याचा होणारा परिणाम याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी संयुक्त राष्ट्र (UN) सुरक्षा परिषद, संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेतील घडामोडी, तसंच या विषयावर भारतानं घेतलेली भूमिका, संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं महत्त्व आणि हा वाद सोडवण्यासाठी राजनैतिक चर्चेची गरज स्पष्ट करत मांडलेली भारताची भूमिका, भारताचे निवेदन यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे.

Career Tips: MR म्हणजे नक्की काय? कसं करू शकता यामध्ये करिअर? इथे मिळेल माहिती

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या शांतता आणि अहिंसा मूल्यांचे व्यावहारिक महत्त्व, आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करताना पाश्चात्य देश आणि रशियाशी असलेल्या संबधांत संतुलन साधण्याचा मार्ग काढण्यासाठी भारतानं घेतलेल्या भूमिकेचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.

या विषयावर जनरल नॉलेजच्या दुसऱ्या पेपरमध्ये (GS1) थेट प्रश्न विचारले जातील, तर पहिल्या पेपर (GS1) मध्ये जगाच्या भूगोलाशी संबंधित अप्रत्यक्ष प्रश्नदेखील विचारले जाऊ शकतात. तर चौथ्या पेपरमध्ये (GS4) लोकशाही आणि शाश्वत शांतता, अण्वस्रांचं राजकारण, निर्वासितांचे संकट, यावरील वादविवाद. मानवी हक्कांचे अपयश, नियम, नैतिक समस्या यावर प्रश्न विचारले जातील. निबंधलेखनासाठी जागतिक प्रशासन, बदलती जागतिक व्यवस्था आणि नवीन आंतरराष्ट्रीय नियमांची, यंत्रणांची आवश्यकता इत्यादी महत्त्वाचे विषय येऊ शकतात.

मुख्य परीक्षेत पर्यायी पेपरची सुविधा असते. अशावेळी विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर, विशेषत: मूळ सिद्धांत आणि संकल्पनांमधील परस्परसंबंध तसंच नव्याने निर्माण होत असलेल्या समस्या या मुद्द्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. 'रशियन मीर' किंवा 'रशियन जग' या संकल्पना, पुतीन आणि लावरोव्हसारख्या रशियन नेत्यांची 'लिमिटेड सोव्हेर्निटी' म्हणजेच मर्यादित सार्वभौमत्वाची संकल्पना यावर पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये प्रश्न असू शकतात.

PSIR च्या दुसऱ्या पेपरमधील A विभागामधील आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत युक्रेनचे संकट आणि वास्तववादाचे पुनरुज्जीवन, आक्रमक वास्तववाद आणि सुरक्षेचं संकट आणि त्याला केलेला प्रतिकार याबाबत प्रश्न येऊ शकतात. जागतिक राजकारणातील बदलतं ध्रुवीकरण, रशिया आणि चीनसारख्या शक्तींचा सध्याच्या जागतिक व्यवस्थेवरील परिणाम याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

विद्यार्थी रशियाला युद्धापासून परावृत्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) असमर्थता, यासाठी कारणीभूत ठरलेल्या संस्थेतील संरचनात्मक त्रुटी आणि त्यात सुधारणा करण्याची गरज यांचा परस्पर संबध जाणून घेणं आवश्यक आहे.

भारताच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित PSIR च्या B विभागातील दुसऱ्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना सध्याच्या संकटाचा भारताच्या हितसंबंधांवर कसा परिणाम होऊ शकतो आणि जागतिक व्यवस्थेतील एक जबाबदार शक्ती म्हणून भारत कशी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी नॉन-अलाइनमेंटऐवजी इश्यू अलाईनमेंटकडे वाटचाल म्हणून संबोधित केलेला भारताचा प्रतिसाद भारताच्या परराष्ट्र धोरणातील (External Affairs Policy) आदर्शवादाकडून वास्तववादाकडे चालू असलेला बदल दर्शवत आहे. त्याविषयी विद्यार्थ्यानी लक्ष देणं गरजेचं आहे.

फ्रेशर्स उमेदवारांनो, Google मध्ये जॉबची मोठी संधी सोडू नका; इथे करा Apply

सध्याच्या या जागतिक संकटाचं विश्लेषण कौटिल्य मंडल सिद्धांत वापरून केले जाऊ शकते. जागतिक राजकारणात परिवर्तन करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकन वर्चस्वाचा प्रतिकार करण्यासाठी नवीन 'विजिगीषू' म्हणजे महत्त्वाकांक्षी, खंबीर शक्ती उदयास येत असल्याचं मानलं जात आहे.

अशा पद्धतीने रशियाचा इतिहास, भौगोलिक स्थिती, आताचे व्यापारी व्यवहार, रशियाची गुंतवणूक तसंच युक्रेनशी संबंधित मुद्दे यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी या लेखात मुद्दे देण्यात आले आहेत. त्याबद्दस सविस्तर साहित्य गोळा करून ते वाचायला हवं. म्हणजे विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून (Students) या विषयाचा सर्वसमावेशक अभ्यास झाला असं म्हणता येईल. यातूनच त्यांची यूपीएससी परीक्षेसाठी तयारी होईल.

(स्लीपि क्लासेसच्या राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या अध्यापन संचालक प्रेरणा त्रेहान यांनी हा लेख लिहिला आहे.)

First published:

Tags: Career, Tips, Upsc exam, जॉब