जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / क्या बात है! IISC नं केली कमाल; World University Rankings मध्ये IIT 's ला मागे सारत मिळवली जागा

क्या बात है! IISC नं केली कमाल; World University Rankings मध्ये IIT 's ला मागे सारत मिळवली जागा

बेंगळुरूमधील आयआयएससी

बेंगळुरूमधील आयआयएससी

बेंगळुरूमधील आयआयएससीने एका वर्षात 31 स्थानांची झेप घेऊन क्यूएस (QS) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या (World University Rankings) 2023मधील यादीत सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय संस्था म्हणून स्थान मिळवले आहे.

    मुंबई, 09 जून:   भारतातील शिक्षण व्यवस्था आणि विविध शिक्षण संस्थांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली ओळख मिळत आहे. देशातील काही शिक्षण संस्थांना तर जागतिक महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेषत: आयआयटीमधून (IIT) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता कोट्यवधी रुपये पगाराच्या नोकऱ्या सहज दिल्या जात आहेत. एकूणच देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये आयआयटीचा वरचष्मा आहे. मात्र, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अर्थात आयआयएससीने (IISc) आता आयआयटीला मागे टाकलं आहे. बेंगळुरूमधील आयआयएससीने एका वर्षात 31 स्थानांची झेप घेऊन क्यूएस (QS) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या (World University Rankings) 2023मधील यादीत सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय संस्था म्हणून स्थान मिळवले आहे. क्यूएस ही लंडनस्थित उच्च शिक्षण विश्लेषण फर्म आहे. या फर्मच्या विश्लेषणानुसार, भारतीय संस्थांच्या क्रमावारीत आयआयएससीच्या कामगिरीमुळे आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) दुसऱ्या स्थानावर तर आयआयटी दिल्ली (IIT Delhi) तिसऱ्या स्थानावर गेलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जागतिक क्रमवारीत आयआयएससीने 155वा क्रमांक मिळवला आहे. आयआयटी बॉम्बे आणि दिल्ली अनुक्रमे 172 आणि 174 व्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या स्थानामध्ये अनुक्रमे पाच आणि 11 स्थानांची सुधारणा झाली आहे. 2017 पासून जागतिक दर्जाच्या पहिल्या 200 शिक्षण संस्थामध्ये भारतातील फक्त या तीनच संस्थांचा समावेश होत आहे. यावर्षी जगभरातील सर्वोच्च एक हजार शैक्षणिक संस्थामध्ये भारतातील 27 संस्थांचा समावेश आहे. मागील वर्षी हा आकडा 22 होता. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, क्यूएसचे प्रवक्ते विल्यम बार्बिरी (William Barbieri) यांनी आयआयएससीच्या कामगिरीतील उल्लेखनीय वाढीचे कौतुक केले आहे. आयआयएससी हे भारतातील आठ सार्वजनिक संस्थांपैकी (IoE) एक आहे. ज्या निकषांच्या आधारावर क्रमवारी तयार केली जाते त्या सहा निकषांपैकी चार निकषांमध्ये आयआयएससीने कमालीची सुधारणा दर्शवली आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा (AR), नियोक्ता प्रतिष्ठा (ER), प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तर (FSR), पर फॅकल्टी सायटेशन्स (CpF), आंतरराष्ट्रीय फॅकल्टी गुणोत्तर आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर, या निकषांमध्ये सुधारणा झाली आहे. Success Story: तब्बल 7.5 कोटींचं पॅकेज धुडकावून सुरू केलं कोचिंग; आज बनलीय देशातील युनिकॉर्न कंपनी बार्बिरी म्हणाले,‘QS निकषांबाबतही हे वर्ष आयआयएससीसाठी अपवादात्मक ठरलंय. संस्थेने केलेला जबदस्त परफॉरमन्स, शिक्षकांनी मिळवलेले पुरस्कार, शैक्षणिक यश हे सगळं अद्वितीयच आहे. त्यामुळे ही संस्था वर्ल्ड लीडर ठरली आहे आणि हे सगळं अनेक वर्षांपासून बदललेलं नाही त्यामुळेच ती संस्था अनेक वर्षं या यादीतील सर्वोच्चस्थानी राहिली आहे. QS च्या इतर निकषांमध्येही केलेल्या सुधारणांमुळे संस्थेचा परफॉरमन्स प्रभावशाली झाला आहे.’ आयआयसीने सहापैकी चार मेट्रिक्समध्ये प्रगती केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आंतरराष्ट्रीय फॅकल्टीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय, अॅकॅडमिक आणि एम्प्लॉयर रेप्युटेशनमधील (Employer Reputation) लक्षणीय सुधारणा यामुळे ही संस्था क्रमवारीत सरस ठरली आहे. क्युएच्या (Quacquarelli Symonds) सीपीएफ निर्देशांकानुसार, विद्यापीठांतील फॅकल्टीच्या संख्येचा विचार केला असता आयआयएससी बेंगळुरू हे जगातील सर्वोच्च संशोधन विद्यापीठ ठरलं आहे. यासाठी संस्थेला 100 पैकी 100 असे परिपूर्ण गुण मिळाले आहेत. याशिवाय, क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमधील पहिल्या 200 संस्थांपैकी आयआयएससी बेंगळुरू हे दक्षिण आशियातील सर्वांत वेगाने विकसित होणारं विद्यापीठ आहे. एकूणात काय या यादीत स्थान मिळवलेल्या भारतातील 41 शिक्षण संस्थांनी इतर अनेक महत्त्वाच्या निकषांमध्ये खूपच खराब परफॉरमन्स दाखवला आहे. उदाहरणादाखलच सांगायचं झालं तर 41 पैकी 30 विद्यापीठांनी FSR इंडिकेटरमध्ये कमी गुण मिळवलेत. केवळ 4 विद्यापीठांनी या इंटिकेटरमध्ये आपल्या आधीच्या कामापेक्षा चांगलं काम करून दाखवलं आहे म्हणजेच सुधारणा करत चांगले गुण मिळवले आहेत. एका सकारात्मक नोंदीनुसार, आता दोन भारतीय विद्यापीठांनी फॅकल्टी आणि विद्यार्थी गुणोत्तरासाठी पहिल्या 250 मध्ये स्थान मिळवलं आहे. यापूर्वी एकाही विद्यापीठाचा यामध्ये समावेश नव्हता. या मेट्रिकमध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) (FSR साठी 225 वे) आणि ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी (FSR साठी 235 वे), त्यानंतर आयआयएसी बेंगळुरू (FSR साठी 276 वे) यांचा समावेश आहे, असं क्यूएसने नमूद केलं आहे. जागतिक स्तरावर, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला (Massachusetts Institute of Technology ) सलग 11व्या वर्षी सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून निवडण्यात आलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर केंब्रिज विद्यापीठ (University of Cambridge) आणि तिसऱ्या क्रमांकावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ**(Stanford University)** आहे. पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये चीनमधील 28 विद्यापीठं आहेत. तर, पहिल्या 100 मध्ये सहा चिनी विद्यापीठांचा समावेश आहे. चीनमधील पेकिंग विद्यापीठ (Peking University) 12व्या स्थानावर आणि त्सिंगुआ विद्यापीठ (Tsinghua University) 14व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, एक आयआयटी कॅम्पस वगळता इतर सर्व आयआयटींच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. आयआयटी इंदूरने (IIT-Indore) जागतिक स्तरावर 396 वे स्थान मिळवून या यादीत पदार्पण केलं आहे. तर, आयआयटी भुवनेश्वरने 651 ते 700 या पट्ट्यात पहिल्यांदा स्थान मिळवलं आहे. रिपोर्ट्समध्ये असं दिसून आलं आहे की, पहिल्या 500 संस्थामध्ये आयआयएसी व्यतिरिक्त, दिल्ली, बॉम्बे, मद्रास, कानपूर, खरगपूर, रुरकी, गुवाहाटी, इंदूर या आयआयटींचा समावेश आहे. इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स स्कीम (Institute of Eminence Scheme) सुरू झाल्यापासून पाच वर्षांच्या काळात इतर कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी श्रेणीतील भारतीय विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही. मोठी बातमी! राज्यातील तासिका तत्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांना मोठा दिलासा; मानधनात होणार वाढ; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा दहा सार्वजनिक आणि अनेक खासगी भारतीय उच्च शिक्षण संस्थांना एका दशकात क्यूएससारख्या प्रतिष्ठित रँकिंगमधील पहिल्या 500 क्रमांकामध्ये आणि नंतर पहिल्या 100मध्ये आणणं हे आयओई स्कीमचं उद्दिष्ट होतं. ही योजना चालवण्‍यासाठी सक्षम तज्ज्ञ समिती नसूनही ती कार्यरत आहे. आठ सार्वजनिक IoEs पैकी पाच (आयआयएससी, आयआयटी बॉम्बे, दिल्ली, मद्रास आणि खरगपूर) संस्थांनी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. तर, दिल्ली विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठांची अनुक्रमे 501 ते 510 आणि 521 ते 530 या पट्ट्यावरून 651 ते 700 आणि 751ते 800 पट्ट्यात घसरण झाली आहे. बनारस हिंदू विद्यापीठ या सार्वजनिक संस्थेने 1 हजार 1 ते 1 हजार 200 या पट्ट्यामध्ये स्थान मिळवलं आहे. QS नुसार क्रमवारीत 651 ते 700 या पट्ट्यात खासगी विद्यापीठ असलेल्या ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने स्थान मिळवलं आहे. इतर दोन खासगी विद्यापीठांपैकी मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन 751 ते 800 या पट्ट्यात तर बिट्स पिलानी 1001 ते 1200 या पट्ट्यात आहेत. गेल्या वर्षीही ही विद्यापीठं याच पट्ट्यांत होती. हा अहवाल जगभरातील एक लाख 51 हजार शैक्षणिक संस्था आणि 99 हजार एम्प्लॉयर्सच्या प्रतिसादाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. क्यूएसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेन सॉटर (Ben Sowter) म्हणाले: “क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या माध्यमातून असं दिसतं की, अनेक भारतीय विद्यापीठं त्यांच्या संशोधनाच्या कामात सुधारणात करत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम म्हणून जागतिक स्तरावर त्यांची प्रतिष्ठा वाढत आहे. याशिवाय, आमचा डेटासेट असंही सूचित करतो की, भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत.”

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात