कोची, 14 डिसेंबर : स्त्रीने मनात आणलं तर ती काहीही करू शकते. स्त्रीच्या निग्रही वृत्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केरळच्या (Kerala) कुट्टीअम्मा (kutiiyamma). वयाच्या तब्बल 104 व्या वर्षी त्यांनी शिकायला (Learning) सुरुवात केली आणि बघता बघता त्यांनी साक्षरता परीक्षेचा (Saksharta Abhiyan) टप्पा 89 टक्के गुणांनी पार केला. त्यांच्या या कामगिरीने सगळ्यांनाच थक्क केलं आहे. कोट्टायमच्या (kottayam) रहिवासी असलेल्या कुट्टीअम्माची चर्चा सगळीकडे सुरू असून, केरळच्या शिक्षणमंत्र्यांनी (Education Minister) त्यांचं अभिनंदन करून त्यांचा फोटो ट्विट केला आहे. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते कुट्टीअम्मानी सिद्ध करून दाखवलं असून, अनेकांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.
शिक्षणासाठी काही ठरावीक वय नसतं; माणूस आयुष्यभर शिकत असतो असं म्हटलं जातं. अर्थात अनेकांना आयुष्याची लढाई लढताना शिक्षण सोडावं लागतं. विशेषत: जुन्या काळी महिलांना तर शिकण्याचा अधिकारच नव्हता. त्यातून संसारिक जबाबदाऱ्या, स्त्री शिक्षणाकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन यामुळे स्त्रियांना शिकण्याची संधी फार कमी मिळत असे. साधारण 100 वर्षांपूर्वी आपल्या देशात काय स्थिती होती याची सर्वांनाच कल्पना आहे. तेव्हा तर स्त्रियांना शिकायला पाठवणं म्हणजे पाप मानलं जात असे. या काळात जन्मलेल्या कुट्टीअम्मा यांना शिकण्याची संधी न मिळणं साहजिकच होतं. कुट्टीअम्मा सांगतात, की त्यांच्या काळात मुलींच्या शिक्षणावर भर तर नव्हताच; पण मुलंही चौथीपेक्षा जास्त शिकत नसत. त्यात त्यांचे वडील भूमिहीन शेतकरी होते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळेही शिकणं कठीणच होतं.
Job Alert: राज्यातील 'या' AIIMS मध्ये प्रोफेसर पदांच्या 32 जागांसाठी Vacancy
शाळेचं (School) तोंडही न पाहिलेल्या कुट्टीअम्मा यांची शिकण्याची आस कायम होती. त्यामुळे केरळ राज्य साक्षरता अभियानाअंतर्गत शिकण्याची संधी मिळताच त्यांनी वयाच्या 104व्या वर्षी शिक्षणाचा श्रीगणेशा केला. या वयातही पूर्णपणे निरोगी असलेल्या कुट्टीअम्माना कानांनी थोडं कमी ऐकू येतं; पण त्यांचा उत्साह अमाप आहे. कमी ऐकू येत असल्यानं त्यांनी परीक्षेच्या वेळी निरीक्षकांना मोठ्या आवाजात सूचना देण्याची विनंती केली होती. अतिशय उत्साही अशा कुट्टीअम्मांनी नुकत्याच झालेल्या केरळ साक्षरता परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवले. या परीक्षेची तयारी करताना त्यांनी पहिल्यांदा पेन हातात धरलं होतं. आता त्यांना आणखी हुरूप आला असून आता त्यांनी समानता चाचणी उत्तीर्ण करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे. त्यासाठी त्या चक्क इंग्रजी शिकत (English) आहेत. ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल; पण इंग्रजी शिकण्यासाठी त्या रोज 2 तास पेपर वाचतात. कुट्टीअम्मांना वाचनाची विलक्षण आवड आणि उत्साह आहे. प्राथमिक शिक्षण (Primary Education) पूर्ण केल्याशिवाय हे जग सोडणार नाही, असा निर्धार कुट्टीअम्मा यांनी केला आहे. आयुर्वेदामुळे (Ayurveda) या वयातही आपण निरोगी असल्याचं सांगणाऱ्या कुट्टीअम्मा महिलांनाच नव्हे, तर तरुणांनादेखील प्रेरणा देतात.
कुट्टीअम्मा यांच्या या उत्साहाने, जिद्दी वृत्तीमुळे त्यांना अक्षर ओळख करून देणारी साक्षरता अभियानातली तरुण कार्यकर्ती रिहाना जानही स्तिमित झाली. अतिशय उत्साहाने ती त्यांना शिकवत असून, आता समानता चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर ती त्यांना चौथ्या श्रेणीचा अभ्यास शिकवण्यास सुरुवात करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Kerala, Online education