• Home
  • »
  • News
  • »
  • blog-space
  • »
  • हेल्मेटसक्तीसंदर्भात कोल्हापूरकरांचं विश्वास नांगरे-पाटलांना खुलं पत्रं

हेल्मेटसक्तीसंदर्भात कोल्हापूरकरांचं विश्वास नांगरे-पाटलांना खुलं पत्रं

खरं कोल्हापुरातल्या रस्त्यांवर हेल्मेट घालून कसं ओ गाडी चालवायचं...रविवारचं मटण आणाय भाईर पडलो तरी काय आमी हेल्मेट घालायचं व्हय पंचगंगा घाटावर गेलो तर काय हेल्मेट घालायचं व्हयं, खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ खायला गेलो तर काय हेल्मेट घालायचं व्हय...अवो सायेब आमचं रस्तं केवडं..

  • Share this:
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, कोल्हापूर माननिय नांगरे पाटील सायबास्नी...सप्रेम नमस्कार.... रामराम सायेब...लई दिस झालं तुमच्याशी बोलायचं म्हणूत हुतो...खरंतर येळंच मिळत नव्हता...आज जरा येळं मिळाला...म्हणून हा केलेला आटापिटा...सायेब कोल्हापूरमध्ये तुमी आयजी म्हणून आला आणि तुमच्या कारकीर्दीची परचिती आमास्नी येईल, असं वाटलं...तशी परचिती आलीबी... नाही असं काय नाय सोडा...खर साय़ेब गेल्या महिन्याभरापास्न तुमचं नावं आमच्या कट्यावरनं लईच चर्चेत आलंया...व्हय सायेब कोल्हापुरात तुम्ही हेल्मेट सक्ती करताय नव्हं...सायेब कोल्हापूर म्हणजे तांबडा - पांढऱ्याचा झणझणीत कट...कोल्हापूर म्हणजे मिसळीचा लाल भडक कट...कोल्हापूर म्हणजे निळाशार रंकाळा...आणि याच कोल्हापूरला तुम्ही आता हेल्मेटचं कोल्हापूर करायला निगालासा व्हय...सायेब हेल्मेट घालाय आमचा इरोध न्हाय खरंतर पण कोल्हापुरात ते शक्य नाय ओ...हायवेवर तुम्ही हेल्मेट सक्ती करा, आमचं कायबी म्हणणं नाय... खरं कोल्हापुरातल्या रस्त्यांवर हेल्मेट घालून कसं ओ गाडी चालवायचं...रविवारचं मटण आणाय भाईर पडलो तरी काय आमी हेल्मेट घालायचं व्हय पंचगंगा घाटावर गेलो तर काय हेल्मेट घालायचं व्हयं, खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ खायला गेलो तर काय हेल्मेट घालायचं व्हय...अवो सायेब आमचं रस्तं केवडं...गेल्या 10 वर्षात कोल्हापूरातलं ट्रॅफिक वाढलं सोडा..त्यात काय वाद नाय..अक्शीडेंटचं परमाणबी लईच वाढलं...म्हणून तुमी हेल्मेट सक्ती करायचा निर्णय घेतलासा..शाहू टोल नाका, शिरोली टोल नाका, बावड्याचा टोल नाका , हिकडं बालिंगा, तिकडं कळंबा तेच्या पलीकडं हेल्मेट सक्ती करा की आमचं काय बी म्हणणं नाय...शेहरात तेवढं हेल्मेट नको ओ...आता तर आमच्या कोल्हापुरात हेल्मेटच्या इरोधात कृती समितीबी स्थापन झालीय. आमच्या शेहरातले आमदार क्षीरसागर यांनीबी हेल्मेटला इरोध केलाय. तो का केला...याचा इचार तुमी कराच सायेब...हेल्मेटनं जीव वाचणार हे खरं हाय, अॅक्शीडेंट कमी व्हतील हेबी खरं हाय..खर सायेब आमचा लक्ष्मीपुरीतला रस्ता बघीतलासा काय...त्या चिंचोळ्या रस्त्यांवरनं हेल्मेट गालून गाडी मारायची व्हय...शाहुपुरीतलं रस्ते, ताराबाई पार्कातलं रस्ते, शिवाजी पेठेतलं रस्ते केवडं रस्ते हे सायेब.. आपल्या कोल्हापूरात ट्रफिकला शिस्त नाय सायेब ही गोष्ट नाकारता येत नाय..आजबी लईजण त्या सिग्नलला असलेल्या पांढऱ्या पट्ट्यावरचं गाडी थांबिवत्यात..अनेक जणं सिग्नलबी तोडत्यात...लईजण बिन लायसनचीबी गाडी मारत्यात सायेब ..त्यांच्यावर कडक कारवाई करा, आमचं कायही म्हणणं नाय..दाभोळकर कॉर्नर आणि कावळा नाक्यावरच्या सिग्नलवर तर सिग्नल पडायच्या आतंच गाडी फुढं रेटत्यात..त्यांना तुमचा इंगा दाखवा सायेब..खरं आमच्या एमएच 09 च्या गाड्या असूंदेत नायतर आमच्या पै पावण्यांच्या इतर जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या पासिंगच्या गाड्या असूंदेत आमच्यातली काहीजण शिस्त पाळत्यात सायेब..त्यामुळं हेल्मेट सक्ती करुन हा प्रस्न सुटणार नाय ओ...जे चुकत्यात त्यांचं परबोधन करा सायेब..तुमचे पोलीस कर्मचारीही करतील तसं, त्यात काय बी वाद नाय ओ....सायेब शेहरात पार्किंगचा केवढा प्रॉब्लेम हाय...तुमची ती टोईंग व्हॅन..गाड्या उचलणारी गाडी ओ..त्याचा धसका किती घेत्यात गाडीवालं..माहित नसल तुमास्नी..सायेब पार्किंगला शिस्त लावायसाठी कोल्हापूरकर तुमच्यासंग असतील..सायेब शेहरात अवैध वाहतूक किती हाय बघा...कोल्हापुरातनं जवळच्या उपनगरांमध्ये जाणाऱ्या 3 चाकी रिक्षा किती हाईत सायेब..त्यांच्यावर कुणाचाच अंकुश नाय..त्या पैला बंद करा सायेब..ती अवैध वाहतुकवाली पॅसिंजर मिळवायसाठी गाड्या पळ-पळवित्यात..तावडे हाटेल ते शिवाजी चौक नायतर दसरा चौक या मार्गावर त्यांची मोठी स्परधा असते सायेब..ते बंद करा...म्हत्वाचं म्हणजे सायेब शेहरात अनेक ठिकाणी मटकाबी सुरु हाय, व्हिडिओ पार्लरबी सुरु हाईत तीबी बंद करा सायेब...मग बगा आमचं कोल्हापूर कसं हुतयं ते... फकस्त हेल्मेट सक्ती करुन काय उपेग नाय ओ...जर हेल्मेट शेहरात घातलं तर चौकातला सिग्नलही नीट दिसन नाय सायेब..अनेक सिग्नल हे झाडं, बोर्ड यांच्यामागं दडल्यात सायेब...म्हणून म्हणतो सायेब नादखुळा कोल्हापूर ही जी आमचा वळख हाय काय नाय...ती अजूनबी चांगली व्हईल...हे माझं एक मत हाय सायेब..शेवटी तुमी आमच्या जिल्ह्याचं अधिकारी हायसा त्यामुळं आमच्या कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घिऊन योग्य तो निर्णय घ्या...इतकचं...जर कधी येळ मिळाला तर भेटू पुन्यांदा कधीतरी....
First published: