मुंबई, 11 नोव्हेंबर: भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे, असं म्हटलं जातं. भारतामध्ये क्रिकेटला धर्माचा दर्जा दिला जातो. त्यामुळे भारतीय कुठल्याही मालिकेत भारतीय टीमला पाठिंबा देतात आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून ते अगदी गल्ली-बोळापर्यंत क्रिकेटच्या चर्चा रंगत आहेत. क्रिकेटच्या नियमांपासून ते खेळाडूंच्या कामगिरीपर्यंत सर्वांनाच प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. क्रिकेटची थोडी-फार माहिती असलेल्या व्यक्ती अशा चर्चांमध्ये आपापली मतं मांडताना दिसतात. क्रिकेटच्या ग्राउंडचा विचार केला तर तिथं अंपायर ही अशी व्यक्ती असते जिला खेळात घडणाऱ्या घटनांबाबत नियमांना अनुसरून निर्णय जाहीर करण्याचा अधिकार असतो. अंपायरचा प्रत्येक निर्णय मॅचवर परिणाम करू शकतो. मैदानावर अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत असलेला अंपायर होण्यासाठी काय करावं लागतं, एका मॅचसाठी त्यांना किती मानधन मिळतं, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का?
अम्पायर होण्यासाठी काय आहेत निकष?
अंपायर होण्यासाठी तुमची नजर, फिटनेस आणि क्रिकेटच्या नियमांबद्दलची माहिती इत्यादी बाबींकडे सर्वाधिक लक्ष दिलं जातं. अंपायर होण्यासाठी क्रिकेटची पार्श्वभूमी आवश्यक नाही. पण जर तुम्ही कधी क्रिकेट खेळलंअसेल तर त्याचा फायदा नक्कीच होईल. अंपायर होण्यासाठी एका विशिष्ट प्रक्रियेतून जावं लागतं. आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरिंग करण्यासाठी काही परीक्षादेखील उत्तीर्ण व्हाव्या लागतात.
बीसीसीआय कशी करते अम्पायर्सची निवड?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) चार ग्रेडचे अंपायर्स आहेत. ज्यामध्ये 'ए' ते 'डी' ग्रेडचा समावेश आहे. बीसीसीआयमध्ये 'ए' ग्रेडमध्ये सुमारे 20 अंपायर असतात. स्टेट क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदणी करणं ही अंपायर होण्याची पहिली पायरी आहे. तुम्हाला अगोदर स्थानिक मॅचेसमध्ये अंपायरिंग करावी लागेल. तुमच्या अनुभवाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर स्टेट असोसिएशनमध्ये विशेष स्थान निर्माण करावं लागेल. यानंतर स्टेट असोसिएशन कँडिडेटचं नाव पुढे पाठवते. हे नाव बीसीसीआय अंपायरिंगसाठी नाही तर बीसीसीआय घेत असलेल्या परीक्षेसाठी पाठवलं जातं. ही 'लेव्हल वन' परीक्षा असते.
हेही वाचा - Eng vs Pak: 13 ऐवजी 14 नोव्हेंबरला होणार वर्ल्ड कप फायनल? पाहा सर्वात मोठी अपडेट
बीसीसीआयच्या परीक्षा
बीसीसीआय दरवर्षी अंपायरिंगची परीक्षा घेतं. यासाठी बीसीसीआयतर्फे कोचिंग क्लासेसचंही आयोजन केलं जातं. पहिल्या तीन दिवशी कोचिंग असतं आणि चौथ्या दिवशी लेखी परीक्षा असते. यामध्ये गुणवत्तेच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाते. निवडलेल्या उमेदवाराला ‘इंडक्शन कोर्स’ दिला जातो आणि नंतर अंपायरिंगबद्दल शिकवलं जातं. यानंतर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर लेव्हल-2 परीक्षेसाठी उमेदवार पात्र ठरतो. लेव्हल-2मध्ये वैद्यकीय चाचणी होते आणि त्यानंतर बीसीसीआय अंपायर होण्याची संधी मिळते. या परीक्षेच्या तयारीसाठी मार्केटमध्ये काही पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही ती खरेदी करून परीक्षेची तयारी करू शकता.
हेही वाचा - T20 World Cup: पराभवानंतर मैदानातच रोहित रडला, पण त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये पाहा काय काय घडलं?
अंपायरला किती मिळते मॅच फी?
अंपायरचं मानधन त्याची लेव्हल आणि ज्येष्ठतेच्या आधारावर ठरवला जातो. यासोबतच त्यांच्या पॅनलच्या आधारावरही फी निश्चित करता येते. काही महिन्यांपूर्वीच बीसीसीआयनं अंपायरच्या वेगवेगळ्या ग्रेडची माहिती दिली होती. त्या माहितीनुसार, ए ग्रेडमध्ये 20, बी ग्रेडमध्ये 60, सी ग्रेडमध्ये 46 आणि डी ग्रेडमध्ये 11 अंपायर आहेत. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, ए ग्रेडमधील अंपायरला दररोज सुमारे 40 हजार रुपये मॅच फी दिली जाते. बी ग्रेडमधील अंपायर्सला 30 हजार रुपये फी दिली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.