नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: CBSE दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 मध्ये दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. पहिली टर्म नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये होणार आहे. मंडळातर्फे या महिन्यात परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर जाहीर केले जाणार आहे. टर्म 2 ची परीक्षा मार्च ते एप्रिल 2022 दरम्यान घेतली जाणार आहे. टर्म 1 परीक्षेचे आयोजन 4 ते 7 आठवड्यांमध्ये केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
CBSE ने यंदा परीक्षा सेमिस्टर पद्धतीप्रमाणे (Semester Pattern) दोन टप्प्यांत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पहिली टर्म परीक्षा (First Term Exam) 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान, तर दुसरी टर्म परीक्षा पुढील वर्षी मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणार आहे. लवकरच याचे वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे. या दोन टप्प्यांत होणाऱ्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमही दोन भागांत विभागला जाणार आहे. दोन्ही परीक्षांचे गुण एकत्र करून अंतिम निकाल तयार केला जाईल.
परीक्षा पद्धतीप्रमाणे अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला असून, अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. तसंच तो दोन भागांत विभागला जाणार आहे. CBSE च्या वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शाळा आता हळूहळू सुरू होत आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थित सुरू झाल्या, तर पहिल्या टर्ममधील गुणांचे मूल्य (वेटेज) कमी केले जाईल आणि दुसऱ्या टर्मच्या गुणांचे वेटेज वाढवले जाईल. शाळा बंदच राहिल्या, तर मात्र अंतर्गत मूल्यांकन, प्रात्यक्षिक प्रकल्प आणि थिअरी विषयांत विद्यार्थ्याने मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल तयार केला जाईल आणि दोन्ही टर्म परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घरातूनच होतील. पहिल्या टर्मसाठी शाळाच प्रॅक्टिकल परीक्षा घेईल.
अंतिम निकालासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 टप्प्यातील चाचण्या (Unit Tests), विषयानुसार प्रकल्प (Projects), प्रात्यक्षिक प्रकल्प (Practical Projects), आकलन आणि प्रतिसाद यावर अंतर्गत मूल्यमापन करून गुण दिले जातील. तर बारावीसाठी चाचणी परीक्षा, संशोधनात्मक उपक्रम, प्रात्यक्षिक आणि प्रकल्प यासंबंधी अंतर्गत मूल्यमापन गुण दिले जातील.
परिस्थिती सुधारल्यास प्रत्यक्ष परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये किंवा जवळच्या केंद्रावर (Exam centres) परीक्षा देण्यासाठी बोलावले जाऊ शकते. तेव्हा 2 तासांची सविस्तर लेखी परीक्षा होईल. सामाजिक अंतर (Social Distancing) आणि कोरोनाचे सुरक्षा नियम (Corona Protocols) लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांबाबतचा निर्णय घेतला जाईल,असं CBSE ने स्पष्ट केलं आहे. पहिल्या टर्मच्या प्रात्यक्षिक परीक्षा शाळांतर्फे होतील. परिस्थिती सुधारली, तर दुसऱ्या टर्ममधील प्रात्यक्षिक परीक्षा CBSE तर्फे घेतली जाईल.
15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पहिल्या टर्ममधील परीक्षेसाठी पेपर MCQ वर आधारित असेल, ते ओएमआर शीटवर भरावे लागेल. त्याकरता विद्यार्थांना पेन वापरावा लागेल. चुकीचे वर्तुळ चिन्हांकित केले असेल, तर दुरुस्तीचा पर्यायदेखील दिला जाईल. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या चार वर्तुळांव्यतिरिक्त रिकामी जागा दिली जाईल. चुकीच्या उत्तरावर काट मारून उत्तर रद्द करून योग्य उत्तर देता येईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्याना 50 पैकी कोणतेही 45 प्रश्न सोडवण्याचा पर्याय असेल. या परीक्षेची नमूना प्रश्नपत्रिका सीबीएसईच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे.
उदाहरणार्थ एका प्रश्नाच्या उत्तरातील A उत्तराचा गोल विद्यार्थ्याने काळा केला आणि नंतर त्याला वाटलं की B हे उत्तर बरोबर आहे तर तो A या काळ्या गोलावर काट मारेल आणि B च्या समोरचा गोल काळा करेल तसंच पुढे शेवटच्या पर्यायासाठी मोकळी जागा असेल तिथं योग्य उत्तर B असं लिहेल.
सीबीएसईने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आणि अभ्यासक्रम याबाबत सविस्तर माहिती जाहीर केल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सर्वांनाच दिलासा मिळाला असून, यंदा सर्व परीक्षा सुरळीत पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 10th class, Board Exam, CBSE, Examination