लंडन, 27 सप्टेंबर : लाखो रुपयांचं पॅकेज मिळणार असेल तर काही जण कदाचित वर्क प्रोफाइलही नीट पाहू इच्छित नाहीत (Dream job). विचार करा, समजा शेतातली भाजी काढण्यासाठी वर्षाला 63 लाख रुपये (£62,400 salary for cabbage picking) पगार कोणाला देण्यात येणार असेल, तर ती व्यक्ती ते काम का करू इच्छिणार नाही बरं? ब्रिटनमध्ये एका फार्मिग कंपनीकडून पूर्ण वर्षभर शेतातल्या केवळ कोबी आणि ब्रोकोलीची तोडणी (Cabbage and Broccoli pickers) करण्याच्या कामासाठी प्रचंड मोठा पगार देऊ केला जात आहे. तसंच या नोकरीबद्दलच्या आणखीही काही गोष्टी आहेत, की ज्या त्या नोकरीकडे अनेकांना आकर्षित करून घेऊ शकतील.
T H Clements and Son Ltd या कंपनीकडून भरतीसाठीची जाहिरात ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या जाहिरातीत असं म्हटलं आहे, की पूर्ण वर्षभर कोबी आणि ब्रोकोली तोडण्याच्या नोकरीसाठी ताशी £30 म्हणजेच भारतीय चलनात 3000 रुपयांपेक्षा जास्त मानधन दिलं जाणार आहे. म्हणजेच वर्षभर ही नोकरी करणाऱ्याला £62,400 म्हणजेच 63,11,641 रुपयांचं पॅकेज दिलं जाणार आहे. हे शारीरिक मेहनतीचं काम असून, एकदा ते स्वीकारलं तर वर्षभर करावंच लागेल, असं जाहिरातीत जॉब प्रोफाइलमध्ये लिहिलेलं आहे.
हे वाचा - 9 ते 5 ची नोकरी नको गं बाई! महिलेने शोधला नवा मार्ग, आता कमावते लाखो रुपये!
या नोकरभरतीसाठी दोन जाहिराती ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. एका जाहिरातीत असं लिहिलेलं आहे, की कंपनीला कोबीची तोडणी करण्यासाठी Field Operatives ची गरज आहे. हे पीसवर्क आहे. म्हणजेच जितके कोबी किंवा ब्रोकोली तोडली जाईल, त्या हिशेबाने पैसे मिळतील. त्या नोकरीसाठी तासाला 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण वर्षभर चालणारं आहे. नोकरी असली, तरीही निश्चित वेतन न ठेवता आपण जितकं काम करू तितके पैसे देण्याचा पर्याय यात देण्यात आला आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार जास्त काम करून जास्त पैसेही मिळवू शकते. शेतीच्या कामात एवढा प्रचंड पगार दिला जाणं हीच मुळात आश्चर्यकारक गोष्ट आहे.
हे वाचा - Reliance Jio Recruitment: रिलायन्स जिओ मुंबई इथे इंजिनिअरिंग फ्रेशर्सना संधी
सध्या ब्रिटनमध्ये (United Kingdom) कामगारांची संख्या घटली आहे. त्यामुळे सरकार सीझनल अॅग्रिकल्चरल वर्क्स स्कीमअंतर्गत बाहेरच्या नागरिकांना 6 महिने तिथे येण्याची संधी देत आहे, जेणेकरून ते तिथे शेतीत काम करू शकतील. केवळ शेतीच नव्हे, तर सध्या त्या देशात अन्य अनेक क्षेत्रांत कर्मचाऱ्यांची/कामगारांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे एवढं मोठं वेतन देऊ केलं जात आहे. ड्रायव्हर्सपासून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्यांपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनात तब्बल 75 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Farmer